विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चरबी :- कित्येक प्राणिजन्य व वनस्पतिजन्य स्निग्ध पदार्थांस हें नांव देतात. नेहमीच्या उष्णमानावर हा पदार्थ गोठलेल्या तुपाप्रमाणें घनरूप असतो. रासायनिकदृष्ट्या स्टारिक, पामिटिक व ओलिक ही अम्लांच्या संयोगानें झालेली ग्लिसरीनची लवणें आहेत. यांत नत्रवायू नसतो हें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे. प्राण्यांच्या पेशीजालांत हा पदार्थ प्राणी जन्मास येण्याच्या अगोदर देखील असतो. वनस्पति सृष्टींत हा पदार्थ बीज, फळ व कधीं कधीं मूळ यांत असतो. रासायनिकदृष्ट्या याचें तेलाशी फार साद्दश्य आहे. फक्त तेलें द्रवरूप असतात व चरबी घनरूप असते. सर्व प्रकारची चरबी औद्योगिकदृष्टया उपयोगांत आणिली जाते. यांत विशेष महत्वाची चरबी पाळलेल्या जनावरांची म्हणजे मेंढी, बकरी, गाय, बैल व वांसरें यांची होय. सरस तयार करण्याच्या कारखान्यांत हाडें व कातडी यांपासून प्रथमच जी चरबी काढली जाते तिचा उपयोग साबण, मेणबत्या व ग्लिसरीन तयार करण्याकडे होतो.
डुकरापासून तयार केलेल्या चरबीला ‘लार्ड’ असें म्हणतात. हा एक मौल्यवान् असा व्यापारी पदार्थ आहे. गुरांपासून आणि मेंढ्यांपासून तयार केलेल्या दुसर्या अशाच एका पदार्थाला ‘टँलो’ असें म्हणतात. डुकराच्या मूत्रपिंडासभोंवतालचा भाग आणि कातडीखालील ढलपेदार थर यांपासून तयार केलेल्या चरबीला ‘लीफ लार्ड’ असें म्हणतात. ही चरबी उत्तम प्रकारची समजली जाते.
‘ लार्ड’ – कलकत्ता येथील ‘चरबीच्या कृति संबंधाची साग्र माहिती आय. एच. बर्किल यानें लिहून ठेविली आहे. पूर्वी कलकत्ता येथें चरबी तयार करणारे तीन मोठे कारखाने होते. परंतु सध्यां ते नष्ट झाले असून त्यांची जागा एतद्दोशीयांनी चालविलेल्या लहान लहान कारखान्यांनी घेतली आहे. चरबी करण्याचा धंदा सबंध वर्षभर चालू असतो परंतु मोसम म्हटला म्हणजे उन्हाळ्याचा आरंभ होय. याकरितां दोन प्रकारच्या डुकरांचा वध करण्यांत येतो. एक खुद्द कलकत्यांत पोसलेली डुकरें-ज्यांनां चिनी डुकरें ’ असें म्हणतात व दुसरी बंगालमधील खेड्यापाड्यांतील डुकरें-ज्यांना ‘ग्राम डुकरे’ असें संबोधितात. पहिल्या प्रकारच्या डुकराचा रंग पांढरा असून दुसर्या प्रकारच्या डुकराचा काळा असतो. दिवस उजाडण्याच्या सुमारास डुकरांचा वध करितात व “चरबी-करणाला” माथ्यान्ही सुरूवात होते. ‘चरबीकरण-गृहांत’ एक छोटीशी खोली व एक मोठी वखार असते. या वखारीत चरबी थंड करून सांठवितात. दोन फूट रूंद व ८ इंच खोल अशी एक कढई मंद विस्तवावर ठेवून तींत ती चरबी वितळवितात. याच्या अगोदर चरबीचे ३ किंवा ४ औंस वजनाचें तुकडे सुमारें दोन तासपर्यंत पाण्यांत ठेवून धुतात. आणि ते लोहपात्रांत घालतात. चरबी संपूर्ण वितळली म्हणजे कापूस आणि मलमल यांच्या दुहेरी जाड कापडांतून ती एका मातीच्या भांड्यांत गाळून घेतात. नंतर तो द्रव अर्धातासपर्यंत, हळू हळू ढवळून चांगला खाली बसूं देतात. ‘चिनी-डुकराच्या-’ चरबोला खाली बसण्याला दोन दिवस लागतात. ‘ग्राम’ डुकराच्या चरबीला यापेक्षां कमी अवधी लागतो. याप्रमाणें तयार झालेली चरबी सुमारें दोन महिन्यांपर्यंतच टिकते.
उपयोग :- उत्तम प्रकारच्या डुकराच्या चरबीला मलम वगैरे करण्याकडे उपयोग करितात. मध्यम प्रकारच्या ‘लार्ड’ चरबीचें तेल काढतात आणि कनिष्ट प्रकारची जी चरबी असते तिचा साबू करण्याकडे उपयोग करितात. फ्रान्समध्यें ऑलिव्ह तेलांत आणि अमेरिकेमधील पूर्वसंस्थानांत देवमाशाच्या तेलांत या ‘लार्ड’ तेलाची भेसळ करून विकण्याचा प्रघात आहे. या तेलाचा ओंगणासारखा देखील उपयोग करितात. या तेलांत अभ्यंजनीय गुणधर्म असल्यामुळें अंगावरील सूज, खरवडलेल्या जागा, मुरगळल्यामुळें किंवा लचकल्यामुळें दुखत असलेले भाग इत्यादि ठिकाणी हें तेल चोळण्याचा फार प्रघात आहे.
टँलो - मांसापासून किंवा बकर्याच्या चरबीपासून अथवा या दोहोंच्या मिश्रणापासून तयार केलेला पदार्थ म्हणजे ‘टँलो’ होय. ‘लार्ड’ पेक्षां हा पदार्थ जास्त कठिण व कमी द्राव्य असतो. हा पदार्थ वितळून झाल्यावर पाण्यांत घालून उकळवितात व जास्त चांगला करितात. बहुधा नत्राम्लाचा उपयोग करून तो स्वच्छ धुवून काढतात.
उपयोग – साबू व मेणबत्या करण्याकडे या पदार्थाचा अयोग करतात. लखनौ येथील कांही मेणबत्या करणारे चरबीचा उपयोग करतात. साबू करण्याकडोहि या चरबीचा उपयोग करतात असें कांही लोकांचे म्हणणें आहे. ओंगणासारखा देखील या चरबीचा उपयोग कोठें कोठें करतात.
व्यापार - ‘ लार्ड’ या पदार्थाचा परदेशीय व्यापार अलीकडे बराच मंदावलेला आहे. हिंदुस्थानांतून बाहेर जाणारी जवळजवळ संबंध ‘लार्ड’ चरबी बंगालमधून मॉरीशस येथें जाते. हिंदुस्थानांत बाहेरून येणारी ‘ लार्ड’ स्टेटस सेटलमेंटमधून आणि अलीकडे चीन मधून देखील येते. टँलोचा व्यापार हा विशेषत: मुंबई येथें केन्द्रीभूत झाला आहे. १९०६-७ त टॅलोची ४१३५ हंड्रेड. निर्गत परदेशी करण्यांत आली, पैकी एकट्या मुंबई शहरानें ३५१७ हं. निर्गत केली. हिंदुस्थानीय टॅलो खरेदी करणार्या देशांत अरबस्तानचा नंबर सर्वांत वर लागतो. एकंदर सर्व निर्गतीपैकी २२६० हंड्रे. एकटा हा देश खरेदी करतो. ज्याप्रमाणें सर्वांत जास्त टॅलो मुंबई येथून बाहेर जाते, त्याच प्रमाणें बाहेर देशची सर्वांत जास्त टॅलो खरेदी करणारे शहरहि मुंबईच होय. हिंदुस्थानांत बाहेरून येणारी टँलो बहुधा ‘ युनैटेड किंगडम’ व वेलजम येथून येते [वँट]