विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चांदला - मध्यप्रांत. चांदा जिल्हा. क्षेत्रफळ १७ चौरस मैल. ही जमीदारी जरी बरीच प्राचीन आहे तरी हल्लींच्या जमीनदारांच्या पूर्वजांस ही अगदीं अलीकडे इ. स. १८२० मध्यें मिळाली. हल्लींचें घराणें व पनरवस जमीनदाराचें घराणें यांचें परस्पर नातें आहे. पूर्वेस खुटगांव जमीनदारी; पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांस गडचिरोळी तहशील. हींत एकंदर अकरा खेडीं असून पैकीं सात खेड्यांत वस्ती आहे. जमीन बहुतेक रेताड असून भाताचें पीक मुख्य आहे. येथील घराणें राजगोंडांचें आहे. उत्पन्न ४०० रू. ते ५०० रू. टाकोळी ३० रू. व इतर कर रू. १६-८-०.