विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंपारण - बिहार-ओरिसा. तिरहुत विभागांतील एक जिल्हा. याचें क्षेत्रफळ ३५३१ चौरस मैल आहे. हा गंडकी नदीच्या डाव्या तीरावर १०० मैल लांब व उत्तरेच्या बाजूस २० मैल व दक्षिणेच्या बाजूस ४० मैल रूंद पसरलेला आहे. यांत मळीच्या जमीनीचें मैदान पुष्कळ असून सोमेश्वर नांवाचा एक पर्वत आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून २८८४ फूट आहे.
सोमेश्वर पर्वताच्या दक्षिणेस दोन टेंकड्या आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांत जंगल असून त्यांतून इमारती लांकूड तोडतात व गवत गुराढोरांस चारितात. गंडकी नदीनें याचे दोन भाग केले आहेत. उत्तरेकडील भाग जुन्या मळीचा बनलेला असून त्यांत तांदूळ होतात, व दक्षिणेकडील भाग नव्या मळीचा असून त्यांत मका, हरबरा, वाटाणा, गहूं, जोंधळा, जवस, तीळ हीं धान्यें होतात. गंडकी नदींत सगौलीपर्यंत ७ ते १२ टन वजन घेऊन होड्यांतून जातां येतें, परंतु ही उन्हाळ्यांत आटते तेव्हां इच्यांतून पायीं देखील पलीकडे जातां येतें. भागमती नदीवर १५ ते १८ टन वजन घेऊन होड्या चालूं शकतात, व हिचा प्रवाह फार जोराचा आहे. पावसाळ्यांत हिला लवकर पूर येतो व कधीं कधीं पाणी दुथडी भरून फार नासधूस करते. या नदीचा प्रवाह पुष्कळ वेळा बदलत गेलेला आहे. या जिल्ह्याच्या मध्यभागांतून ४३ तळ्यांची एक ओळच्या ओळ आहे. याच्या उत्तरेकडील भागांत जंगल असून त्यांत साल, सिम्सू, खैर आणि तूती यांचीं झाडें फार आहेत. दक्षिणेकडील भागांत नांगरलेली शेतीची जमीन बरीच आहे. वस्तीच्याजवळ आंबा, जांभूळ वगैरे झाडें लाविलीं आहेत; व कोठें कोठें खजूरीचीं व ताडाचीं झाडें आहेत.
याच्या उत्तरेकडील जंगलांत वाघ, चित्ते व त्याच बाजूच्या खालील जंगलांत अस्वली आढळतात. यांत नीलगाई, नाना प्रकारचे मृग व हरिण, काळवीट व रानडुकरें हीं बहुतकरून सर्व भागांत आहेत. यांतील वर्षाचें उष्णमान सरासरी ७६ अंश असतें. यांत वर्षास सरासरी ५५ इंच पाऊस पडतो.
इ ति हा स.-येथील प्रचलित कथा, प्राचीन काळच्या अवशिष्ट वस्तू व आतां धुळीस मिळालेलीं प्राचीन शहरें हीं पूर्वींचा इतिहास दर्शवितात. पुरातन हिंदूंच्या काळांत हें घनदाट अरण्य होतें. ज्याठिकाणीं राम आणि लव व कुश यांचा संग्राम झाला त्या ठिकाणास संग्रामपूर नांव पडलें असें सांगतात. या प्रांताच्या कांहीं पोटविभागांशीं हिंदू ऋषींच्या नांवांचा संबंध आहे. इ. सनाच्या १००० वर्षांपूर्वीं चंपारण हें संस्कृत अध्यापनाचें माहेरघर असून, मिथिला राज्यांत होतें. अरराज व केसरीया येथें पुष्कळ मनोरंजक प्राचीन वस्तू आहेत. अशोकाच्या वेळेचा एक सुंदर खांब लौरिया मंदनगडजवळ उभा असून दुसरा रामपुर्वा नांवाचा खांब पिपरियाजवळ पडला आहे. बौद्धधर्माचा र्हास झाल्यानंतर एक हिंदू राजघराणें नेपाळांत सन १०९० ते १३२२ च्या दरम्यान सिमराऊन येथें राज्य करीत होतेसें दिसतें. त्या ठिकाणीं अजूनहि कांहीं धुळीस मिळालेल्या प्राचीन वस्तू आहेत. सन १७६५ त हा जिल्हा, बंगालच्या दुसर्या भागांबरोबर ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलाखालीं गेला. सन १८६६ पर्यंत हा सारभ जिल्ह्याचा भाग गणला जात होता. सन १८५७ त सगौली येथील शिबंदीनें दंगा केला होता. सन १९१२ त बंगाल्यांतून नवीन बिहार-ओरिसा प्रांतांत याचा समावेश झाला.
सन १९११ मध्यें लो. सं. १९०७३८७ होती; पैकीं १७१९४६३ हिंदू व २८६०९८ मुसुलमान होते. यांतील ठारू लोक पूर्वीं हिमालयाच्या पायथ्याशीं असलेल्या कोसी नदीपासून गंगानदीपर्यंच्या टापूंत रहात असत. त्यांच्या निरनिराळ्या टोळ्या असून त्यांची उपजीविका तांदुळावर होत असे. ते उद्योगी व प्रामाणिक शेतकरी होते. या जिल्ह्यांत डोमांची मगहीया पोटजात आहे. ते चोर व घरफोडीचे धंदे करणारे असून कामांत कोणी आडवे आल्यास ते चाकू व लाठ्या यांचा उपयोग करतात.
शे त की.-मोठ्या गंडकी नदीच्या उत्तरेकडील जमीनींत काळी माती आहे. या मातीला तेथें “बांगर” म्हणतात. ही जमीन धान्यास योग्य आहे. ही जमीन धान्यास योग्य आहे. परंतु पाटानें त्यास पाणी द्यावें लागतें. उत्तरेकडील कांहीं भागांत चिकण माती आहे. त्या ठिकाणीं तांदूळ होत नाहीं; त्यांत मका, जव, हरबरा, वाटाणा, उडीद, तीळ व जवस पिकतात. यांत दोन पिकें निघतात. एक पावसाळ्यांत दुसरें हिंवाळ्यांत. पावसाळ्यांतल्या पिकाची कापणी झाल्यावर त्याच शेतांत पुन्हां जवस, हरबरा, वाटाणा वगैरेंचीं पिकें काढतां येतात. यांत तांदुळाचें पीक मुख्य आहे. त्याखालोखाल जव, मका, गहूं वगैरेंचीं पिकें आहेत. याशिवाय यांत नीळ, गळिताचीं धान्यें, खसखस व ऊंस हीं होतात. खसखसीच्या लागवडीसाठीं सरकार अगाऊ पैसे देतें. स. १९०३-४ सालांत ५०००० एकर जमीनींत खसखस लावली होती व त्यांतून ३०० टन अफू निघाली. गंडकी नदींत व पांचनद, हरहा, भब्स, आणि सोनाह यांच्या ओहोळांतून कधीं कधीं सोन्याचे बारीक कण वहातात. बघहा ठाण्यांत अरराज, लौरिया, व हरहा नदीच्या तीराजवळ चुन्याचे वाटोळे दगड सांपडतात. हे दगड पक्की सडक करतांना त्यांत घालतात किंवा भाजून त्याचा चुनाहि होतो. या जिल्ह्याच्या सर्व भागांत क्षारमिश्रित माती आहे व त्यांतून नुनिआ जातीचे लोक सोरा काढतात. या उद्योगाचें मुख्य ठिकाण संग्रामपूर येथें आहे. इ. स. १९०३-०४ सालांत ३०,००० मण सोरा काढला गेला
व्या पा र व द ळ ण व ळ ण.- यांत जाडेंभरडें सुती कापड, घोंगड्या, कांबळीं व मातींचीं भांडीं होतात. बेट्टिहा येथील साखर शुद्ध करण्याचा कारखाना भरभराटीस येत चालला आहे. सराह येथें साखर करण्याचा कारखाना आहे. निळीचा व्यापारहि बराच चालतो. इ. स. १८१३ त बार येथें कर्नल हिक्के यानें प्रथम एक निळीचा कारखाना सुरू केला. आतां नीळीचे बरेच लहानमोठे कारखाने आहेत. निळीची लागवड ‘झिरात’ पद्धतीनें म्हणजे आपल्या नोकरांकडून किंवा ‘आसामीवार’ पद्धतीनें म्हणजे कास्तकारांकडून करवितात. या दोन्ही पद्धतींत निळीच्या झाडांची कटाई व गाडींत भरून वहाण्याचीं कामें जमीनमालकाकडे असतात. ज्या वेळेस कास्तकार लागवड करतात त्या वेळेस त्यांनां बी व लागल्यास कर्जाऊ पैसे मक्तेदार लोक देतात व त्यांचा हिशोब वगैरे वर्षाच्या शेवटीं होतो. निळीचीं झाडें तोडून एका मोठ्या पिपांत शिजवितात व त्यांनां बुडवून किंवा वाफेनें जो रस काढतात त्याला शिजविलें व वाळविलें म्हणजे रंगाच्या वड्या तयार होतात. १९०३-०४ सालांत निळीचें उत्पन्न २०.२० लाख रू. झालें. निळीच्या मोसमांत या कामांत दररोज ३३००० मजूर खपतात.
गांधींच्या जाण्यामुळें चंपारण्यास थोडेसें राजकीय महत्व प्राप्त झालें होतें. १९१६ च्या लखनौ काँग्रेसनंतर बिहार येथील नागरिकांच्या आग्रहावरून गांधी चंपारण्याकडे जाण्यास निघाले. निळीच्या बागांतून काम करणार्या मळेवाल्यांची स्थिती समक्ष पहाण्याकरितां ते त्या ठिकाणीं गेले होते. चंपारण्याच्या हद्दींत पाऊल टाकतांच तेथील मॅजिस्ट्रेटनें शांतता व सुव्यवस्था यांच्या संरक्षणार्थ गांधींनां मनाई केली व त्यांनींहि कायदेभांगाचें आव्हान सरकारास केलें. त्यांच्यावरील खटला काढून टाकावा असा वरील सरकारचा हुकूम झाला व बिहारच्या मळेवाल्यांची स्थिति पहाण्याकरितां एक कमिशन नेमण्यांत आलें व गांधीनांहि सदस्य म्हणून घेण्यांत आलें. १९१७ मध्यें चंपारण्यासाठीं बिहारकौन्सिलांत एक बिल मांडण्यांत आलें व नामदार मॉड यांनीं गांधींची स्तुति केली. परंतु मळेवाल्यांनां गांधीची ही धरसोड पसंत पडली नाहीं. व त्यांच्यावर अन्यत्रहि टीकेचा भडिमार वृत्तपत्रांतून होऊं लागला. या प्रसंगीं गांधींनीं आपलें धोरण अनत्याचारी व शांतपणाचें ठेवलें होतें.
या जिल्ह्यांतून नीळ, जवस, तीळ वगैरे धान्य व साखर हीं बाहेर जातात व मीठ, कपडा, मातीचें तेल, कोळसा व तंबाखू बाहेरून आंत येतात. नेपाळाकडे जाणारा मुख्य व्यापाराचा रस्ता चंपारण्यामधून गेला आहे. बराचसा व्यापार लहान गंडकी व मोठी गंडकी या नद्यांमधून होतो. या नद्यांवर गोविंदगंज, बरहरवा, मानपूर आणि बगहा या व्यापारी पेठा आहेत. याशिवाय यांत व्यापाराचीं ठिकाणें बेड्डीआं, मोतीहारी, चैनपतिआ, चापकाहिआ, रामगर्व केसरिया व मधुवन हीं होत.
बेंगॉल आणि नॉर्थवेस्टर्नरेल्वेची तिरहुत स्टेटरेल्वे नांवाची शाखा बेट्टीआला १८८३ च्या आगस्ट महिन्यांत खुली झाली. या रेल्वेचा व इस्टंइंडियन रेल्वेचा संबंध गंगा नदीवरील मोकमेह या ठिकाणीं तरीच्या योगानें होतो.
दु ष्का ळ.-हा जिल्हा दुष्काळाच्या फार आधीन आहे. सन १७७० चा मोठा दुष्काळ यांत फारच जाणवला, व बंगाल प्रांतांत एकंदर लोकसंख्येपैकीं एक तृतीयांश लोक बळी पडले असें म्हणतात. १८६६ च्या दुष्काळांत, जे दुष्काळ निवारण्याचे उपाय केले गेले ते अपुरे झाल्यामुळें ५०००० माणसें मृत्यूमुखीं पडलीं. सन १८७४ च्या दुष्काळाचें उग्रस्वरूप बगहा, शिकारपूर आणि अदापूर ठाण्यांत भासलें. परंतु त्याच्या प्रतिकारार्थ मोमोठीं कामें सुरू करून १० लाख रू. खर्च झाला व २८ हजार टन धान्य बाहेरून आलें त्यामुळें माणसें दगावलीं नाहींत. यानंतर सर्वांत मोठा कोरडा दुष्काळ १८९७ त पडला. १८९५ व ९६ सालांत पाऊस कमी पडल्यामुळें व वस्तूंच्या किंमती सर्व ठिकाणीं फारच वाढल्यामुळें हा दुष्काळ फारच उग्र स्वरूपाचा झाला.
रा ज्य व्य व स्था.- राज्यव्यवस्थेकरितां या जिल्ह्याचे सदर व बेदीआ असे दोन विभाग केले आहेत. सन १५८२ त अकबर बादशहाच्या तोडरमल्ल प्रधानानें जमिनीचा बंदोबस्त व मापणी प्रथम सुरू केली. त्यावेळेस जमिनीची मापणी १४८ चौरस मैल होती व महसूल १.३८ लाख रू. होता. १९०८ सालीं ज्यावर कर बसविला आहे अशी जमीन ३२०० चौ. मै. होती. सन १९०३-४ त १२४७ वतन वाड्यांस ५-१५ लाख रू. जमीनमहसूल होता. रयतेपैकीं शेंकडा ८६ लोकांचा आपल्या जमिनीवर मालकी हक्क व लागवडीच्या जमीनीपैकीं शेकडा ८३ जमीन त्यांच्या ताब्यांत आहे. “रयतेस आपला जमीनीवरील मालकीचा हक्क दुसर्यास देता येत नाहीं”, असा जरी कायदा आहे तरी असे प्रकार या जिल्ह्यांत फार घडतात, व विकत घेणारे निम्मे लोक धनको असतात. या जिल्ह्याचें एकंदर उत्पन्न ( फक्त मोठमोठ्या सदरांखालीं येणारें ) व शेतसारा अनुक्रमें ११.१४ लाख व ५.१५ लाख रूपये आहे. येथील शिक्षण मागासलेलें आहे. येथील लोक संख्येपैकीं शेकडा २.५ जणांस ( ४.५ पुरूष आणि ०.१ स्त्रीयांस ) लिहितां व वाचतां येतें.
[ हंटर-स्टॅटिस्टिकल अकाऊंट ऑफ बेंगाल पु. १३ ( १८७७ ); स्टीव्हन्सन-मूर-सेटलमेंट रिपोर्ट, कलकत्ता, १९००; इं. गॅ. १० ].