विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंबळा नदी - मध्यहिंदुस्थान व राजुपताना या प्रांतांतून वहात जाणारी व यमुनेला मिळणारी ही नदी, इंदूर संस्थानांत महुनजीक जनापओ डोंगरांत उगम पावून विंध्यगिरीच्या उत्तरेकडील बाजूनें इंदूर, ग्वाल्हेर वगैरे ठिकाणांहून राजपुतान्याकडे वहात गेली आहे. या नदीला मध्यहिंदुस्थानांत चंबळा व क्षिप्रा या उपनद्या मिळाल्या आहेत. बुंदी व कोटा यांच्या मर्यादा चंबळा नदीवरून झाल्या आहेत. कोटा शहरानजीक डोंगरकड्यांतून वाहणारा या नदीचा नीलवर्ण प्रवाह फार शोभिवंत दिसतो. कालीसिंध व पार्वती या उपनद्याहि तीस मिळाल्या आहेत. पुढें ईशान्येकडे वहात जातांना जयपूर, जोधपूर आणि ग्वाल्हेर यांच्यामधून ही नदी गेली आहे. जयपूर प्रांतांतील बनानदी या नदीला मिळते व तेथून ती धोलपूरच्या दक्षिण प्रांतांतून पुढें वहात जाते. धोलपूर शहराच्या दक्षिणेस तीन मैलांवर राजघाट या ठिकाणीं नावेचा पूल असून त्या घाटाच्या पूर्वेंस थोड्या अंतरावर एक रेल्वेचा मोठा पूल, हि नदी तरून जाण्याकरितां बांधण्यांत आला आहे. आग्रा व एटावा जिल्हे आणि ग्वाल्हेर यांमधून जाणारी ही चंबळानदी एटावा शहरापासून पंचवीस मैलांवर यमुनेला जाऊन मिळते. चंबळा व यमुना यांचा संगम झाल्यानंतरहि चंबळा नदीचा धवल प्रवाह बर्याच अंतरापर्यंत दिसून येतो. यमुनेला मिळेपर्यंत या नदीचा आक्रमणमार्ग ६५० मैल आहे. चंबळेचें मूळचें नांव “चर्मण्वति” होतें असें म्हणतात.