विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंद्रनगर - बंगाल. हुगळी जिल्हा. हुगळी नदीवर फ्रेंच लोकांच्या वसाहतीचें शहर आहे. वसाहतीच्या सरहद्दीवर चंद्रनगर ई. आय. रेल्वेवर कलकत्यापासून २१ मैलांवर स्टेशन आहे. सन १९१७ मध्यें येथील लोकसंख्या २७३५६ होती. फ्रेंच लोकांनीं या ठिकाणीं सन १६८८ त कायमचें ठाणें दिलें. डुप्लीच्या कारकीर्दींत याची भरभराट झाली. अॅडमिरल वाट्सननें समुद्रावरून व क्लाइव्हनें जमीनीवरून याच्यावर मारा करून सन १७५७ त काबीज केलें; व सन १७६० त पुन्हां फ्रेंचांस परत केलें. जेव्हां जेव्हां यूरोपांत ब्रिटिशांची व फ्रेंचांची लढाई सुरू ही तेव्हां हें शहर ब्रिटिश आपल्या हस्तगत करून घेत व लढाई संपल्यावर पुन्हां परत करीत असें सन १८१६ पर्यंत चाललें होतें. शेवटीं सन १८१६ त तें फ्रेंचांच्या ताब्यांत दिलें. येथील कारभारी फ्रेंचांच्या वसाहतींतील गव्हरनरच्या हाताखालीं असतो. ब्रिटिश लोकांनीं जेव्हां अफूच्या व्यापाराचा मक्ता घेतला तेव्हां सन १८१५ च्या कराराप्रमाणें फ्रेंच लोकांस वर्षास ३०० अफूच्या पेट्या विकत घेण्यास परवानगी दिली. नंतर अफूच्या पेट्यांऐवजीं त्यांस वार्षिक ३००० रू. व त्यांच्या राज्यांतून कोणी अफूचा चोरटा व्यापार करूं नये व केल्यास तो बंद करावा याकरितां वार्षिक रू. २००० देण्यांत येतात. येथें डुप्ली नांवाचें एक कॉलेज आहे. एक ज्यूटची गिरणी आहे.