विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चांभार - चमार किंवा चर्मकार हे शब्द चर्मकार या संस्कृत शब्दापासून झाले आहेत. यांचा मूळ प्रांत बिहार व संयुक्तप्रांत असून हल्लीं हिंदुस्थानांतील सर्व भागांत हे आहेत. १९०१ च्या खानेसुमारीवरून पाहतां या जातीचे तेवीस निरनिराळे धंदे दिसतात; पण त्यांचे मुख्य धंदे शेतकी व कातड्याचें काम हेच आहेत. कातडीं कमावण्याचा धंदा न करितां कमावलेल्या कातड्याचे जोडे व इतर जिन्नस करणारे लोक स्वत:स मोची हें नांव घेतात; व आपला दर्जा जरा उच्च समजतात. या जातीच्या लोकांनीं बरेंच धर्मांतर केलें आहे. त्यांची संख्या पुढीलप्रमाणें ( आंकडे १९०१ सालचे आहेत ). आहे.
चमार | मोची | |
हिंदु | ११,०४३,०९३ | ५३१९२५ |
मुसुलमान | १६९९२ | ४७५४४० |
शीख | ७६२६३ | ५४ |
जैन | ५७ | २३९ |
बौद्ध | १९ | ... |
एकंदर हिंदुस्थानांत चांभारांची संख्या सुमारें १ कोटीं १५ लक्ष आहे. पैकीं ६० लक्ष संयुक्तप्रांतांत आहे. मुंबई इलाख्यांत सुमारें तीन लाख आहे. वेदकालीं आणि बुद्धाच्या पूर्वीं चामडें कमावण्याचा धंदा कमी दर्जाचा समजला जात नव्हता. यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेंतील पुरूषमेधसंबंधीं प्रकरणांत चांभार हा बळी देण्यास योग्य आहे असें म्हटलें आहे.
मुंबई इलाख्यांत यांच्या आडनांवांवरून यांचीं कुळें ठरलीं गेलीं आहेत. यांमध्यें देवकें असून एकाच देवकांतील लोकांचें परस्परांशीं विवाहसंबंध होत नाहींत. लग्नें बाळपणीं होतात. पुनर्विवाह व घटस्फोट या चाली यांच्यामध्यें रूढ आहेत. हे हिंदू आहेत व यांचा वारसासंबंधीं कायदा हिंदूंप्रमाणेंच आहे. यांचे उपाध्याय ब्राह्मण आहेत. ठाणें प्रांतांत कुंभार व अहमदनगरांत जंगम हे यांच्या हे यांच्या क्रियाकर्माच्या वेळीं उपाध्याय असतात.
का न डी चां भा र.-यांमध्यें आठ पोटभेद आहेत. आतेभाऊ व मामेबहीण यांमध्यें विवाह होतो. पुनर्विवाहाची चाल यांच्यांत आहे. कर्नाटकांतील चांभारांत घटस्फोट होतात पण कानडा जिल्ह्यांतील चांभारांत घटस्फोटाची चाल नाहीं. हे स्मार्त असून यांचा वारसासंबंधीं कायदा हिंदूंप्रमाणेंच आहे. हविक ब्राह्मण लग्नप्रसंगीं यांचे उपाध्ये असतात.
नाशिक जिल्ह्यांत दक्षिणीचांभारांचा भरणा आहे. यांचा धर्मगुरू निफाड तालुक्यांतील सकेना येथील “भगतबावा” हा आहे. भगतबावा गुरूपदेश देतो. गुरूपदेश घेण्यापूर्वीं, चोरी, चहाडी व छिनालकी न करणें हे तीन नियम आचरण्याबद्दल कबुली द्यावी लागते. मालेगांव नांदगांव, चांदूर वगैरे ठिकाणीं दरसालीं भगत बावाची फेरी असते. अहिर्वाल, जातवा, ढोर व कताई अशा चार परदेशी चांभारांच्या पोटजाती या जिल्ह्यांत आढळतात. यांचे सर्व धर्मविधी इतर चांभारांप्रमाणेंच असतात. लग्नप्रसंगीं अंत:पट धरण्याची चाल नाहीं. त्याऐवजीं नवरानवरीला एक स्तंभाभोंवतीं सात प्रदक्षिणा घालाव्या लागतात. यांत व्याहीभोजन नाहीं. व कार्य आटपेपर्यंत मांसभक्षण वर्ज्य करण्याची चाल यांच्यामध्यें आहे. हे भवानीचे उपासक आहेत.
मध्यप्रांत व वर्हाडांत यांची संख्या ९००००० आहे. पैकीं ६००००० संस्थानांत व छत्तीसगडांत आहे. यांचें व हिंदूंचें युद्ध चालू आहे असें रसेल म्हणतो ! महाराष्ट्रांत चांभारांची उत्पत्ति धीवर बाप व चांडाळ आईपासून झाल्याबद्दल कथा सांगतात. पण चांभारांचा बांधा, चेहर्याचा सुबकपणा पुष्कळ जागीं आढळतो. मुंबई इलाख्यांतील कानडी जिल्ह्यांत तर चांभार बायका फार सुंदर असून पद्मिनी जातीच्या नायिका त्यांच्यांतच सांपडतात. छत्तीसगडांत सुद्धां चांभार लोक उंच बांध्याचे, साधारण गोर्या रंगाचे असून ब्राह्मणांपेक्षां जास्त सुंदर दिसतात. यांच्या शरीराचा सदृढपणा व सुंदर बांधा त्यांच्या प्रौढविवाह व मांसाशनामुळें असावा असें रसेल म्हणतो.
चांभार लोक स्वत:स रविदास म्हणवितात. रविदास हा रामानंदाचा शिष्य होता. यांचे असगोत्र विवाही पुष्कळच उपवर्ग आहेत. त्यांपैकीं सतनामी चांभार हा फार मोठा वर्ग आहे. इतर चांभार सतनामी चांभारांस झाडिया म्हणतात. सतनामी लोक चर्माचा धंदा सोडून सगळे शेतकरी झाले आहेत. यांपैकीं चुंगिया वर्ग तंबाखू ओढतो. यांच्या अहीरवार व कनपतिया अशा जातीहि आहेत. अहीरवारांचा दर्जा जरासा उच्च आहे. रामदास किंवा रोहिदासाच्या पुष्कळ बायकांपैकीं एक अहीर जातीची होती तिचे हे वंशज आहेत असें म्हणतात. कनौजिया व अहीरवारांस बाहेरचे लोक पैका म्हणतात. कांहीं गांवांत मेलेलीं गुरें नेणारांस कातडीं देण्याची चाल आहे. चांभारांच्या बायका गांवच्या सुइणी असतात. अशा चांभारांस मेहेर म्हणतात. कनपजिया एकाच तुकड्याचा जोडा करतात, व अहीरवार पुढचा भाग कापतात. जोड्यावर कलावतूचें काम करण्यांत अहीरवार मुलगी जोपर्यंत कौशल्य दाखवीत नाहीं. तोंपर्यंत तिचें लग्न होत नाहीं. जैसवार चांभार मोतद्दारीची नोकरी करतात. हे फक्त डोक्यावरूनच ओझें नेतात. खांद्यावरून नेत नाहींत. यांमध्यें भदावरी, अंतर्वेदी, परदेशी, गंगापारी, देशवार अशा पोटजाती आहेत. विधवांनीं वाटेल त्याच्याबरोबर लग्न करावें. छत्तीसगडांत विधवांचे दोन वर्ग आहेत. वारंडी व रंडी. अक्षतयोनी विधवेस वारंडी म्हणतात. व इतरांस रंडी म्हणतात. पहिल्या प्रकारच्या विधवेनें नवरा मेल्यावर बांगड्या फोडण्याची जरूरी नाहीं. अशा मुलीस मागण्या फार येतात व तिचा शुल्कहि पुष्कळ मिळतो. पहिला नवरा जिवंत असतांना जर स्त्रियेचें लग्न करावयाचें असलें तर त्यास छंदवेवनाना म्हणतात. दुसर्या नवर्यास पहिल्या नवर्याचा खर्च द्यावा लागतो. पहिल्या नवर्याची मालमत्ता किंवा संपत्ती त्याच्याच घरीं रहाते व अगदीं तान्हीं मुलें खेरीज करून मुलेंहि त्याच्याच घरीं रहातात. जातपंचायतीसमोर नवराबायकोनें एक काडी मोडली कीं घटस्फोट झाला. चांद्यांत काडी मोडलेल्या बाईची गवताची प्रतिमा करून जाळतात.
छत्तीसगडांत विवाहसंबंध फार कडक रीतीनें कधींच पाळीत नाहींत. व व्याभिचार हा गुन्हा तर कधींच समजला जात नाहीं. राजरोसपणें नवर्याला सोडून स्त्रियांनीं दुसर्याबरोबर कांहीं दिवस रहाण्यास जावें व हौस पुरली म्हणजे पुन्हां नवर्याकडे परत यावें. कधीं कधीं दोघांची फारच दृढ मैत्री असली किंवा दोन माणसांनीं महाप्रसाद केला असला तर परस्परांनीं परस्परांच्या बायका खुशाल वापराव्या. असें रसेल व हिरालाल म्हणतात !
सागराकडे चांभार मरीची पूजा करतात. सिवनीस एरंडाच्या झाडाची पूजा करतात. छत्तीसगडांत सुधारक सतनामी पुष्कळ आहेत.
कातडे स्वच्छ करून कमाविणारे सारे ८०,००० लोकच आहेत. गांवातील चांभाराचा, मेलेल्या गुरांचें कांतडें फुकट मिळावें असा हक्क होता. आतां कसायास हिंदुलोक सुद्धां गुरें विकूं लागल्यामुळें यांचा धंदा बुडत चालला. सागराकडे यांची फारच दैन्यावस्था आहे. तेथें यांनां बेगारीस धरतात. हेच लोक बैलास खच्ची करतात. आतां छत्तीसगडांतील चांभार आसाममध्यें चहाच्या मळ्यांत नोकरीस जाऊं लागले आहेत व खरगपुरास आगगाडीच्या कारखान्यांत हे नौकर आहेत. हे लोक मुहूर्त वगैरे पाहण्यास ब्राह्मणांच्या घरीं जातात त्यांस आपल्या घरीं बोलावीत नाहींत. हे लोक अत्यंत गुन्हेगार वर्गापैकीं आहे. गुरांनां विष घालण्याची यांना फारच वाईट खोड आहे. गुरांची चोरी देखील हे करतात. शेणांतून धान्य काढून त्यावर निर्वाह करण्याची यांच्यापैकीं कांहींनां संवय असल्यामुळें लोक यांचा फार तिरस्कार करतात. या जातीची लोकसंख्या ( १९११ ) आसामांत ५४२३४, काश्मीरांत ३९०९९, पंजाबांत १४२८७०४ आहे.
[ संदर्भग्रंथ-थर्स्टन; क्रूक; रसेल व हिरालाल; मुं. गॅ.; से. रि.; रिस्ले-ट्राईब्स अँड कास्ट्स ऑफ बेंगाल; शेरिंगहिंदु ट्राईब्स अँड कास्ट्स; रोज ग्लॉसरी; ब्रिग्स्-दि चमार्स. ].