विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चार्लमांट, अर्ल ऑफ ( १७२८-१७९९ ) -जेम्स कॉल्फील्ड चार्लमांट हा डब्लिन येथें सन १७२८ च्या आगस्ट महिन्याच्या १८ व्या तारखेस जन्मला; हा ज्या घराण्यांत जन्मला त्या घराण्यांत या पूर्वीं तीन पिढ्यांना व्हायकाऊंट ही पदवी देण्यांत आलेली होती व जेम्स चार्लमांट हा चौथा सरदार होता. हा लहानपणापासूनच विद्याव्यासंगी असल्याकारणानें लंडनमध्यें व डब्लिनमध्यें जे विद्वानगृहस्थ असत त्यांचा व याचा चांगला स्नेह असे. जॉन्सन, बर्क, गोल्डस्मिथ यांच्याशींहि त्याचा चांगला परिचय असे. आयर्लंडमध्यें त्यानें निरनिराळ्या अधिकाराच्या जागा पत्करून त्यांत जें आपलें प्रावीण्य व्यक्त केलें, त्यामुळें त्याला अर्ल ही पदवी १७६३ मध्यें अर्पण करण्यांत आली. पण त्यामुळें त्याची लोकसेवा करण्याची हौस मात्र भागली नाहीं. आयर्लंडमध्यें त्यावेळीं स्वातंत्र्याची चळवळ सुरू झालेली होती. त्या वेळच्या पुढार्यांनां आयरिश पार्लमेंट स्वतंत्र असावें असें वाटूं लागलें होतें. याचवेळीं अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरूवात झाल्यामुळें व त्यांत इंग्लंडचा पराजय होऊं लागल्यामुळें आयर्लंडमधील इंग्रजी सैन्य अमेरिकेकडे पाठविलें. त्यांतच आयर्लंडवरहि परचक्र येतें कीं काय अशा तर्हेची भीति पडल्यामुळें आयर्लंडमध्यें स्वतंत्र स्वयंसैनिक पथकें उभारण्याची चळवळ जोरांत सुरू झाली व हां हां म्हणतां ६०००० सैन्य गोळा झालें. पुढें परचक्राची भीति नाहींशीं झाल्यावर याच स्वयंसैनिकांच्या साहाय्यानें आयर्लंडला स्वतंत्र पार्लमेंट मिळविण्याचा तत्कालीन पुढार्यांनीं निश्चय केला. या सैनिकांचा पुढारी चार्लमांट असून त्याचा ग्रॅटन व फ्लड या लोकपक्षीय पुढार्यांशीं उत्तमप्रकारचा संबंध होता व ग्रॅटन व चार्लमांट यांनीं मोठ्या उत्साहानें खटपट करून स्वतंत्र पार्लमेंट मिळविलें. पण हें पार्लमेंट मिळविल्यावर अर्थातच स्वयंसैनिक पथकांची विशेष गरज नसल्यामुळें पुष्कळशीं पथकें कमी करण्यांत आलीं. १७९२ सालीं त्यानें आपल्या गव्हर्नरीचा राजीनामा देऊन ‘व्हिग् क्लबा’ ची स्थापना केली. पण १७९८ सालच्या टोनच्या बंडामुळें त्याला धक्का बसला व आपण केलेल्या चळवळीचा वाईट प्रकारनें शेवट होणार असें त्याला वाटूं लागलें. यामुळें त्याच्या मनावर भयंकर परिणाम होऊन तो १७९९ सालीं मरण पावला.