विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चाम - इंडोचीनमधील एक जात. ही प्राचीन चंपामधून आलेली आहे. हल्लीं त्याची संख्या १३०००० इतकी आहे. अनाम, कँबोडिया व कोचीनचीन या भागांत त्यांची वस्ती असून सयाममध्येंहि चाम लोक आढळतात, मूळचे मलायीपॉलिनोशियन जातीचे हे लोक आहेत; प्रथमत: इंडोचीन, अनाम व चंपा येथें प्राचीनकाळीं हे लोक होते असें आढळतें. चाम जातीच्या लोकांचें येथें राज्य असून त्यांत कोचीनचीन अनाम व कँबोडिया यांचा अन्तर्भाव झालेला होता १४७१ मध्यें चंपा हें अनाम लोकांच्या ताब्यांत गेलें; त्यावेळीं बरेचसे चाम लोक कॅम्बोडियामध्यें गेले. एकोणिसाव्या शतकांत चाम लोकांचा मुलूख फ्रेंचांनीं घेतला व त्यांची अनामी लोकांपासून मुक्तता झाली. प्राचीन चंपा नगरीच्या चाम लोकांचा हिंदुधर्म असून त्रैमूर्तीची ते उपासना करीत. नंतर बुद्ध धर्माचा पगडा चाम जातीवर बसला व शेवटीं इस्लामधर्मानें चाम जातींत प्रवेश केला. आजमितीच्या चाम लोकांचा धर्म म्हणजे ब्राह्मणधर्म व इस्लामीधर्म यांचें मिश्रण होय. या दोन्ही धर्माचें एकढें विकृत स्वरूप या जातींत आढळून येतें कीं ब्राह्मण कोण व इस्लामी कोण हें ओळखणें आज कठिण आहे. ब्राह्मण चाम लोकांनां जाट ( जटा ) अथवा ‘मूळचे चाम’ असें म्हणण्यांत येतें. इस्लामी चाम लोक त्यांनां काफीर, अकाफीर व नास्तिक अशीं नांवें ठेवतात. मुसुलमानी चाम हे स्वत:स बनी व इस्लामचाम असें म्हणवून घेतात. कॅम्बोडियांतील बहुतेक चाम मुसुलमान झालेले आहेत.
ब्राह्मण चाम जातींत शैव पंथाचा बराच प्रसार झालेला असला तरी सध्यां ते लोक जवळ जवळ मुसुलमानच बनले आहेत. पो यान मोह, पो जाटा, व पो अलव्हा अथवा अल्ला असे त्यांचे तीन देव असून पो इनो नोगार, पाजायू यान व पोयान दारी अशा तीन देवी आहेत. या देवतांनां कांहीं मुलें असून त्यांचीहि निरनिराळीं नांवें आहे. वरील देवतांनां विविध नैवेद्य अर्पण करण्यांत येतात. व त्यांच्या नांवानें कांहीं सण व उपासहि पाळण्यांत येतात. या देवतांसंबंधीं चाम लोकांत अनेक दंतकथा प्रचलित आहेत. देवतांप्रमाणें धर्मगुरू व उपाध्ये बरेच आहेत. त्यांचा पोषाख विशिष्ट तर्हेचा असून ते सर्व धर्मकृत्यें चालवितात.
पोर्डिमोग्रू, पोयान, इनो, नोगर, बसाइह, कोमेनेइ, कथार, मोडवान व पजायू इत्यादि नांवें निरनिराळे धार्मिक विधि करणार्या उपाध्यायांचीं असतात. कटे व काबूर हे त्यांचे मोठे धार्मिक उत्सव प्रतिवर्षीं होतात; व त्या समयीं मेजवान्या व यज्त्र करण्यांत येतात. किरकोळ उत्सवहि नेहमीं होत असतात. धर्मकृत्यें करतांना कांहीं पवित्र पदार्थांचा व भांड्यांचा उपयोग करण्यांत येतो. बालनोह, बगनराक, हबाडक, बाक, कलैह, सान, स्वाक, कराह, कनोम व गैचरान इत्यादि नांवें कांहीं धार्मिक उपकरणांचीं असल्यानें आढळते. प्राचीन काळीं त्यांच्यांत नरयज्त्र होता व मनुष्याच्या रक्तानें देवासस्नान घालण्याची पद्धति होती असें म्हणतात.
मुसुलमान चाम अथवा बनी लोकांत इस्लामी धर्म प्रथम कसा व केव्हां शिरला हें अनिश्चित आहे. एखाद्या अरबानें इ. स. १००० च्या सुमारास चंपा येथें इस्लामचा प्रसार केला असावा कॅम्बोडिया व अनाम येथें बरेच मुसुलमानी धर्माचे अनुयायी आहेत. पो, इनाम, इतीब, मोदिन, अक्रार इत्यादि बनी चाम लोकांचे धर्मगुरू व उपाध्याय असतात. मुसलमानी धर्मगुरूप्रमाणें त्यांचा एक विशिष्ट पोषाखहि असतो. करोह व ताबा यासारख्या मोठ्या मेजवान्या व रमझान रोझासारखे उपवास करण्यांत येतात.
१५ ते १८ वर्षांची वयोमर्यादा स्त्रीपुरूषांच्या लग्नाच्या बाबतींत पाळली जाते. या जातींत स्त्रियांचा योग्य दर्जा राखला जातो व त्यांनां बरेच हक्क देण्यांत आले आहेत. ब्राह्मण चाम लोकांत अशी समजूत आहे कीं, पुण्यवान् पुरूषांचे आत्मे सूर्यावर जातात, स्त्रियांचे चंद्रावर जातात व इतर हलक्या लोकांचे ढगांवर जाऊन राहतात. कित्येक देवपणास पोचतात व पापात्मे नीच योनींत जातात. [ ए. रि. ए. ].