विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंपावत - संयुक्त प्रांताच्या अलमोरा जिल्ह्याची तहसील. हिचें क्षेत्रफळ १२५३ चौ. मै. आहे. इ. स. १९११ सालीं याची लोकसंख्या १३९४५३ होती. यांत १६०४ खेडीं आहेत; परंतु एकहि शहर नाहीं. इ. स. १९०३-०४ सालीं शेतीचा वसूल ६५००० रूपये व कराचें उत्पन्न ८००० होतें. नांगरलेली जमीन १६९ चौ. मै. होती. तीपैकीं १४ चौ. मै. जमिनीला पाटाचें पाणी देण्याची व्यवस्था होती. तनकपूरपासून लिपूलेख आणि दार्मा या घाटांकडे एक रस्ता जातो व त्या वाटेनें तिबेटशीं व्यापार चालतो.