विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चांद्रायण - यथोचित कर्म न घडल्यास देहदंडरूप असें हें प्रायश्चित्त आहे. याचे यवमध्य व पिपिलीकामध्य असे दोन प्रकार आहेत. शुक्लपक्षांतील प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत दररोज भोजनांत कुक्कुटांडप्रमाणानें एक एक घांस ( प्रतिपदेस एक, द्वितीयेस दोन असे ) वाढवून कृष्णपक्षांतील प्रतिपदेपासून दररोज एक एक घांस कमी घेत घेत अमावास्येस उपोषण करणें यास यवमध्यचांद्रायण असें म्हणतात. आणि कृष्णपक्षांतील प्रतिपदेस एक एक घांस याप्रमाणें आरंभ करून अमावस्येपर्यंत वाढविणें व पुन्हां प्रतिपदेपासून एक एक घांस कमी करीत येऊन पौर्णिमेस उपवास करणें यास पिपीलिकामध्यचांद्रायण असें म्हणतात. याशिवाय कृच्छ्रचांद्रायण हा आणखी एक प्रकार आहे. याच्या संबंधीं व कृच्छ्रप्रायश्चित्तांसंबंधीं धर्मसिंधु, निर्णयसिंधु इत्यादि धर्मग्रंथांत सविस्तर माहिती दिली आहे.