विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चरक :- यजुर्वेदाच्या कांही प्राचीन शाखांनां सामान्यत: चरक असें नांव आहे. चरकशाखांत कठ, अव्हरक कठ, प्राच्य कठ, कपिष्ठल कठ, चारायणीय, वारायणीय, वार्तांतवेय, श्वेततर, औपमन्यव, पातांडनीय, मैत्रायणीय हे भेद येतात. वाजसनेयीसंहितेच्या एका खिलांत चरक ही संज्त्रा निंदाद्योतक दिसते. ३० व्या अध्यायांत पुरूषमेधप्रंसगी बळी द्यावयाच्या माणसांची एक यादी दिली आहे. तीत चरकाचार्य हा दुष्कृताची बळी म्हणून निवडला आहे. यावरून व शतपथ ब्राह्मणांतील या अर्थाच्याच निंदास्पद वाक्यांवरून अध्वर्यूंच्या प्राचीन शाखांविषयी याज्त्रवल्क्यासारख्या प्रतिस्पर्ध्यौंच्या मनांत किती द्वेषबुध्दि जागृत होती हें दिसून येतें. स्वाभाविक कारण असें असावें की हे भटकणारे ऋत्विज निरनिराळ्या ठिकाणी जाऊन दक्षिणा घेत असावेत व स्थानिकांची भिक्षुकी बुडवीत असावेत आणि त्यामुळें शुल्क यजूंस त्यांबद्दल द्वेष वाटत असावा. चरकांची गणना शुक्लांत किंवा कृष्णांत अशी कोणांतच निश्चितपणें करतां येणार नाही जे चरक नसतील ते स्थायिक आणि स्थायिकांतील शुल्क कृष्ण हे पुढले भेद अशी ऐतिहासिक परंपरा असणें शक्य आहे. भागवतामध्यें वैशंपायन याज्त्रवल्क्य यांच्या भांडणापूर्वी जे वैशंपायनांचे शिष्य होते त्या सर्वासच चरकाध्वर्यू म्हटलें आहे. (स्कंद १२ अध्याय ६ श्लोक ६१) चरक शाखेंतील महाराष्ट्रीयांच्या आजच्या स्थितीविषयी वेदविद्या पृ. १९६ येथें थोडीशी माहिती दिलीच आहे.
चरक :- एक प्राचीन भारतीय वैद्य. याचा ग्रंथ चरकसंहिता या नांवानें प्रसिध्द असून आयुर्वेदांत प्रमाणभूत मानिला जातो. या ग्रंथात सूत्र, निदान, विमान, शारीर, इंद्रिय, चिकित्सा, कल्प व सिध्दी अशी आठ स्थानें आहेत. [विज्त्रानेतिहास, पा. ३७९ पहा.] चरक हा बोध्दधर्मीय राजा कनिष्क याचा राजवैद्य होता असें चिनी ग्रंथांवरून दिसतें. अरबी ग्रंथकारहि हिंदुस्थानांतून इराण, अरबस्थान देशांत गेलेला एक वैद्यकावरील ग्रंथकार अशी चरकाची माहिती देतात. चरकसंहितेवरील कांही टीका फार जुन्या (इ. स. ६५० च्याहि पूर्वीच्या) आहेत.