विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चांदूर बाजार - वर्हाड मध्यप्रांत. उमरावती जिल्हा. इलिचपूर तालुक्यांतील गांव. लोकसंख्या ( १९११ ) ५२०८. उमरावतीच्या उत्तरेस २२ मैल व इलिचपूरच्या पूर्वेस १४ मैल हें गांव आहे. इलिचपूरचा नबाब नामदारखान याच्या ताब्यांत सुमारें ९५ वर्षांपूर्वीं हा जहागिरीचा गांव होता. त्यावेळीं त्यानें येथें बाजार वसविला. त्यावेळेपासून हा गांव प्रसिद्ध आहे. हल्लीं मोर्सी आणि हिवरखेडें येथें नवीन बाजाराच्या पेठा झाल्यामूळें, आणि वर्हाडांत मोठमोठ्या कंपन्या दलालांशीं फारसा व्यवहार न ठेवतां शेतकर्यांपासूनच परस्पर माल विकत घेत असल्यामुळें या बाजाराचें महत्व कमी होत चाललें आहे. मध्यप्रांताची सीमा येथून आठ मैलांवर आहे. आणि खामळा मुलताई, बैतुल येथून काकवी, गूळ, गहूं, गोंद वगैरे जिन्नस या बाजारांत येतात. गुरांचाहि बाजार येथें भरतो. बाजार चांगला बांधलेला असून दिवे, पाण्यातचीं टांकीं, सामान ठेवण्याकरितां जागा. झाडें वगैरे व्यवस्था चांगली आहे. येथें स्ट्ट्याचा व्यापार फार चालत असल्यामुळें नेहमीं दिवाळीं निघतात. येथें वीस-पंचवीस वर्षें सतत चाललेलें दुकान एकहि नाहीं. आठवड्याचा बाजार दर रविवारीं भरतो.