विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चारण - या जातीची लोकसंख्या सुमारें पाऊण लाख आहे. मुख्य वस्ती मुंबई इलाखा व राजपुताना यांतून आहे. मुंबई इलाख्यांत कच्छ, काठेवाड, गुजराथ, सिंध व राजपुताना येथें हे लोक आहेत. चारण हे गाढवें पाळणें व मडकीं करणें हीं कुंभारांचीं कामें पूर्वीं करीत असत. गुरें पाळणें, रजपूत व काठी यांचे पोवाडे गाणें व भीक मागणें हे यांचे मूळचे धंदे होत. अजूनसुद्धां काठी लोकांच्या वंशावळींची माहिती या लोकांनां आहे. हल्लीं हे गुराखी, व्यापारी, कापडवाले व शेतकरी आहेत. भाट लोकांप्रमाणेंच पूर्वीं हे लोक वचनाबद्दल जामीन रहात असत व वचनभंग केल्यास त्रागा करण्याची धमकी घालून ते वचन पाळावयाला भाग पाडीत असत. कच्छप्रांतांतील खालचे लोक चारण बायकांनां माता मानून त्यांमध्यें दैविक शक्ति असते असें समजतात.
गुजराथचारणामध्यें गुजर, कच्छेला अथवा पर्जिया, मारूस, व टंबेल अशा चार पोटजाती असून एका पोटजातीचा दुसरीशीं विवाहसंबंध होत नाहीं. लग्नासंबंधीं चाली फार निरनिराळ्या आहेत. मारवाडीचारणामध्यें रोटीबेटी व्यवहार होत नाहीं. हे लोक नियमानें जानवें घालतातच असें नाहीं. मुलींची लग्नें वयाच्या १०-१२ वर्षापर्यंत होतात. रेवाकांठा पंचमहालमधील चारणांखेरीज इतर सर्व चारणांमध्यें पुनर्वावाहाची चाल आहे. घटस्फोटाबद्दल वेगवेगळ्या चाली आहेत. हे लोक मांसाहारीहि आहेत. अहीर, लोहार, दरजी व रजपूत लोकांबरोबर हे जेवतात. मुलगा वारस नसल्यास त्या कुळांती पुरूषांस वारसाचा हक्क जातो. हे लोक हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या पंथांचे असून अंबा व भवानी देवीचे उपासक आहेत. मेवाड, सारस्वत, श्रिगुड, राजगुरू, पारजिया व कांहीं ठिकाणीं श्रीमाळी ब्राह्मण यांचे उपाध्याय आहेत.