विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चरबीचें झाड - या झाडास लँटिनमध्यें सॅपियम सेब्रिफेरम, इंग्रजीत चायनीजटॅलो ट्री किंवा चिनी चरबीचें झाड, पिप्पल-यंग, मोम चिन, ( ताड टार) चर्वी, वगैरे नांवें आहेत. हें एक प्रकारचें लहान गुळगुळीत झाड चीन व जपान देशांत मूळचेंच असून याची तेथें लागवडहि करतात. उत्तर हिंदुस्थानांत याची लागवड सुरू झाली आहे. डेराडून भागांत या जातीची जंगली झाडें आहेत; आणि गर्वाल, कुमाऊन व कांग्रा या भागांत ही झाडें विपुल होतात.
बियांपासून या झाडांची सहज उत्पत्ति करतां येते, परंतु कलमांनी याची साधारणपणे लागवड करतात. यांच्या फळांत तीन फोडी असून, प्रत्येकींत एक बी असते, व बियाच्या सभोंवार जाड, चरबीसारख्या पदार्थाचें वेष्टण असतें. ह्या वेष्टनासच वनस्पतिज चरबी म्हणतात. चीन देशांत हिचा प्राणिज चरबीऐवजी मेणबत्या व साबण करण्याच्या कामी व कपड्यावर खळ देण्याचे कामीं उपयोग करतात. या जाड चरबीशिवाय बियांच्या मगजापासून सुमारें शेकडा ५० भाग पिंगट पिवळया रंगाचें तेल निघतें. या तेलाचा औषधीमध्यें जाळण्याच्या तेलाप्रमाणें व छत्र्यांचे रोंगण तयार करण्याच्या कामी उपयोग करतात. हिंदुस्थानांत या चरबीचा उपयोग करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु या पदार्थाच्या किमतीपेक्षां तो बनविण्याला खर्च जास्त येतो असें म्हणतात. कांग्रा खोर्यातील बियांच्या मगजांत शेंकडा ६३.६ भाग चरबी असते असा उल्लेख आहे. गँबल म्हणतो कीं, “ डेहराडून येथें बाबू विर्वल यांनी प्रयोग करून चरबी काढली व तिच्या पोळ्या बनविल्या, परंतु ही रीत त्रासदायक होती व परिणाम समाधानकारक नसल्यामुळें चरबी काढण्याकरितां या झाडांची लागवड करावी अशी शिफारस करण्यांत आली नाही.” या चरबीचा पक्का माल बनविणें रासायनिक व व्यापार या संबंधी जास्त सविस्तर माहिती अॅग्रिकल्चरल लेजर या ग्रंथांत सांपडेल. या झाडाच्या पानांपासून एक प्रकारचा काळा रंग निघतो, परंतु याविषयी विशेष माहिती नाही. या झाडाचें लाकूड पांढरें व साधारण कठिण असतें, व त्याचे पलंग, मेजं खेळणी बनवितात व छापण्याचे ठोकळे (ब्लॉक्स) बनविण्यास हें योग्य लांकूड आहे असें सुचविलें आहे.