विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चांगभकार - मध्यप्रांतांत एक मांडलिक संस्थान आहे. याचें क्षेत्रफळ ९०४ चौ. मैल आहे. हें सन १९०५ सालच्या पूर्वीं बंगालच्या छोटानागपूर प्रांतांत होतें. याच्या पूर्वेंस कोरिया संस्थान व दक्षिणेस, पश्चिमेस आणि उत्तरेस मध्यहिंदुस्थानांतील रेवा संस्थान आहे. हा अतिशय डोंगराळ मुलूख आहे. यांत एका पाठीमागून एक अशा कित्येक टेंकड्या लागतात व त्यांवर सालवृक्षांचीं जंगलें आहेत. यांत बनास, बप्ती आणि नेऊर या नद्या आहेत. येथील जंगलांत वाघ, चित्ते, अस्वल आणि नाना तर्हेचे मृग आढळतात. पूर्वीं मराठे व पेंढारी लोकांकडून इतका उपद्रव होत होता कीं या संस्थानिकाला त्यांचा प्रतिकार करण्यासाठीं रेवा संस्थानांतील रजपूतास आठ गांव इनाम द्यावे लागले. इ. स. १८१९ त हें संस्थान ब्रिटिश सरकारकडे आलें येथील संस्थानिकाचें राहाण्याचें ठिकाण भरतपूरास आहे. यांतील हरचोकजवळच्या डोंगरांत पुष्कळ कोरीव लेणीं आहेत. येथील लोकसंख्या सन १९०१ त १९५४८ होती. यांत गोंड व होस लोकांची वस्ती फार आहे. हे लोक शेतकी करून आपली उपजीविका करतात. रेवा संस्थानांतील व्यापारी लोक येथें येऊन साखर, गूळ, मीठ कापड वगैरे जिन्नस विकतात. या संस्थानिकास इ. स. १८९९ त आपल्या संस्थानांतील कारभार पहाण्यास कांहीं अटींवर सनद दिली. हें संस्थान ब्रिटिश सरकारास ३८७ रू. खंडणी देतें. सन १९०५ मध्यें पुन्हां सनद देण्यांत आली व ही खंडणी २० वर्षेंपर्यंत मुक्रर करण्यांत आली. शेतावर सारा बसविणें, शेतसारा गोळा करणें, कर बसविणें, न्यायखातें, अबकारीखातें, मीठ, अफू किंवा संस्थानसंस्थानांमध्यें वाद वगैरे बाबतींत हा संस्थानिक छत्तिसगड कमिशनरच्या अंकित आहे. चीफ कमिशनरच्या परवानगीशिवाय या संस्थानिकास आयात किंवा निर्गत मालावर जकात बसविण्याचा अधिकार नाहीं. या संस्थानांतील सर्व खनिज पदार्थांवर ब्रिटिश सरकारचा पूर्ण ताबा आहे. या संस्थानिकास कमिशनरच्या संमतीशिवाय ५ वर्षांवर कैद किंवा ५० रू. वर दंड करण्याचा अधिकार नाहीं. येथील जमा व खर्च सन १९०४-०५ त रू. १३००० होता. जमीनदार लोकांनां ठराविक सार्यानें संस्थानिकाकडून जमिनी मिळतात. शेतकरी लोकांचा जमीनीवर हक्क जोंपर्यंत ते सारा वेळच्या वेळीं पटवितात तोंपर्यंत असतो. येथें एक कैदखाना आणि एक शाळा आहे. येथील शिक्षण फारच मागसलेलें आहे.