विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चरखारी संस्थान :- मध्यहिंदुस्थानांतील बुंदेलखंड पोलिटिकल एजन्सीच्या ताब्यांतील एक सनदी संस्थान. याचें क्षेत्रफळ ८८० चौ. मै. आहे. यांत केन व धासन या नद्या आहेत. येथील हवा माळव्यापेक्षां उष्ण आहे, परंतु त्रासदायक होत नाही. येथें वर्षौंत सरासरी ४३ इंच पाऊस पडतो. या संस्थानाची घटना स. १७६५ त झाली. स. १७३१ त पन्नाच्या छत्रसाल राजानें आपल्या राज्याचे कांही भाग करून त्यांतील एक भाग आपल्या तितर्या मुलास, जगत् राजास दिला. या भागाची राजधानी जैतपूरास होती व त्याचें वार्षिक उत्पन्न ३१ लाख रू. होतें. जगतराजानें आपल्या मागें वारस निमिला होता. परंतु बाप हयात असतांनाच किरतसिंग मेला. सन १७५७ त जेव्हां जगतराज मरण पावला तेव्हां गादीच्या वारसासंबंधानें कलह उत्पन्न झाला. किरतसिंगास गुमानसिंग व खुमानसिंग हे दोन पुत्र होते. त्यांपैकी गुमानसिंग यानें गादी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु जगत् राजाच्या पहाडसिंग नांवाच्या मुलानें त्या दोघां भावांनां चरखारी किल्यावर ठेविलें. सन १७६४ त यांचा कांही शर्तीवर समेट झाला व पहाडसिंगनें आपल्या राज्यापैकी बांडा गुमानसिंगास दिलें व चरखारी खुमानसिंगाकडे आलें. त्यावेळी चरखारीचें उत्पन्न ९ लाख होतें. खुमानसिंग हा चरखारीचा पहिला राजा होय. तो सन १७८२ त मेल्यावर त्याचा मुलगा विजय विक्रमाजित बहाद्दूरसिंग गादीवर बसला. विजय बहाद्दूरसिंग व त्याचे भाऊबंद यांमध्यें नेहमी तंटेंबखेडे चालत. शेवटी बांडाच्या अर्जुनसिंगानें त्यास राज्याबाहेर हांकून दिलें. अलीबहाद्दर व हिम्मतबहाद्दूर यांनी जेव्हां इ. स. १७८९ त बुन्देलखंडावर स्वारी केली तेव्हां आपलें राज्य आपल्यास परत मिळेल या हेतूनें त्यांचें स्वामित्व पत्करून त्यांस सामील झाला. अलीबहाद्दरानें सन १७९८ त सन द देऊन विजय बहाद्दुरास चरखारी किल्ला व जवळील प्रदेश परत दिला. त्यावेळेस याचें उत्पन्न ४ लाख होते. ब्रिटिशांनी सन १८०३ त बुंदेलखंड घेतलें त्यावेळेस विजय बहाद्दुरनें त्यांच्या अटी मान्य करून सन १८०४ मध्यें सनंद घेतली. विजय बहाद्दूर स. १८२९ त मेला व त्याचा नातू रतनसिंग हा गादीवर आला. यानें स. १८५७ च्या बंडात ब्रिटिशांस फार मदत दिल्याकारणानें त्यांनी यास वंशपरंपरेनें २०००० ची जहागिरी, ११ तोफांची सलामी व दत्तक घेण्यास अधिकार दिला. रतनसिंग मरण पावल्यावर सन १८६० त त्याचा अज्त्रान मुलगा जयसिंगदेव गादीवर बसला. सन १८७४ त वयांत आल्यावर यास आपल्या संस्थानचा अधिकार देण्यांत आला, परंतु: या संस्थानांत ४-५ वर्षांत इतकी अव्यवस्था झाली की सन १८७९ त या ठिकाणी एक ब्रिटिश अधिकारी सुपरिटेंडेंट नेमावा लागला व जयसिंगाचें सर्व अधिकार काढून घ्यावे लागले. जयसिंगनिपुत्रिक होता. तो मेल्यावर त्याच्या बायकोनें मलखानसिंग या ९ वर्षाच्या मुलास दत्तक घेतलें, इ. स. १८८६ त हें बुंदेलखंडाच्या पोलिटिकल एजंटच्या अधिकाराखाली आलें, व मलखानसिंगाच्या ताब्यांत पूर्ण अधिकार सन १८९४ त देण्यांत आलें. या संस्थानिकास महाराजाधिराज सिपाहदार-उल्-मुल्क ही पदवी आहे व ११ तोफांची सलामी आहे. तेथील लोकसंख्या १९११ सालांत १३२५३ होती. याच्या क्षेत्रफळापैकी २६३ चौ. मैल जमिनीत लागवड करितात. यांत गहू, ज्वारी, हरबरा, कोद्रू आणि कापूस पिकतो. यांत हिर्यांच्या कांही खाणी आहेत. या खाणी लोकांना टेक्यानें देतात, व ठेकेदरांपासून हि-यांच्या किंमतीवर शेकडा २५ रू. संस्थानास मिळतात. चरखारीपासून महोबापर्यंत पक्का रस्ता झाल्यामुळें व्यापार बराच चालतो. या संस्थानातली पोस्टाची तिकिटें संस्थानांतच छापलेली आहेत. येथील कारभार महाराजा स्वत: पहातो. संस्थानचे बावनचोरसी, इसानगर, राणीपूर आणि सतवार असे चार भाग करून प्रत्येकावर एक एक तहसिलदार नेमिला आहे. येथील वार्षिक उत्पन्न ५ लाख रूपये आहे. एकंदर कारभार पहाण्यासाठी व संस्थानिकाच्या इतमामासाठी १.५ रूपये, लष्करासाठी ८९००० रूपये, सारावसूली करण्याकरितां ३७००० रूपये इत्यादि खर्चाची महत्वाची खाती आहेत.
शहर :- मध्यहिंदुस्थानच्या चरखारी संस्थानांतील मुख्य शहर. याचें महाराजनगर नांव आहे. हें शहर जी. आय. पी. रेल्वेच्या झांशी- मणिकपूर शाखेवरील महोबा स्टेशनपासून १० मैल आहे. १९११ त येथील लोकसंख्या ९८७९ होती. हे रंजीत पहाडाच्या पायथ्याशी वसलेलें आहे व यांत तीन तळी आहेत. पहाडावर मंगलगड नांवाचा किल्ला आहे. राजा खुमानसिंगनें येथें आपली राजधानी केली. तेव्हांपासून या ठिकाणास महत्व आलें. आतां रेल्वे सुरू झाल्यापासून हें व्यापाराचें एक केंद्रस्थान झालें आहे. यांत साखर, मीठ, कापड आणि रॉकेल हे पदार्थ बाहेर जातात. यांत दवाखाना, मुलांच्या व मुलीच्या शाळा आणि एक डाक बंगला आहे.