विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चावंद – मुंबई. जिल्हा पुणे. जुन्नरच्या वायव्येस दहा मैलांवर व नाणाघांटच्या आग्नेयीस दहा मैलांवर हा एक मोडकळीस आलेला व निकामी किल्ला आहे. येथून हडसर आणि जविधन हे किल्ले जवळच आहेत. हे तीन किल्ले आणि शिवनेरी किल्ला यांचा उपयोग नाणाघांटाचें रक्षण करण्यांकरितां फार होत असे व त्यामुळें कोंकण आणि जुन्नर यांमधील दळणवळण सुरक्षित राही. या किल्ल्याची नैसर्गिक बळकटी जितकी चांगली आहे त्यामानाने तटबंदी नाहीं. इ.स.१८२० च्या सुमारास किल्ल्याचा महादरवाजा उडवून दिला. डोंगरी लोकांशिवाय दुसर्या कोणास किल्ल्यावर जातां येत नाहीं. वर चावंदबाईचें एक लहान देऊळ असून पाणीपुरवठा चांगला आहे. अहमदनगर निजामशाहीचा मूळ पुरूष मलिक महमद यानें हा किल्ला इ.स. १४८६ साली सर केला होता. दुसरा निजाम बुर्हाणशहा याच्या लहान मुलास सुमारें एक वर्ष याच किल्ल्यावर ठेवलें होतें व नंतर त्यास अहमदनगरची गादी मिळाली. इ. स. १६३७ सालीं शहाजीनें जे पुण्याकडील किल्ले मोंगलांस दिले त्यांत जुंद अथवा चावंद असावा असे दिसते. इ.स.१८१८ सालच्या मराठ्यांबरोबर झालेल्या लढाईंत ब्रिटिशांनीं हा किल्ला घेतला.