विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चार - ( चारोळ्या ) हें एक मोठें झाड आहे. यास संस्कृतमध्यें राजादनू, मराठींत चार किंवा चारोळ्या, हिंदींत चिरंजी वगैरे नांवें आहेत. कोंकण, नागपूर प्रांत व मलबार या प्रांतांत हीं झाडें पुष्कळ आहेत याचीं पानें लांबोडीं असून तीं मोहाच्या पानाएवढी मोठीं असतात. याच्या पत्रावळी लावतात. याची छाया फार थंड आहे. याचें लांकूड कांतीव कामास फारसें उपयोगीं पडत नाहीं. या झाडास लहान लहान फळें येतात. त्यांच्या बियांत तुरीएवढ तांबूस रंगाचे दाणे असतात. त्यांस चारोळ्या म्हणतात. चारोळ्या मिठाईंत व पक्वान्नांत घालतात. चारोळ्यांचें तेल निघतें. तें बदामाच्या तेलासारखें थंड आहे. चाराच्या पक्व फळांचा रंग जांभळा असतो. हीं फळें मधुर असतात.