विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चाकवत -या झाडास लॅटिनमध्यें चेनोपोडिअम् आलबम्, इंग्रजींत व्हॉइट गूझ फूट, मराठींत चाकवत अशीं नांवें आहेत.
उ प यो ग:- याचा भाजी करण्याकडे व औषधी अशा दोन रीतीनीं होतो. पश्चिम हिमालयाच्या उंच भागांवर याची लागवड त्यापासून होणार्या धान्य व भाजीपाल्याकरितां करतात. निळीचा रंग तयार करण्यांत या झुडुपाच्या पाल्याचा काढा उपयोगी पडतो. याच्या बियांत शेंकडा २० या प्रमाणांत तेल असतें व पालाशक्षारहि असतात.
ला ग व ड.-चाकवताची भाजी बागाइतांत पाण्यावर करितात. ती पावसाळ्यांत चांगली होत नाहीं. हिंवाळ्यांत उत्तम होते. पाऊस संपताच जमीन खतावून वाफे करून बीं फेकून मातींत मिसळून पाणी देतात. ती आठ दिवसांत उगवून येते. दोन अडीच महिन्यांत काढावयास येते. दुसर्या गरव्या भाज्या लावण्याचे ठिकाणीं मिश्र पीक म्हणून चाकवताचें बी फेकून करितात. वांगीं, टामाटो, कांदे, कोबी, फुलवर, मका, वगैरे भाज्या लावण्याच्या ठिकाणीं चाकवताचें बीं पातळ फेकल्यास भाजीच्या उत्पन्नांतून खुरपणीचा कांहीं खर्च भागतो.
चाकवताचें बीं चपटें, करड्या रंगाचें असतें. बी धरणें झाल्यास झाडें अर्धीं वाढलीं म्हणजे कापून भाजीकरितां घ्यावीं व पुन्हां जी वाढ होते तीवर धरलेलें बीं चांगलें ठोसर येतें. बीं पातळ फेकलें नाहीं तर भाजी दाट येते व चांगल्या मोठ्या पानांची जोमदार वाढत नाहीं. म्हणून बियांत चौपट ( चार पट ) माती मिसळून तें फेकावें. चाकवताची पातळ भाजी नुसती अगर ताकांतली फार नामी होते. ती सारक आहे असें म्हणतात.