विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चवळी -ह्या वेलास लॅटिनमध्यें विगना काटजंग, इंग्रजींत काऊपी, मराठींत चवळी, संस्कृतमध्यें राजमाष इत्यादि नांवें आहेत. ह्या वेलाची लागवड हिंदुस्थानच्या उष्ण भागांत करतात. चवळीला साधारण हलकी जमीन चांगली मनवते. हें खरीप पीक असून बहुतकरून तें शेतांत नुसतें न पेरतां, बाजरीसारख्या पिकाबरोबर दुय्यम पीक म्हणून पेरतात.
चवळीच्या हिरव्या व कोंवळ्या शेंगांची भाजी करतात. वाळलेल्या दाण्याचें ( यांनां चवळ्या म्हणतात ) पीठ अथवा डाळ करून खातात. चवळ्यांची उसळ व आमटी होते. चवळीचीं पानें व देंठ यांपासून एक प्रकारचा हिरवा रंग तयार होतो असें म्हणतात.
चवळ्या गोड असतात. परंतु थोडा तुरटपणाहि त्यांत असतो. त्या रूक्ष, जड, व थंड असतात. चवळ्या सारक, वृष्य, थकवा दूर करणार्या, रूचिकारक, असून कफ व पित्त दोषांना नाहींशा करितात. [ वॅट; पदे; धन्वं. नि; राजनिघंटु ]