विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चारा -पाळीव जनावरांचें वन्सपति खाद्य. गुरांविषयीं विचार करूं लागलों म्हणजे चार्याचा प्रश्न पुढें उभा रहातो. गुरांचा स्वाभाविक चारा म्हणजे गवत होय. हिदुंस्थानांत मुख्यत्वेंकरून डोंगराळ प्रदेशांत गवताचीं अनेक रानें आहेत. सह्याद्री व सातपुडा या पर्वतांच्या जवळील भागांतील गुरें बहूतकरून डोंगरी गवतावरच पोसलीं जातात. अशीं कुरणें महाराष्ट्रांत व काठेवाडांत बरींच आहेत. देशावर व त्याच प्रमाणें कर्नाटकांत डोंगर सापटीवर नदीकांठीं अफाट कुरणें असून तेथें उत्तम जातीचें गवत होतें. ज्या रानांत उत्तम जातीचें गवत मुबलक होतें त्याला महाराष्ट्रांत कुरण असें म्हणतात व गुजराथेंत त्यालाच बीड अशी संज्त्रा आहे. साधारणपणें गवताची एकच कापणी होते. सपाट रानांतील व नदी कांठच्या रानांतील गवत हिरवें कापून तें गुरांनां चारितात. अशा ठिकाणीं कपणीनंतर सोईचा पाऊस झाल्यास दुसरी फूट होऊन गुरांस चरावयास मिळतें. शहराच्या आसपासचीं कुरणें गुरांनां उभीं चरतात. प्रत्येक खेड्यांत गुरांस चारण्याकरितां म्हणून ‘गायरानें’ ठेवलेलीं असतात. परंतु तीच जागा गांवांतील गुरांनां उभें रहाण्यासाठीं असल्यामुळें तेथें चरण्यालायक गवत फारसें होत नाहीं. बंदिस्त जंगली भागांत पुष्कळ गवत होतें. पण त्याचा मुख्य उपयोग दुष्काळ सालीं जास्त होतो. जंगली भागांतील गवत दरसाली कापून जागोजागीं त्याच्या गंजी करून ठेवाव्यात व त्यांचा उपयोग दुष्काळांत गुरांसाठीं करावा अशी तजवीज सरकारांतून चालू आहे. गुजराथेंत शेताचे बांध रूंद ठेवितात. व त्यांवर झालेलें गवत कापून तें आपल्या गुरांसाठीं राखून ठेवितात. देशावर कुरणांतून चरण्याची बंदी झाल्यापासून गंजी लावण्याची पद्धत जास्त प्रचारांत येऊं लागली आहे. मोठमोठ्या शहरांजवळ विक्रिसाठीं गंजी करून गवत सांठवून ठेवितात.
गवताचा व इतर चार्यांचा सांठा साधारणपणें प्रत्येक भागांतील हवापाण्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. जेथें नियमित व पुरेसा पाऊस पडतो तेथें चार्याची वाण उन्हाळ्यांत व पावसाळ्यांत मिळून एक दोन महिनेच पडते. पहिल्यानें पावसाळ्यांत तयार झालेलें हिरवें गवत मिळतें. तें सरतें तों तृण, धान्याचा कडबा, सरम व द्विदल धान्याचें भूस मिळावयास लागतें. अशा रीतीनें खर्च होऊन जो चारा शिल्लक रहातो त्याच्या गंजी करून तो सांठवून ठेवितात. लहान गंजी वाटोळ्या असतात व मोठ्या चौकोनी असतात. सांगली, मिरज वगैरे भागांत त्या वरळीच्या आकाराच्या घालून त्या मातीच्या ढेंकळांनीं झांकितात. त्यांस ‘ढेपण’ म्हणतात. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांत गंजी शाकारल्यावर त्यांच्या बाजू व वरील भाग माती व शेणाच्या काल्यानें लिंपितात. नाशिक, पुणें व सह्याद्रीजवळील भागांत गवताच्या गंजी छपरांनीं शाकरतात. गव्हाचें कुटार ( भुसा ) व कडदणाचें भूसपळ काठीच्या कणगींत किंवा कडब्याच्या ताटांचें कूड बांधून त्यांत सांठवून ठेवितात. नाशिक जिल्ह्यांत कूट विटांनी बांधलेल्या वाटोळया खोलींत सांठवितात. कोंकणभागांत पेंढा गंजी घालून ठेवितात. महाराष्टांत गवताच्या अनेक जाती आढळतात. त्यांपैकीं गुजराथेंत झिंझवो, गांधी, मोसी, लाचरा, व कडकडीया देशावर पवन्या, मारवेल, पवनभूरी, भातेड व तांबडगोटा या कोंकणांत फुलेण, करवेल वगैरे गवताच्या मुख्य जाती होत. गवताखेरीज ज्वारीचा कडबा, बाजरीचें सरमड, भाताचा पेंढा, राळ्याची व नाचणीची काड, गव्हाच्या काडीचा भुसा व कडदन धान्याचें भूस वगैरे गुरांनां चारितात.
जेथें जेथें पाण्याची सोय असते तेथें तेथें मुद्दाम चार्याचीं पिकें करितात. उदाहरणार्थ, उत्तर गुजराथेंत सुंड्या; हुंडी व खोंडी, खानदेशांत व देशी भागांत; मका, हंडी, उतावळी, निळवा, लसूणघांस पुणें व नगर जिल्ह्यांत; मेथी, नाशिक व पश्चिम खानदेश जिल्ह्यांत; सांगली व मिरजेकडे नदिबूड रानांत मका, शेवरी, बाल वगैरे गुरांनां चारण्यासाठीं करितात. उसाच्या रानांत गुर्हाळावर बैलांना उंसाचीं वाढीं चारितात.
काहीं भागांत जेथें उन्हाळ्यांत चारा कमी पडतो तेथें मावळांत धामण, पिंपरीचा पाला, कोंकणांत बांबूची चिवार, पांगारा, भारंडी, भेंडी, फणस वगैरेंचा पाला; खानदेश व नाशिक जिल्ह्यांत अंजन, हेंकळ, कांटेबोर वगैरे झाडांचा पाला व गुजराथेंत सांबडी, हरेरा, दोदी, हिरमाडी वगैरेंचा पाला चारितात दुष्काळात वड, पिंपळ, पिंपरी, नांदुरकी लिंब, उंबर, पांगारा आंबा वगैरे झाडांचा पाला व केळीचे खुंटहि गुरांनां घालितात.
वर सांगितल्याप्रमाणें नेहमीं चार्यांसंबंधीं गुरांची आबाळ मुख्यत्वेंकरून दुष्काळीं भागांत जानेवारी ते जून अखेरपावेतों फार होते. यावेळीं रानांत चरावयास फारसें नसतें. अशा वेळीं चार्याची तरतूद करणें अगदीं अवश्य आहे. पावसाळ्यांत हिरवा, त्यावेळीं खाण्यास अयोग्य असा बराच चारा असूच तो स्वस्तहि असतो. हा चारा खड्ड्यांत अगर चुनेगच्ची विहिरीच्या आकाराच्या ‘सायलो’ मध्यें भरून ठेविल्यास तो उन्हाळ्यांत फार उपयोगी पडेल. अशी चारा सांठवून ठेवण्याची पद्धत इंग्लंड, अमेरिका, वगैरे ठिकाणीं फार वर्षांपासून प्रचलित आहे. हिंदुस्थानांत सुद्धां असा मुरवलेला चारा मिलिटरी डेअरीफार्मांत व शेतकी खात्याच्या सरकारी शेतावर करण्याची वहिवाट चालू आहे. तो चारा उत्तम असून गुरें मोठ्या आवडीनें खातात.
सायलो म्हणजे जमीनींत खोदलेला विहिरीसारखा चौकोनी अगर वाटोळा खड्डा असतो. कित्येक वेळां हा खड्डा जमिनींत खोदून जशाचा तसाच ‘सायलो’ म्हणून वापरतात. पण कित्येक वेळां त्याच्या बाजू व तळ बांधून काढितातव नंतर चारा सांढवितात. कच्च्या सायलोंत चार्याचें कुजून बरेंच नुकसान होतें. तसेंच तो बांधून काढिला असतां होत नाहीं. सायलेज म्हणजे मुरवलेला चारा. हिरव्या गवताचा कडवळाचा किंवा मक्याचा कसलाहि सायलेज करितां येतो. पण मक्याचा सायलेजचा चांगला होतो. अमेरिकेंत मक्याची ताटें बारीक करून मग तीं सायलोंत भरितात. हा चारा आगष्ट. सप्टेंबरांत सायलोंत भरून ठेविल्यास तो फेब्रुवारी-मार्च महिन्यांत काढण्यास तयार होतो. खड्ड्यांत भरलेल्या चार्यापैकीं शेंकडा ६० ते ७० टक्के सायलोज गुरांनां खाण्यास योग्य असा निघतो. सुमारें २५ गुरांना तीन महिनेपर्यंत पुरेसा चारा मावण्यास २० फूट खोलीचा व १५ फूट व्यासाचा खड्डा पुरें होईल.
मुरवलेल्या चार्याखेरीज हल्लीं जो चार चारण्यांत येतो. तो कडबा कापण्याच्या यंत्रानें किंवा कुर्हाडानें किंवा दुसर्या हत्यारानें बारीक करून गुरांनां खाऊ घातल्यास आहे हाच चारा जास्त दिवस पुरवितां येईल.
याखेरीज देशावरील कांहीं भागांत व कर्नाटकांत जसें गंजी मारचून सुमारें एक वर्ष पुरण्याजोगा चारा सांठवून ठेवतात. त्याप्रमाणें मुख्यत्वेंकरून दुष्काळनिवारणार्थ एका वर्षाचा चारा दुसर्या वर्षापावेतों राखून ठेवला पाहिजे. ही पद्धत चोहोंकडे अमलांत येणें अवश्य आहे.
अलीकडे दिवसानुदिवस हलकी जमीनसुद्धां लागवडींत येऊं लागल्याकारणानें चारऊ रानें कमी कमी होत चाललीं आहेत. याकरितां सर्व शेतकर्यांनीं गुरांच्या चार्यासाठीं म्हणून आपल्या शेताच्या कांहीं भागांत दर वर्षीं चार्याचें पिक पेरावें. निदान पाणी असेल त्यांनीं तरी ही गोष्ट अवश्य करावीं.
कापूस आणि गळिताचीं धान्यें पिकणार्या प्रदेशांत चार्याची टंचाई फार असते. अशा ठिकाणीं सरकीच्या टरफलांचा कडब्याप्रमाणेंच उपयोग होतो. असें सुरत फार्मवरील प्रयोगाअंतीं अनुभवास आलें आहे.
साधारणपणें इकडील चार्यासंबंधीं माहिती दिल्यावर युरोपांतल्यासंबंधीं काय तजवीज करतात याचें दिग्दर्शन करणें जरूर आहे. पाश्चात्य देशांत गुरांनां चारण्यासाठीं जनावरांची फार काळजीनें निगा ठेवितात. गवत खराब होऊं लागलें म्हणजे चांगल्या चांगल्या जातींच्या गवतांचें मुद्दाम बीं धरून त्यांत कांहीं द्विदल जातीच्या बियांची मिसळ करून चराऊ रानांत पेरितात. कुरणांस खत देतात व त्यांत वाईट जातीचें तण होऊं देत नाहींत. कुरणासभोंवतीं कुंपणें घालून चार्याचा बचाव करितात व तो वाळवून ठेवितात अगर सबंध, क्षेत्राचे तुकडे करून तो बेताबेतानें गुरांस चारितात. तिकडे गवत फुलांवर असतांना कापितात व तें वाळवितात. अशा गवताला तिकडे ‘हे’ म्हणतात. आपल्या इकडे गवत अगदीं पक्कें होऊन वाळलें म्हणजे कापितात सबब तें बरेंच निकस होतें. या खेरीज टर्निप, मेन्जल बुरझल, कोबी, गाजरें वगैरेंसारखीं पिकें करून ती गुरांनां चारितात. इकडे तशा तर्हेचे प्रयत्न झालेले दिसत नाहींत. तथापि कोइमतूरकडे व बहार प्रांतांत कांहीं ठिकाणीं अशीं चराऊ रानें राखून ठेवलेलीं आढळतात.
गुरांची वाढ व संभाळ करण्यासाठीं प्रत्येक शेतकर्यानें चार्याचीं पिकें मुद्दाम केलीं पाहिजेत असें वर सांगितलें आहे. त्याप्रमाणें कोणतीं चार्याचीं पिकें कोणत्या हंगामांत करावीं वगैरेंसंबंधीं उपयुक्त माहिती पुढें दिली आहे.
चार्याच्या पिकांची निवड करतांना खालीं दिलेल्या गोष्टी लक्षांत ठेवाव्या. चार्याचें पीक लवकर तयार होणारें, जास्त उत्पन्न देणारें, गुरांस आवडणारें, पचण्यास सोपें, गुरांस अपाय न करणारें, ताटांत बारीक, पालेदार व तो पाला लुसलुशीत व नरम असणारें असलें पाहिजे. शिवाय चार्याचीं हीं पिकें मुद्दाम पाण्यावर करावयाचीं असल्यामुळें तीं थोड्या पाण्यावर येणारीं असावींत. चारा वाळवून रचून ठेविल्यास तो लवकर नासूं नये. साधारणपणें तृणवर्गांतील व त्यामुळें द्विदल वर्गांतील पिकें चार्याकरितांच करावयाचीं असतील तेव्हां तीं फुलवरावरच ( कणसांत किंवा शेंगांत दाणे भरण्यापूर्वीं ) कापावीं. जोंधळ्याच्या ज्या अनेक जाती कडवळाकरितां पेरितात, त्या फुलावरा आल्याखेरीज कापून गुरांनां कधींहि घालूं नये. कारण फुलवरा येण्यापूर्वीं जोधळ्याच्या ताटांत हायड्रोसायनिक आसिड नांवाचा विषारी पदार्थ असतो. तो गुरांनां अपायकारक आहे. त्याचप्रमाणें लसूणघांस गुरांनां कापल्याबरोबर घालूं नये. तो कांहीं तास उन्हानें हडकल्यावर मग घालावा. त्याचा दररोजचा रतीब १०-१५ पौंडांपेक्षां जास्त नसावा.
तृणवर्गांतील धान्यांनां ‘काणी’ किंवा ‘काजळी’ पासून बराच अपाय होतो. यासाठीं बी पेरण्यापूर्वीं ते मोरचुताच्या पाण्यांत भिजवून मग पेरावें.
मुख्य मुख्य चार्याच्या पिकांसंबंधीं तपशीलवार माहिती खालीं दिली आहे. दर एकरी उत्पन्नाचे आंकडे हजार पौंडांचे सरासरीच्या मानानें दिले असून चार्याचे आंकडे पौडांचे आहेत.
...
चार्यांच्या पिकांचें कोष्टक | ||||
पिकाचें नांव | हंगाम | एकरी बीं | वाळलेला कडबा | हिरवी वैरण |
सुंडिया ज्वारी | पावसाळी व उन्हाळीं | ५०-७० | ८-१० | ... |
खोंडी ज्वारी | उन्हाळी | ३०-४० | ४-६ | १२-१५ |
हुंडी | ... | ३०-४० | १४-१६ | |
शाळू | ... | ३५-५० | ८-१० | |
निळवा उतावळी | पावसाळी | ४०-५० | ६-१० | १८-२२ |
सॉरघम | पावसाळी | ४०-५० | १५-२० | |
इम्फी | ... | ३०-४० | ८-१० | ... |
मका | वर्षभर | ३०-४० | १८-२० | |
रिआनाल क्झूरिअन्स | पावसाळी | ५-८ | ... | १८-२० |
बफेलो ग्रास ( मॉरिशिस वॉटरग्रास ) | ... | ताण्याचे तुकडे | ... | २५-३० |
गिनीग्रास | ... | मुळांसहित ठोंब | ... | १८-२० |
वाटाणा ओट | हिंवाळीं | ४०-५० वाटाणा ७०-८० ओट |
... | १०-१२ |
वाल | सर्वकाळीं | २०-३० | ... | ८-१० |
चंवळी | ... | ३०-४० | ... | १२-१५ |
मेथी | हिंवाळीं | ३५-४० | ... | २५-३० |
लसूण घांस | पावसाळीं व हिंवाळीं | १२-१५ | ... | २५-४० |
बरसीम (सिंध) | हिंवाळीं | ३०-४० | ... | २०-२५ |
सुं डि या. - हें चार्याचें पीक उत्तर गुजराथ व बडोदें संस्थानांत महत्त्वाचें आहे. हें गोराडू जमिनींत चांगलें होतें. तिकडे सुंड्याची पेरणी अगदीं दाट करितात. यास्तवर त्याचीं ताटें अगदीं बारीक व गवतासाराखीं येतात. हा चारा गुरें मोठ्या आवडीनें खातात. बीं पेरल्यापासून हें ६०-७० दिवसां फुलवर्यावर येऊन तें हिरवें कापणीस तयार होतें. उन्हाळी पिकास आठदहा दिवसांनीं पाणी द्यावें लागतें.
हुं डी, का ळ भों डी व खों डी.-ह्या ज्वारीच्या जातीचा पेरा उन्हाळ्यांत करितात. याचा विशेष पेरा पुणें, सोलापूर, नगर व नाशिक या जिल्ह्यांत करितात. काळभोंडी केव्हां केव्हां हिवाळ्यांतहि करितात. पेरणीचा हंगाम फेब्रवारी व मार्च महिना होय. यांचा चारा कापणीस सुमारें तीन महिन्यांत येतो. कापणीनंतर वाफे व वरंबे सुधारून पुन: खत व पाणी दिल्यास दुसरी कापणी दोन महिन्यांत मिळते.
शा ळू.- हें पीक मुख्यत: हिवाळीं आहे. तथापि पाण्याची सोय व्यवस्थेशीर असल्यास तें उन्हाळ्यांतहि जोरानें वाढतें. पेरणीपासून तीन महिन्यांत चारा फुलवर्यावर येऊन तयार होतो. दर आठ दहा दिवासांनीं पाणी देत जावें.
निळवा.-याचा विशेष पेरा पुणें जिल्ह्यांत आढळतो. हें चार्याचें पीक मुख्यत: पावसाळीं आहे. पण उन्हाळ्यांतहि बरेंच पाणी दिल्यास पीक बरें येतें. याची पेरणी चांगला पाऊस झाल्यावर चारफणी पाभरीनें उभी आडवी करितात. म्हणजे सर्व जमिनींत बीं सारखें पसरलें जातें. हें कापणीस येण्यास सुमारें तीन महिने लागतात.
उ ता व ळी.-अरगडी अगर उतावळी ही देशावरील चार्याची एक जात आहे. ही जात खरीप व रब्बी हंगामाच्या मध्यावर पेरण्यास योग्य अशी आहे. म्हणजे हिचा पेरा आगष्टअखेरपर्यंत करण्यास हरकत नाहीं. ही जात ६०-७० दिवसांत फुलवर्यावर येऊन कापणीस तयार होते. बुडखा राखून कापणी करून पुन्हां पाणी दिल्यास दुसरी कापणी घेतां येते.
सॉ र घ म.-ही एक अमेरिकन ज्वारीची जात आहे. अमेरिकेंत याच्या ताटापासून रस कढून त्याचा गूळ तयार करितात. याच्या कणसामधील धान्य पक्के होईतों ताटांचीं पानें हिरवीगार रहातात. त्यामुळें या पिकापासून चारा व धान्य हीं दोन्ही एकदम मिळूं शकतात. याचा खोडवाहि चांगला येतो. पेरणीनंतर सुमारें ७५|८० दिवसांत पीक कारणीस तयार होतें.
इ म्फी.- ही एक परदेशी ज्वारीची जात आहे. या जातीचीं ताटें सॉरघमप्रमाणें गुळचट असतात. सॉरघमचा व इम्फीचा दाणा काळ्या बोंडांत वेष्टिलेला असतो.
म का.-हें पीक वर्षांतून केव्हांहि पेरितां येतें व तें कोणत्याहि स्थितींत गुरांस चारतां येतें. पीक फुलवर्यास येण्यापूर्वीं गुरांस चारलें तरी ते खाल्यानें शाळूप्रमाणें गुरांस अपाय होत नाहीं. पीक पेरल्यापासून तें दोन महिन्यांत चारण्यास तयार होतें. याच्या लागवडीस जमीन दमदार असून खत व पाणी यांचा भरपूर पुरवठा असावा लागतो.
रि आ ना ल क्झु रि अ न्स.-ही चार्याची जात आफ्रिकेंतील असून तिचा प्रसाद सरकारी फार्मच्या बाहेर फारसा झालेला नाहीं. हें पीक दिसण्यांत मक्यासारखें दिसतें. याच्या दोन कापण्या येतात व शेवटीं बीं येतें. याचें ताट थोडेसें कडक व तंतुमय असतें. ह्याचा पाला मक्यापेक्षां चरबट असतो.
ब फे लो ग्रा स.-हें सिंहलद्वीपांतील एक गवत आहे. तें पाणथळ जमिनींत बरें वाढतें. याचे लांब लांब ताणे येतात. ताण्यांचे नऊ इंच लांबीचे तुकडे करून त्यांची लागण करितात. याच्या वर्षांतून सात आठ कापण्या येतात.
गि नी ग व त.-कानडी गिनी हुक्कू हें गवत दिसण्यांत गवती चहासारखें दिसतें. हें ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळीं परदेशांतून हिंदुस्थानांत आलें असावें. हें गवत एकदां लाविलें म्हणजे बरींच वर्षें टिकतें व खत व पाणी यांचा ज्याप्रमाणें पुरवठा असेल त्याप्रमाणें त्याचें उत्पन्नहि वाढतें. गिनीगवत कोणत्याहि जमिनींत येतें; परंतु जमीन निचर्याची असावी. जमीन चांगली तयार करून दर एकरीं शेणखत सुमारें तीस गाड्या द्यावें व नंतर पावसाच्या तोंडीं दीड दोन फूट हमचौरस अंतरानें ठोंबांचे तुकडे ( प्रत्येक आंब्यांत ५-६ बुडखे मुळासहित ) करून लागण करावी. बिंयापासूनहि याची लागण करितां येते. परंतु याला फार उशीर लागतो. मुळांनी जीव धरला म्हणजे सर्या व पाट करावेत. पावसाळ्याखेरीज सर्व वर्षभर प्रत्येक दहाबारा दिवसांनीं पाणी देत जावें. भांगलणी करून किंवा प्रत्येक कापणीनंतर नांगराचीं आडवीं उभीं तासें घालून जमीन स्वच्छ ठेवावी. दरवर्षीं सुमारें पंधरा गाड्य शेणखत देत जावें. या गवताच्या दरवर्षीं नऊपासून दहापर्यंत कापण्या होऊन दर एकरीं अजमासें १८००० ते २०००० पौंड हिरवा चारा मिळूं शकेल. गिनीगवताचें शेत दर तीन चार वर्षांनीं बदलावें.
वा टा णा आ णि ओ ट.-ह्याचें थंडीच्या दिवासांत चांगेलं येतें. ओट हें परदेशी पीक आहे. याचें मिश्रपीक सरकारी मिलिटरी फार्मांत फार करितात. याचा पाला वाळवूनहि गुरांनां चारतात. याला पाण्याची व खताची योग्य तजवीज पाहिजे. हें पेरिल्यापासून अडीच ते ३ महिन्यांनीं तयार होतें.
वा ल.-हा नदीबूड रानांत व कधीं कधीं मळईंतहि चार्याकरितां करितात. याचे वेल फार पौष्टिक असतात. पेरणीपासून पीक सुमारें तीन महिन्यांत कापणीस तयार होतें.
चव ळी.-चवळीच्या बर्याच जाती आहेत. त्यांपैकीं हळव्या जाती चार्याकरितां पसंत कराव्या हें पीक ७०-८० दिवसांत कापणीस येतें.
मे थी.-ही चार्यासाठीं नाशिक व पश्चिम खानदेश या जिल्ह्यांत पेरितात. हा पौष्टिक व लुसलुशीत चारा गुरें मोठ्या आवडीनें खातात. कामकरी व दुभत्या जनावरांस हा चारा चांगला मानवतो. हा एक जनावरास रोजीं १५|२० पौंड देण्यात हरकत नाहीं. चार्याच्या पिकाला एकंदर सहा वेळा पाणी द्यावें लागतें.
ल सू ण घां स.-( विलायती गवत ) गुज. विलायती घास. कानडी बिलायती हुल्लू. हें पीक परदेशांतून आलेलें असून तें दिसण्यांत मेथीसारखें दिसतें. याची वैरण पुष्टिकारक असते. पाण्याचा व खताचा भरपूर पुरवठा असल्यास जनावरांनां वर्षभर उत्तम लुसलुशीत ओली वैरण यापासून मिळूं शकते.
या पिकाला जमीन निचर्याची असावी. मध्यम काळी व काळी, सुमारें तीन फुटांखालीं मुरूम असलेली जमीन पसंत करावी. जमिनीचा चांगली मशागत करून ती सुमारें एक फूटभर खोल भुसभुशीत करावी. दर एकरीं ३०|४० गाड्या शेणखत देऊन तें जमिनींत चांगलें मिसळावें याची लागण दोन तर्हेनें करितात. एका पद्धतींत दहा फूट औरस चौरस वाफे करून त्यांत हातानें बीं फेंकितात. दुसर्या पद्धतींत दोन दोन फुटांच्या अंतरानें दांड पाडून त्याच्या माथ्यावर बीं पेरितात. दुसर्या पद्धतींत जमीन सपाट असणें जरूरीचें आहे. पहिल्या पद्धतींत निंदणीं टिपणी हातानेंच करावी लागते पण दांडच्या लागवडींत ती बैलांच्या सहाय्यानें थोड्या खर्चांत आटोपतां येते. वाफ्याच्या पेरणींत बीं दर एकरीं १२|१५ पौंड लागत असून दुसर्या पद्धतींत तें ६|८ पौंड पुरतें. पहिल्यानें ३|४ वेळ पाणी ४ दिवसांच्या अंतरानें द्यावें. पुढें हिंवाळ्यांत प्रत्येक दहा दिवसांनीं व उन्हाळ्यांत आठ दिवसांनीं पाणी देत जावें. लसूणघांसाचें पीक वरचेवर तण काढून स्वच्छ ठेवावें व वर्षांतून तीन चार वेळ थोडथोडें खत देत जावें. दर खेपेस चांगल्या कुजलेल्या शेणखताच्या पांच गाड्या द्याव्या म्हणजे पुरें आहे. पहिली कापणी सुमारें दीड दोन महिन्यांनीं येते. व पुढें प्रत्येक कापणी सरासरी सव्वा महिन्यानें येते.
दर एकरी कापणीस सुमारें २००० पौंड ते ३००० पौंड घांस निघतो. प्रत्येक जनावराला सुमारें दहा पौंडांपेक्षां रोज जास्त गवत घातल्यास जनावराचें पोट फुगून अपाय होण्याचा संभव असतो. लसूणघास कापल्यावर लागलाच गुरांनां न चारतां तो कांहीं वेळपर्यंत हवेंत पसरून जरासा सुकूं द्यावा व मग गुरांनां चारावा.
ब र सी म.-बरसीमहि एक लसूणघासासारखी ईजिप्त देशांतील चार्याची जात आहे. हिचें उत्पन्न सिंध प्रांतांत व पंजाबांत चांगलें येतें. उत्तर गुजराथ व कोंकण येथें याचे प्रयोग चालू आहेत. ‘घोडेघांस’ व ‘गवत’ यांवर स्वतंत्र लेख आहेत.
च रा ई सं शो ध न-स्वत:चा योगक्षेम चालवून समाजांतील इतर भागाला अन्नवस्त्र पुरविण्यासाठी शेतकरी वर्गानें आपलीं गुरेंढोरें कार्यक्षम स्थितींत राखणें अत्यंत जरूरीचें आहे. परंतु हल्लींच्या दुष्काळी युगांत जनावरांच्या चाराचराईचा प्रश्न फार बिकट होऊन बसला आहे. म्हणून मुंबई इलाख्याच्या शेतकीखात्याचे डायरेक्टर यानीं या प्रांताच्या शेतकीची आर्थिक पहाणी करून २० व्या शतकाच्या आरंभींच वरील बाबींत लोकांची हीन स्थिति होत चालली आहे असा निष्कर्ष काढला व ती सुधारण्यासाठीं चराईसंशोधनाचा उपक्रम केला.
तदनुरूप डॉ. हॅरल्ड. एच्. मॅन यानीं चार्याच्या कांहीं पिकांसंबंधानें प्रयोग केले. त्यांत पिकांचा वृत्तान्त. धर्म, संवर्धन, त्यांचें रासायनिक पृथक्करण, त्यांतील घटकावयव, पोषक द्रव्यें व त्यांचें प्रमाण, तत्संबंधीं जनावरांची अभिरूचि व आवडनावड, त्या पिकांना लागणारा खर्च व येणारें एकरीं उत्पन्न इत्यादि गोष्टींचा विचार केला गेला. त्याच्या मागोमाग डॉ. बर्न्स यानीं कुरणांतील सहज उगवणारीं कांहीं रानगवतें व कडवळें यासंबंधीं माहिती मिळविली व यांमध्यें उच्चनीच असे वर्ग लावून त्यांतील कांहीं तृणकडवळांच्या मिश्रणाची चराऊ रानांत लागवड करून चार्याची पैदास करण्यास सुरूवात केली. याबरोबरच मुंबईच्या सासून डेव्हिड् ट्रस्ट मंडळाकडून आपल्या कर्ययोजनेंत “इलाख्यांतील निकस चराऊ रानांची सुधारणा” या प्रश्नाचा समावेश केला जाऊन त्याबाबत संशोधन करण्यासाठीं श्री. गणेश महादेव चक्रदेव यांची निराळी नेमणूक झाली. त्यांच्या संशोधनामधून जी फलनिष्पत्ति झाली तींत खालील ठळक गोष्टींचा सिद्धांत निष्कर्ष निघाला.
( १ ) सर्वच पडिक, चराऊ रानें एकसारखीं निकस असत नाहींत. अशा रानांत निसर्गत:च मोठमोठे विभाग उत्तम कुरणें म्हणून असतात. परंतु यांच्यावर एकसारखी चर चालू असल्यामुळें चांगलीं आवडीचीं गवतें आधीं खाल्लीं जाऊन, त्यांनां वाढावयास बिया उत्पन्न करून आपला वंश चालू ठेवण्यास वाव मिळत नाहीं व म्हणून त्यांतील चांगल्या विभागांचा बहुमोलपणा झांकला जातो.
( २ ) अशीं सर्व रानें वाईट मानलेल्या ‘कुसळ’ गवतानेंच प्रामुख्यानें व्यापिलीं असत नाहींत. कुसळरहित असे शेंकडो विभाग विस्तीर्ण पसरलेले असतात. शिवाय या सर्व कुसळी अगर बिनकुसळी रानांमध्यें पँनिकम्, इस्किमम् यांसारख्या गणांतील चांगल्या गवतांच्या अनेक जातिहि बर्याच संमिश्र असतात.
( ३ ) आजवर कुसळगवताची जात फक्त बहुवर्पायूच आहे अशी समजूत असून ग्रंथांतूनहि त्याची तशीच नोंद आहे. परंतु हीमध्यें मोठी व धाकटी अशा दोन पोटजाती असून पैकीं पहिली बहुवर्षायु व दुसरी एक वर्षायु आहे असें दिसून आलें आहे. शिवाय पहिली जात चांगल्यापैकीं आहे असेंहि निदर्शनास आलें आहे.
( ४ ) पहिल्या सिद्धांतानुरूप रानाची योग्य पहाणी करून त्याचे कापणीलायक, चराऊ, वगैरे निरनिराळे विभाग करावेत. नंतर त्यांत चर, काप व राख या क्रिया आलटून पालटून मुदतीमुदतीनें करीत जाव्या म्हणजे रानें सुधारून नेहमींच चांगल्या स्थितींत रहातात व या रीतीनें गुरांच्या चार्याची भरपूर व पुष्टिदायक पैदास होईल.
( ५ ) वरील योजनेमुळें चराऊ रानांत तीं नांगरून व कुळवून तृणकडवळाच्या मिश्रणाच्या लागवडीनें चार्याची पैदास करण्याची पद्धत आपोआपच बाजूला पडते. शिवाय ती शास्त्रीयदृष्ट्या चूक, आर्थिकदृष्ट्या आंतबट्ट्याची व व्यावहारिकदृष्टचा विफलदायी अशी ठरते. तेव्हां कुसळी गवताचें उच्चाटण करण्याच्या पाठीमागें निराळें न लागतां वरील योजना अमलांत आणल्यास निकस चराऊ रानें चांगलींच सुधारतां येतील.