विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चक्षुर्मनु - उत्तानपादवंशीय सर्वतेजस् राजर्षीपासून आकूती मार्येच्या ठायीं झालेला पुत्र. हा चालू मन्वंतरापूर्वींचा होऊन गेलेला सहावा मनु. याच्या कालसत्तेस चाक्षुषमन्वंतर असें म्हटलेलें असून, त्यांत भृगु, सुमेधा, विरजा, सहिष्णु, मधु विवस्वान् आणि अतिनामा हे सप्तर्षि; हविष्मान् वीरक इ. नामांतरांनीं होते. लेख, प्रसूत, भव्य, पृथुग, महानुभाव असे आप्यादिक नामांतरानें पंचविध देव होते. स्वर्गामध्यें मंत्रद्रुम नांवांचा इंद्र असून वैराज ऋषीपासून संभूती मार्येच्या ठायीं अजित् नामक विष्णूचा अवतार झालेला त्यानें समुद्रमंथनकाळीं कूर्मरूपानें मंदराचल आपल्या पृष्ठावर धारण करून देवांस अमृत प्राप्त करून दिलें होतें. यावरून या कल्पांतील कूर्मावतार या मन्वंतरांत झाला होता असें समजतात. यास नडूला किंवा वीरिणी नांवाची स्त्री होती व तिजपासून यास अकरा पुत्र झाले. [ भागवत, स्कं. ४ अ. १३;८ अ. ५; विष्णुपुराण; मत्स्यपुराण वगैरे ].