विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चबा संस्थान - पंजाबांतील एक एतद्देशीय संस्थान. हें पंजाब कमिशनरच्या राजकीय अधिकारांत आहे. क्षेत्रफळ ३२१६ चौ. मैल. ह्या संस्थानच्या पश्चिमेस व उत्तरेस काश्मीर; पूर्वेस व दक्षिणेस इंग्रजांच्या ताब्यांतील कांग्रा आणि गुरूदासपूर. हिमपर्वाताच्या दोन श्रेणी व हिमनद्या ह्या संस्थानांतून जातात. पश्चिमेस व दक्षिणेस बर्याच दूरपर्यंत सुपीक खोरीं पसरली आहेत.
इतिहास :- चंबा संस्थानांत बरेच महत्वाचे शिलालेख व ताम्रपट सांपडले आहेत. त्यांवरून ह्या प्रांताच्या इतिहासाची थोडीबहुत खात्रीलायक जुळणी झाली आहे. साधारणपणें ६ व्या शतकांत मारूत नांवाच्या सूर्यवंशी राजानें ब्रह्मपूर नांवाचें शहर वसविलें. ६८० मध्यें मेरूवर्मा यानें ह्या संस्थानच्या मर्यादा लांबपर्यत वाढविल्या ९२० मध्यें सहीलवर्मा यानें चंबा शहर वसविलें मोंगल कारकीर्दीत हे संस्थान मांडलिकच समजलें जात असे. तरी अंतर्व्यवस्थेमध्यें हें जवळजवळ स्वतंत्रच होतें. इंग्रजांच्या वर्चस्वाखाली हें संस्थान १८४६ मध्यें आले व १८४८ मध्यें तेथील राजाला सर्व संस्थाच्या मालकीची सनद दिली. १८६२ मधील सनदेनें राजास दत्तक पुत्र घेण्याचा हक्क प्राप्त झाला. संस्थान एकंदर १६१७ खेडी आहेत. लोकसंख्या १९२१ मध्यें १४१८६७ होती. मुख्य भाषा चंबियाली. लेखनपध्दतीस टाका म्हणतात. पंजाबी, हिंदी, उर्दू ह्या भाषाहि थोड्याबहुत बोलल्या जातात.
सर्व जमीनीची संपूर्ण मालकी राजाकडे आहे. पेरणीसाठी व एकंदर लागवडीकरता संस्थानांकडून ज्यांना करारानें जमीन मिळाली आहे त्यांना मालगुजार म्हणतात. या मालगुजारांनां आपली जमीन गहाण टाकतां येते व जमीन विकण्याचा व इतर रीतीनें तिची वासलात लावण्याचा पूर्ण हक्क ह्या मालगुजारांनां असतो.
येथील मुख्य पीक तांदूळ, मका, डाळ, ज्वारी, बाजरी, बटाटे यांचे होय. कांही काहीं भागांत चद्दाची लागवड करतात. जनावरें साधारण दिसावयाला लहान व हलक्या दर्जाची असतात. लाहूल टेंकड्यांवर सांपडणारी तट्टें फार प्रसिध्द आहेत. मेंढ्या बहुतेक सर्व लोक पाळतात. ब्लँकेटें व निरनिराळी कापडें मेंढ्यांच्या लोंकरीपासून तयार करतात.
संस्थानाचा फार महत्वाचा असा जंगलाचा भाग १८६४ मध्यें ९९ वर्षौच्या करारानें इंग्रज सरकारास दिला आहे. याचें संस्थानास २१००० रूपये वर्षाचे येतात. येथील देवदार लांकूड सर्व टिकाणी पाठविण्यांत येतें. पर्वतश्रेणीमधून खनिज पदार्थ फार सांपडतात. ब्रह्मौर व चौरा वझारतीमध्यें लोखंड सांपडतें. स्लेटीच्या. दगडांच्या खाणी फार आहेत. संस्थानांत कारखाने असें कोठेंच नाहीत. येथील लोक रोजच्या गरजा भागविणार्या न वस्तु काय त्या घरी तयार करतात. येथून मध, लोंकर, लांकूड. यांचा निर्गत व्यापार आहे. संस्थानांत एकंदर आठ पोस्टऑफिसें आहेत. यांतील मध्यवर्ती ऑफिस राजधानीच्या ठिकाणी आहे. पोस्टखातें पोस्ट-मास्तर-जनरलच्या ताब्यांत असून पोस्टऑफिसांची पहाणी अंबाला विभागांतील सुपरिटेंडेंट करीत असतो.
राज्यकारभार :- हल्लीचा राजा रामसिंग रजपूत वंशांतील आहे. संस्थानचें उत्पन्न सुमारें ५ लाख आहे. खंडणी २२२५ रूपये आहे. राज्यकारभाराच्या कामांत राजाला त्याच्या हाताखालील दिवाण (वजीर) मदत करीत असतो. हा दिवाण अम्मलबजावणी खात्याचा व न्यायखात्याचा वरिष्ठ अधिकारी असतो. राजाच्या खालोखाल अधिकार दिवाणाचा असतो व राजाच्या अभावी दिवाणच राजाचें काम पहात असतो. पांच वज्त्रीरातीचे निरनिराळे परगणे आहेत. या परगण्यांमधून जमीनमहसूल गोळा करण्यासाठी निरनिराळे अधिकारी नेमले आहेत.
संस्थानांतील मुख्य कोर्टे चंबा शहरांतच आहेत. प्रत्येक वझारतीमध्यें तहशिलदाराप्रमाणेंच एकेक अधिकारी नेमलेला असतो. परंतु त्यास १००० रूपयांपर्येत दिवाणी खटले चालविण्याचा अधिकार असतो. अपिलें सदर कोर्टाकडे जातात. तेथून वजीराकडे व सर्वांवर मुख्य अपिलकोर्ट राजा होय. राजानें दिलेली मरणाची शिक्षा लाहोरच्या कमिशनरनें मुक्रर करावयाची असतें इंडियन पिनलकोड व क्रिमिनल प्रोसीजर कोड ही थोड्याबहुत प्रमाणानें संस्थानांत चालतात.