विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चन्नपट्टण, ता लु का.-म्हैसुरांतील बंगलोर जिल्ह्याचा एक तालुका. याचें क्षेत्रफळ ४५३ चौ. मैल आहे. येथील लोकसंख्या सन १९१ त १२२२६९ होती. सन १९०३-४ त यांतील शेतसारा १४३००० रू. होता. याच्या उत्तरेस टेंकड्या आहेत व पुष्कळ जमीन पडीत आहे. दक्षिणेस मोठीं तळीं आहेत व जमीन चांगली आहे. याच्या पूर्वेस अक्रावती व पश्चिमेस कम्बनदी आहे. यांत तुती व नारळाच्या झाडांचें बगीचे आहेत.
श ह र.-म्हैसूरच्या बंगलोर जिल्ह्यांतील चन्नपट्टण तालुक्याचें मुख्य शहर आहे. हें रेल्वेस्टेशन असून बंगलोर शहरापासून ३५ मैल आहे. सन १९२२ त येथील लोकसंख्या ७६२४ होती. इ. स. च्या १४ व्या शतकांत तेलगू लोकांतील बनजीग घराणें उदययास आलें होतें. त्यांत जगदेवराय नांवाच्या पुरूषानें सन १५७७ त पेनुकोंडाचा चांगला बचाव केला म्हणून विजयानगरच्या राजानें त्यास ९ लाख पगोड्याच्या उत्पन्नाचा प्रांत बहाल केला. त्यांत जगदेवरायानें आपली राजधानी आणली व सन १५८० त एक किल्ला बांधला होता. हा किल्ला हल्लीं मोडकळीस आलेला आहे. या ठिकाणीं बनजीग घराण्यांतील पुरूषांनीं सन १६८० पर्यंत राज्य केलें. नंतर हें म्हैसूरच्या ताब्यांत गेलें. यांत लाखेचीं भांडीं, मुलांचे खेळ. पोलादी तारा आणि बांगड्याचे कारखाने आहेत. येथें सन १८७० सालीं म्युनिसिपालिटी सुरू झाली. यांतील उत्पन्न व खर्च सन १९०३-४ त अनुक्रमें ५५०० रू. व ६४०० रू. होता.