विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चावडा, अ न हि ल वा ड पा ट ण चे. – चावडा घराण्याचा मध्ययुगीन कालांतील संगतवार इतिहास देणें जरासें कठिण आहे; कारण प्रचीन इतिहासाचीं मुख्य साधनें जीं शिलालेख व ताम्रपत्रे तीं या घराण्यासंबंधी उपलब्ध नाहींत. मुंबई गॅझिटिअर (व्हॉ १) मध्यें गुजराथची हकीकत देतांना ह्या घराण्याविषयीं थोडी फार माहिती दिली आहे. पण गॅझिटिअरची सर्व भिस्त प्रबंध व बखरी यांसारख्या आधारावर असून या प्रबंधांतून दिलेल्या वर्णनांत भाकडकथाहि असतात व त्यांतील इतिहास सर्वथैव विश्वसनीय नसतो. हें घराणें आठव्या शतकांत उदय पावले. उत्तर गुजराथेंतील सारस्वत मंडल हें त्यांचे मुख्य ठिकाण असावें; चावड्यांचें घराणें अत्यंत प्रबल झालें खरें परंतु हे घराणें स्वतंत्र नव्हतें; सार्वभौम कनोजच्या राज्याच्या मांडलिकांत याची गणना होत असावी.
चावडा घराण्यांतील कांहीं पुरूष आपणांस सूर्यवंशी समजतात तर कांहीं चंद्रवंशी म्हणवून घेतात. कांहीं आपली उत्पत्ति अवूमधील होमकुंडांतून झाली असें मानतात तर कांहीं प्रसिद्ध ॠषिंनां आपले मूळपुरूष समजतात. कर्नल टॉडच्या मतें हे कोणी परकी लोक पहिल्यानें सौराष्ट्रांत येऊन उतरले व तेथून उत्तरेकडे जाऊन वनराजानें पट्टण येथें राज्य स्थापन केलें. फोबर्स हा कनकसेनाचा विचित्रवंश असा याचा उल्लेख करतो, पण त्यांच्या मूळपुरूषाबद्दल कांहींच बोलत नाही. वॉटसन म्हणतो कीं, ही परमार वंशाचीच एक शाखा असावी. गुजराथेंतील बहुतेक सर्व शहरें पूर्वी परमाराच्या ताब्यांत होतीं. रजपूत लोकांनां पोटजातीचें नांव ठाऊक असून मूळ वंशाचें नांव ते विसरून जातात अशीं पुष्कळ उदाहरणें सांपडतात. वनराजाचा मूळपुरूष वेणी राजाचा बाप वचराज होता हें प्रसिद्ध आहे. या वचराजानें दीपगडावर राज्य केले. वेणी राजानें समुद्राची शपथ घेऊन एका व्यापारास फसविल्यामुळें दीवगड वाहून गेला व वेणीची गरोदर राणी पळून गेली. तीला चांदुर येथें वनराज हा पुत्र झाला. याला अनहल नांवाच्या धनगरानें पट्टण येथें एक निधि असलेला दाखविला. तो घेऊन त्यानें तेथें एक शहर वसविलें व त्यास अनहिलपट्टण असें नांव दिलें. हे पट्टण ज्यानें वल्लभी उध्वस्त केली त्यानेंच स्वारी करून पूर्वी ओसाड पाडिलें असावें. पूर्वी वढवाण व वालाक क्षेत्र येथेंही परमार राजे राज्य करीत असत. ज्या कवितेवरून वरील हकिकत घेतली आहे त्यांत तीस परमार असें स्पष्ट म्हटलें आहे ती कविता अशी -
परवरियो परमार।। वासभीनमाळ वसायो।।
यांत वनराजानें भीनमाल (श्रीमाल) वसविल्याचा उल्लेख आहे. वॉटसनने पाहिलेल्या एका वंशांवळींत वनराज, वेणीराज, व वचराज यांचा मूळपुरूष विक्रमादित्य हा दाखविला आहे व तो परमार वंशांतीलच होता.
रा. वैद्य म्हणतात कीं, चावडा घराण्याची भिनमालच्या चापोत्कठ अथवा चाप कुलाच्या उपशाखेंत गणना करतात. चापकुलांतील एक लहानसें सरदार घराणें पंचसर येथें नांदत असें; या घराण्यांतील शेवटचा पुरूष एका 'भुयड' कडून मारला गेला. हा भूयड कोण कोठील वगैरे कांहींच माहिती उपलब्ध नाहीं. चाप सरदाराची राणी गर्भवती होती; ती वनांत प्रसूत झाली, तिला जो मुलगा झाला तोच वनराज. वरील हकीकतींत व बाप्पारावळ किंवा दक्षिण चालुक्य वंशाच्या संस्थापकाच्या जन्माच्या दंतकथेंत बरेंच साम्य आहे. वनराजानें प्रथम भिल्ल लोकांच्या सहाय्यानें लूट वगैरे मिळवून द्रव्यसंचय करण्याचा उपक्रम चालू केला. एकदां तर त्यानें कान्यकुब्ज नगरास जात असलेल्या सरकारी मुख्य खजिन्यावर छापा घालून तो हस्तगत करून घेतला. [प्रबंध चिंतामणींत सांगितलें आहे कीं, कनोजचा एक धंचकुल नांवाचा सरदार गुजराथेंत सुभेदार होता. तो खजिना घेऊन परत जात असतां वनराजनें त्याच्यावर एका खिंडींत छापा घातला व त्यास ठार करून खजिना लुटला. त्याला त्यांत २४ लाख रौप्य द्राम्म (नाणी) मिळाले] ह्या प्रचंड लुटीच्या जोरावर त्याला सैन्य उभारितां आलें व या सैन्याच्या साहाय्यानें त्यानें राज्य स्थपिलें. हल्लीच्या गुजराथ प्रांताच्या उत्तरेस त्यानें अनहिलपूर नांवाचें शहर इ. स. ७४६ च्या सुमारास वसविलें व तेथें राजधनी केली. त्यावेळीं कनोजच्या साम्राज्यास उतरती कळा लागली होती. त्यामुळें वनराजासारख्या धाडशी व कर्तबगार वीर पुरूषास स्वतंत्र राज्य स्थापता आलें. बाप्पारावळ, सांबरचा सामन्तदेव व मांडोरचा नागभट्ट यांनीही याच तर्हेनें आपलीं राज्यें स्थापिलीं. नवसरी ताम्रपटावरून असें दिसतें कीं, अरबांनी कोणत्यातरी चापराजाचा पराभव केला; मग तो वनराज की कोण तें नक्की समजत नाहीं. बाप्पारावळप्रमाणेच वनराज दीर्घायुषी असून त्याची कारकीर्दहि बरीच मोठी होती (स. ७४६-८०५).
वनराजानंतर त्याचा मुलगा योगराज किंवा जोगराज राज्य करूं लागला. त्याची कारकीर्द इ.स. ८०६ ते ८४१ पर्यंत होती. ह्या वेळी कनोजच्या गादीवर भोज हा राज्य करीत असावा व योगराज हा भोजराजाचा मांडलिक असावा. योगराजानंतर रत्नादित्य गादीवर बसला व त्याच्या पश्चात् वीरसिंहाकडे राज्यसत्ता आली. वीरसिंहानंतर इ. स. ८५६ मध्यें खेमराज राज झाला व त्यानंतर ८८१ मध्यें मुंडराज सिंहासनारूढ झाला. मुंडराजाचेंच भूयड असें नांव होतें. (मुंडराजाऐवजीं कांहीं ठिकाणी चामुण्ड असें नांव आढळतें.) भूयडनें द्वारका व त्या बाजूचा सर्व समुद्रकिनारा काबीज केला होता. भूयडानंतर ९०८ मध्यें घाघड उर्फ राहण गादीवर आला व त्याच्या नंतर ९३७ पासून ९६१ पर्यंत ह्या कुलांतील शेवटच्या राजपुरूषाने राज्य केलें. ह्याचें नांव ज्त्रात नाहीं असे मुंबई गॅझीटिअरमध्यें म्हटलें आहे. हा शेवटचा राजा राज्य करीत असतां त्याच्या मूलराज सोळंखी नामक भाच्यानें त्याला पदच्युत केलें व स्वत: राज्य पटकाविले. माबेल डफनें या शेवटच्या राजाचें नांव (व कारकीर्द) सामंतसिंह (इ.स. ९३५ ते ९४२) असें दिलें आहें. सुकृतसंकीर्तननामक ग्रंथांत या राजाचें नांव भूभट असें दिलें आहे. प्रबंधचिंतामणींत वनराजानंतरची राजांची यादी व त्यांच्या कारकीर्दीच्या समाप्तीचे संवत खालीलप्रमाणें आहेत (१) योगराज (सं. ८७८); (२) रत्नादित्य (सं. ८८१); (३) खेक्षेमराज (सं. ९२२); (४) चामुण्ड उर्फ मुंड किंवा भुयड (सं. ९३८); (५) अकडदेव (सं. ९६५); (६) भूयडदेव (सं.९९१ इ.स. ९३४). योगराजानें व भूयडदेवानें पट्टण येथें बरींच मंदिरें व तट बांधलें.
पाटणच्या चावड्यासंबंधीं जैन प्रबंधकारांनीं दिलेली माहिती एवढीच. यावरून चावडा घराण्यांतील राजपुरूषांची यादी व त्यांच्या कारकीर्दींची शकावली यांशिवाय इतर माहिती सांपडत नाहीं. चावडा घराणें शिवोपासक असावें. पुढें पुढें त्यांनीं जैन पंडितांसही आश्रय दिला असावा. याप्रमाणें पाटण येथील चावड्यांची हकीकत फारच त्रोटक असल्यामुळें ती येथेंच संपते. माबेल डफ हिनें या घराण्याची वंशावळ जी दिली आहे ती अशी:- वनराज (७४६-८०६), योगराज (८०६-८४१), क्षेमराज (८४१-८६६), भूयड (८६६-८९५), वीरसिंह (८९५ ते ९२०), रत्नादित्य (९२०-९३५), सामंतसिंह (९३५-९४२)
चाप घराण्याच्या दुसर्या उपशाखेची उपलब्ध असलेलीं थोडीशी माहिती येथें देतो. इंडि. अँटि. पु. १२ (पृ. १९३) मध्यें धरणीवराहाचा एक ताम्रपट छापिला आहे. त्याचा शक ८३९ (इ. स. ९१७) आहे. त्यावरून असें दिसतें कीं, वढवान (वर्धमान) येथें चाप घराण्याची एक उपशाखा नांदत असावी, व ती कनोजची मांडलिक असावी. ताम्रपटावरून धरणीवराह हा कनोजच्या महीपाल राजाधिराजाचा मांडलिक होता हें उघड दिसतें. मात्र धरणीवराहाचा काठेवाडांतील चूडासम घराण्याशीं कांहीं संबंध नसावा. या दानपत्रांत धरणीवराहाच्या पूर्वीच्या ४ राजांची नांवे दिलीं आहेत; ती अशीं:- (१) विक्रमार्क, (२) अद्दक, (३) पुलकेशिन्, (४) ध्रुवभट व (पांचवा धरणीवराह) विक्रमार्क व कनोजचा राजा भोज हे समकालीन असावेत. ह्या दानपत्रांत चाप घराण्याची उत्पत्ती शंकराच्या धनुष्या(चाप=धनुष्य)पासून झाली असें म्हटलें आहे.
चा व डां च्या व सा ह ती.— मूळराज सोळंखीनें जेव्हां वनराजाच्या शेवटच्या वंशजास हांकून दिले, व आपण गादीवर बसला (९४२) तेव्हां चावडा राणी अहिपत नांवाच्या आपल्या एक वर्षाच्या मुलास घेऊन जेसलमीर येथें आपल्या बापाकडे गेली. अहिपत मोठा झाल्यावर त्यानें पाटणच्या राज्यांत लुटालूट करण्यास आरंभ केला व कच्छच्या राज्यांत ९०० खेडी पादाक्रांत करून मोरगढ येथें आपली गादी स्थापन केली. अहिपतच्या घराण्यांतील पुणजाजी नांवाचा तेरावा वंशज अल्लाउद्दीन खिलजीचा (१२९५-१३१५) समकालीन होता. जाडेजांनी कच्छप्रांत आपल्या अमलाखालीं आणल्यावर पुणजाजी बदोद्यासन्निध असलेल्या धारपुर खेड्यास गेला व तेथें त्यानें चोरासी (८४ खेड्यां) ची जहागिरी संपादन केली; परंतु इसवी सन १३०६ च्या सुमारास अलघखानानें गुजराथ प्रांत जिंकला तेव्हां पुणजाजी पाटण येथें सुभेदाराच्या आश्रयास जाऊन राहिला. मुसुलमान सुभेदाराला विसलनगरच्या कोळ्यांनी बराच उपद्रव दिला. पुणजाजीस त्या प्रांताची चांगली माहिती असल्यामुळें सुभेदारानें त्यास मोठ्या खुषीनें आपल्या पदरी ठेविलें व त्याच्या मदतीने १६००० शिपायांची फौज देऊन त्यास कोळ्यांचें पारिपत्य करावयास सांगितले. त्याप्रमाणे पुणजाजीने विसलनगर व कडी यांच्या दरम्यान शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर त्याला विसलनगरच्या जिल्ह्यांतील २४८ व आणखी दुसरीं ५२ अशी एकूण ३०० खेड्यांची जहागीर मिळाली. यांपैकीं ४६ गांवें व कित्येक जमिनी त्यानें आपल्या नातेवाईकांस व अनुयायांस बक्षीस दिल्या. यानें आबासान किंवा आंबासान येथें आपली गादी स्थापन केली व तेथें ४६ वर्षेपर्यंत राज्य केलें.
अहिपतची वंशावळ अशी :- अहिपत, त्याचा पुत्र विक्रमसी त्या पुढील वंश अनुक्रमे :— विभूराज, ताकुलजी, शेषकरण, वाघजी, अखेराज, तेजसी, करमसी, ताखनसी, आसकरण, मोकमसी, पुणजाजी. पुणजाजीने आंबासान येथें गादी स्थापिली याच्या वंशांतील इंदरसिंघ नांवाच्या पुरूषानें दमाजी गायकवाडाशीं लढाई करून मे(ह)साणा येथें त्याचा पराभव केला होता. पुणजाजीस दोन मुलें वडील मेसाजी व धाकटा बनवीर. मेसाजीने मेहसाणा शहर वसविलें व त्याच्या आई (पद्मावती) नें तेथें पदमसागर तलाव बांधिला. हा निपुत्रिक असल्यानें बनवीर गादीवर आला. याचे वंशज आपणास रावळ म्हणवूं लागले. याचा पुत्र नरवरसिंग व त्याचा जयसिंग. याला इसरदास, सुरजमल, व सामन्तसी अशीं तीन मुलें झालीं. इसरनें अंभोद, सुरजनें वरसोडा व सामन्तनें मानसा येथें मूळ जहागिरीचे वाटे पाडून तीन निरनिराळ्या जहागिरी स्थापिल्या. इसरचा पुत्र वरणसी व त्याचा सिंघोजी. या सिंघोजीस सात पुत्र होते. त्यांपैकीं तीन अंभोदला राहिले व बाकीच्या चौघांनी वसाजी, भोतना, करा व कमाना या गांवी जहागिरी स्थापिल्या. त्यांचे वंशज त्या त्या गांवीं हल्लीं नांदत आहेत. सामन्तचा वंश मानसा (मेहसाणा?) येथें आहे. सुरजचा पुत्र पुणजाजी, त्याचा सिसाजी, त्याचा सोद्दूल व त्याचा गंगाजी. गंगाजीच्या वडील (असकरण) मुलानें पोथा येथें जहागीर स्थापिली. धाकटा जगजोती यास चार मुलें; पैकीं दोघांनी वाडु व अहाजोल येथें जहागिरी स्थापन केल्या. जगजोतीचा वडील मुलगा रामदास, त्याचा केशव व त्याचा दयाल. या दयालास आठ मुलें होती. त्यांपैकीं चौघांनी, रंगपूर, गालथल, वरसोडा व लाखागड येथें जहागिरी मिळविल्या. दयालचा वडील पुत्र गिरधर; याला चार मुलें; पैकीं धाकटा अमर; त्याचा भीमसी, त्याचा रतनसी, त्याचा मोतीसिंग. मोतीसिंगास किशोरसिंग म्हणून पुत्र होता. हा स. १८७६ मध्यें वरसोड्याच्या गादीवर होता. [बॉम्बे ग्याझे. पु.१; सुकृतसंकीर्तन; प्रबंधचिंतामणी; इंडियन अँटिक्वरी पु.४, १२ व स.१८७५ चें; मध्ययुगीन भारत पु. २; माबेल डफ].