विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चरणव्यूह :- वेदाभ्यासाची व्यापकता दाखविणारा ग्रंथ याच्या हस्तलिखित प्रतींत अनेक प्रकारचे पाठभेद आढळतात. पुढील माहिती चौखंबा आवृत्तीवरून देऊन मधून मधून बडोदे आवृत्तीत (संपादक के. त्रि. पेंडसे शके १८२४) आढळून येणारे फरक देत आहों. या ग्रथांत वेदांच्या सर्व शाखांची माहिती दिली आहे. ‘चरण म्हणजे वेदराशीचा चवथा भाग व त्यांचा व्यूह म्हणजे समुदाय तो चरणव्यूह अशी चरणव्यूह शब्दाची कांही व्याख्या देतात. चरणव्यूहाची चार खंडें असून प्रत्येक खंडात एक एक वेदाची माहिती दिली आहे. चरणव्यूहांत ऋग्वेदाच्या आश्वलायनी, शांखायनी, शाकल, बाष्कल व मांडूकेयी (भांडूकायन पें. प्रत) पांच शाखा दिल्या आहेत. या पांचहि शाखांच्या संहितांत मंडलें दहा व अध्याय ६४ हे सारखेच आहेत. ऋचांच्या संख्येत फरक आहे. शाकल संहितेंत ऋकसंख्या १०४७२ व सूक्तसंख्या १०१७ आहे. (परंतु आठव्या मंडळांतील वालखिल्य नामक सूक्तांचा यांत संग्रह नाही.) ऋचांतील पदांची संख्या १५२५८५ आहे. शांखायनांची बालखिल्यसहित पदसंख्या १५३७४३ आहे. ज्या मंत्राचा पदपाठ नाही त्यांनां ‘ खिल’ अशी संज्त्रा आहे. असे मंत्र म्हणजे त्र्यंबकंयजामहे हा (मं. ७ सू. ५९ ऋ. १२) मंत्र व ऋतंचसत्यं (मं. १० सू. १९०) हें सूक्त होय.ऋग्वेदाध्ययन करणारांच्या चार संज्त्रा आहेत. त्या पुढीलप्रमाणें:- (१) चर्चा:- ताल्वोष्ठ पुटव्यापारानें दुसर्यास ऐकूं जाण्यासारखें अध्ययन, याला चर्चा म्हणतात. ( हल्ली वैदिक लोक पट्टीचे मंत्रजागररूप जें उच्च स्वरांत अध्ययन करतात तो याचाच प्रकार असावा.) (२) श्रावक: - अध्यनन ऐकणारा, म्हणजे अध्यापक कदाचित् श्रोता (३) चर्चक:- म्हणजे अध्ययन करणारा. (४) श्रवणीयपार:- म्हणजे श्रवणीय अशा वेदाच्या अध्ययनाची समाप्ति. मध्यें विच्छेद न होऊं देतां संहितेचें अध्ययन करणें यास पारायण असें म्हणतात. या पारायणांतहि प्रकृतिरूप व विकृतिरूप असे दोन प्रकार आहेत. संहितेंतील मंत्रांचें पठण, मंत्राच्या पदाचें पठण व दोन पदे जोडून त्यांची संधिरूप संहिता करून पठण करणें (या प्रकारास क्रमपार म्हणतात) यांना प्रकृतिरूप पारायण म्हणतात. विकृतीचे प्रकार आठ आहेत त्यांची नांवें:- जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ व घन. यांत जटा, दंड व घन हे तीनच मुख्य आहेत. कारण शिखा व जटा यांत फारसा भेद नाही. व माला, रेखा आणि ध्वज या विकृती दंडानुसारी आहेत. म्हणून जटा, दंड व घन यांचीच उदाहरणें पुढें दिली आहेत.
जटा :- दोन पदांची संहिता करणें यास क्रम म्हणतात. जसें अग्नि, ईळे ही दोन पदें जोडून अग्निमीळे हा क्रम झाला. या दोन जोडलेल्या पदांनां ‘द्वयी’ असें म्हणतात. या द्वयीत पदांचा क्रम, व्युत्क्रम व पुन: क्रम केल्यास त्यास जटा म्हणतात. उदा. ‘अग्निमीळेईळोग्निमग्निमीळे.’ ही एक द्वयी झाली. याच्या पुढें ईळे या पदास पुरोहितं हें पद जोडून ‘ ईळेपुरोहितंपुरोहितमीळेपुरोहितं ’ अशी दुसरी द्वयी म्हणावयाची ही जटा झाली. येथें विराम करून पुढील तुकडा अथवा द्वयी म्हणतात. मागील ईळे हें पद घेऊन त्याचा पुढील पदासह क्रम, व्युत्क्रम व क्रम पूर्ववत् करणें.
दंड :- जटेंत एका विरामांत तीन पदांचाच क्रमव्युत्क्रम होतो. परंतु दंडविकृतीत एका विरामांत हा व्युत्क्रम अर्ध ऋचेपर्यंत केला जातो.
घन :- या विकृतीत जटेप्रमाणेंच एक द्वयी म्हणून त्या दोन पदांस पुढील तिसरें पद जोडून ती तीन पदें व्युत्क्रम व क्रमानें एका विरामांत म्हणावयाची जसें:- अग्निमीळेईळेग्निमग्निमीळेपुरोहितंपुरोहितमीळेग्निमग्निमीळेपुरोहितं ’ ही एक द्वयी झाली. यापुढें ईळे हें मागील पद घेऊन पुढील दोन पदांसह ‘ ईळेपुरोहितंपुरोहितमीळेपुरोहितंयज्त्रस्ययज्त्रस्यपुरोहितमीळेइळेपुरोहितंयज्त्रस्य ’ ही दुसरी द्वयी झाली. याप्रमाणें घनविकृतीचें पठण करावयाचें असतें.
वरील प्रकृति व विकृतीचें अध्ययन स्वरांसहित करावयाचें असतें. निरनिराळ्या पदांचे संधी जोडतांना संहितेंतील स्वरांच्या नियमाप्रमाणें त्यांनां स्वर द्यावयाचें असतात.
पदांमध्यें कांही जोड पदांनां द्विखंड अशी संज्त्रा आहे. उदा. रत्नsधातमं अशी पदें बहुधा सामासिक असतात. यांची संख्या ३२०१६ आहे. क्रमपाठांत या पदांस इति हे पद लावलें जाऊन ‘ रत्नधातममितिरत्नsधातमं अशी द्वयी बनते. पदांमध्यें संबुध्यंत पदांनां इति पद लागतें. उदा. इंदोइति, शतक्रतोइति. अशा पदांचीहि ‘ इंदोइतीदो ’ अशी द्वयी होते. अशी पदें व द्विखंडें मिळून एकंदर वेष्टणें क्रमपाठांत ३४ हजार येतात. प्रातिशाख्याप्रमाणें संधीच्या निरनिराळ्या नियमांशिवाय वरील विकृतीचें पठण बहुतेक सर्व वेदांचें सारखेंच असतें.
यजुर्वेदाचे ८६ भेद आहेत. त्यांत चरक नामक मुख्य १२ भेद आहेत. ते चरक, आव्हरक, कठ, प्राच्यकठ, कपिष्ठलकठ, चारायणीय, वारायणीय, वार्तांतवेय, श्वेत, श्वेततर, औपमन्यव, पातांडनीय व मैत्रायणीय. मैत्रायणीयाचे मानव, दुंदुभ, वाराह, छगलेय, हरिद्रवीय, श्याम व शामायणीय हे सातभेद होत. यजुर्वेदाच्या शाखांची पाठभेदासंबंधी माहिती पूर्वी वेदविद्या या विभागांत (पृष्ठ ७२) दिली आहे. कांही प्रतीत मैत्रायणीचे ६ भेद दिले असून त्यांत श्याम हा भेद आढळत नाही.
वाजसनेयी हिचे १७ भेद आहेत ते: -जाबाल, बहुधेय काण्व, माध्यंदिन, शापीय स्थापनीय, कापाल, पौंड्रवत्स, आवाटिक, परमावटिक, पाराशर्य, वैधेय, वैनेय, औधेथ, गालव,वैजव व कात्यायनीय हे होत. वाजप्तनेयी संहितेंत १९०० मंत्र आहेत.
तेत्तिरियाचे औख्य आणि कांडिकेय असे दोन भेद आहेत. पैकी काण्डिकेयांचे आपस्तंबी, सत्याषाढी, बौधायनी, हिरण्यकेशी व औधीयी असे पांच भेद आहेत. त्तैत्तिरीय संहितेची कांडे ७, प्रश्न अथवा अध्याय ४४, अनुवाक ६४८, पदें १९२९० व अक्षरसंख्या २५३८६८ दिली आहे.यजुर्वेद हा गाथाग्रंथ असल्यामुळें त्याची पदसंख्या अनिश्चित असणें संभवनीय आहे.
सामवेदाचे हजार भेद होते. परंतु अध्ययन करणारांनी अनाध्यायास त्यांचे अध्ययन केल्यामुळें इंद्रानें आपल्या वज्रानें त्यांपैकी पुष्कळांचा नाश केला. अवशिष्ट राहिलेल्या शाखा:- आसुरायणीया, वासुरायणीया, प्रांजलऋग्वेदविध प्राचीनयोग्या व राणायणीया. राणायणीयांचे ९ भेद आहेत ते:- राणायणीय, शाट्यायणीय, सात्यमुग्र, खल्व,महाखल्वत, लांगल, कौथूम, जैमिनीय, गौतमीय हे होत. पैकी कौथुमी, राणायणी व जैमिनी या तीनच शाखा विद्यमान आहेत. याची ८००० सामें व १४८१० गानें आहेत. त्यांपैकी आग्नेय १९०, पावमान १०४, रौद्र २६, शिष्ट २८, वगैरे गानांची पृथक् अशी कांही प्रतीत विभागणी आहे. परंतु याचा स्पष्टार्थ समजत नाही.
अथर्ववेदाचे ९ भेद आहेत ते:- पैप्पल, दान्त, प्रदान्त, स्तौत, औत, ब्रह्मदायश, शौनकी, वेददर्शी व चरणविद्य हे होत. या वेदाचें अध्ययन पुढील पांच कल्पांनी पूर्ण होतें. ते कल्प नक्षत्रकल्प, विधानकल्प, विधिविधानकल्प, संहिताकल्प व शांतिकल्प असे आहेत. अथर्ववेदाची मंत्रसंख्या १२००० दिली असून पांच कल्पांची प्रत्येकी ५०० दिली आहे. परंतु ती पांच कल्पांसह १२००० किंवा कल्पाची संख्या वेगळी याचा स्पष्ट बोध होत नाहीं.
याज्त्रवल्क्यापासून वाजसनेयी हिची उत्पति झाली. ही आख्यायिका भागवतांत आहे, ती अशी:- व्यासशिष्य वैशंपायन यानें आपल्या शिष्यांस निगदरूप यजुर्वेद शिकवला, त्याच्या अनेक शाखा झाल्या. ब्रह्महत्येच्या पापाचा नाश होण्यासाठी वैशंपायनानें आपल्या शिष्यांनां व्रत करण्यास सांगितलें असतां ‘मी एकटाच पापनाश करतों असें याज्त्रवल्क्य बोलला असतां तुला विद्येचा अभिमान झाला आहे तरी ती विद्या परत दे ’ असें वैशंपायनानें सांगितल्यावरून याज्त्रवल्क्यानें यजुर्वेद आपल्या रक्तरूपानें ( कांही स्थळी वमनरूपानें) परत केला असतां इतर शिष्यांनी तो त्तित्तिर पक्ष्याच्या रूपानें सेवन केला. म्हणून त्यास त्तैत्तिरीय असें नांव पडलें. पुढें याज्त्रवल्क्ल्यानें वाजिरूप सूर्यापासून नवा वेद ग्रहण केला म्हणून त्यास वाजसनेयी असें नांव मिळालें.
वेदांच्या निरनिराळ्या शाखांपैकी वाजसनेयी शाखा पूर्व, उत्तर आणि नैर्ऋत्य दिशेस आहे. नर्मदेच्या दक्षिणेस आपस्तंब, आश्वलायन, राणायणी आणि पिप्पल या शाखा आहेत. नर्मदेच्या उत्तरेस माध्यंदिन, शांखायन, कौथुमी आणि शौनकी या शाखा, तुंगा, कृष्णा आणि गोदावरी या नद्यांच्या कांठी तैलंगणापासून सह्याद्रीपर्यंत आश्वलायनी, उत्तरेस आणि गुजराथ देशांत कौषीतकी, शांखायन; तैलंगणाच्या दक्षिणेस व आग्नेयीस त्तैत्तिरीय व आपस्तंब या शाखा आहेत. सह्याद्रीपर्वतापासून नैर्ऋत्या सागरापर्यंत व कोंकणांत हिरण्यकेशी शाखा; नर्मदेच्या उत्तरेस गुजराथ आणि सिंधपर्यत मैत्रायणी शाखा, बंगाल, बिहार, अयोध्या, कनोज व गुजराथ या भागांत वाजसनेयी शाखा आहे. अशा प्रकारची शाखांच्या विभागणीबद्दल माहिती महार्णव व इतर पुराणांतून दिलेली आढळते.
हल्लीच्या सर्व वेदांच्या उपलब्ध शाखांचें वाङ्मय आणि त्यांचा अनुयायी वर्ग यांची माहिती वेदविद्या ग्रंथांत दिली आहे. ( विशेषत: ७२ व १४८ पृष्ठें पहा ) बरेंच अनुपलब्ध वैदिक वाङ्मय अजून सांपडण्याजोगें आहे अशी दयानंद आंग्लोवैदिक कॉलेजने केलेल्या परिश्रमावरून आशा उत्पन्न होते.