विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंद्रगुप्त - चंद्रगुप्त हा नंद घराण्यांतील होता. शेवटच्या नंदापासून मुरा नांवाच्या शूद्रेला झालेला हा मुलगा होता म्हणून यास मौर्य म्हणत अशी एक दंतकथा आहे. लहानपणीं अलेक्झांडरची व याची भेट झाली होती ( ख्रि. पू. ३२५. ) अलेक्झांडरच्या मरणानंतर चंद्रगुप्तानें ( तो मगध देशांतून हद्दपार झाला होता तेव्हां ) आपल्या चाणक्य नांवाच्या ब्राह्मण गुरूच्या सल्ल्यानें मॅसिडोनियन अधिकार्यांचा नाश केला; व नंतर त्याप्रमाणेंच पाटलीपुत्र येथें बंड करून नंद घराण्याचाहि नाश करून आपण स्वत:मगध राज्याच्या सिंहासनावर चढला; त्यानें सर्वत्र व्यवस्था करून एक प्रचंड साम्राज्य स्थापन केलें ( ख्रि. पू. ३२२ ). चंद्रगुप्त हाच ऐतिहासिक कालांतील हिंदुस्थानचा पहिला सार्वभौम बादशहा होय. यानें चोवीस वर्षें राज्य केलें. पाटलिपुत्र ही त्याची राजधानी होती.
अॅलेक्झांडरच्या मृत्यूनंतर ( ख्रि. पू. ३२३ ) त्याच्या राज्याचे तुकडे होऊन एकेक तुकडा त्याच्या एक एक सेनापतीस मिळाला. आशियामधील मुलुखावर अॅंटीगोनस व सेल्यूकस असे दोघे हक्क सांगूं लागले व बरींच भांडणें होऊन सेल्यूकसला राज्य मिळालें. अलेक्झांडरनें जिंकलेला जो प्रदेश चंद्रगुप्तानें ताब्यांत घेतला होता, तो परत मिळविण्यासाठीं सेल्यूकसने सिंधु नदी ओलांडून चंद्रगुप्तावर स्वारी केली; पण त्याचा पराभव झाल्यामुळें त्याला माघार घ्यावी लागली. नंतर त्यानें चंद्रगुप्ताशीं तह केला; त्यांत त्यानें काबूल, कंदाहार, हिरात, बलुचिस्तान इत्यादि प्रदेश चंद्रगुप्ताला दिले. याशिवाय चंद्रगुप्ताला सेल्यूकसनें आपली मुलगी दिली व मेगॅस्थेनीस याला चंद्रगुप्ताच्या दरबारीं आपला वकील म्हणून पाठविलें; मेगॅस्थेनीसनें मौर्य घराण्याबद्दल व तत्कालीन हिंदुस्थानाबद्दल पुष्कळ माहिती लिहून ठेविली आहे. चंद्रगुप्तानेंहि सेल्यूकसला ५०० हत्ती बक्षीस दिले.
वर दिलेल्या त्रोटक माहितीखेरीज चंद्रगुप्तासंबंधींची अधिक माहिती उपलब्ध नाहीं. यानें एकंदर २४ वर्षें राज्य केलें याच्या मरणसमयीं याचें राज्य नर्मदेच्या उत्तरेस सर्व हिंदुस्थानभर ( अफगाणिस्थानसुद्धां ) पसरलें होतें. कदाचित् दक्षिणेकडे देखील ( म्हैसूरपर्यंत ) त्याचें राज्य पसरलें असेल पण त्याबद्दल खात्रीलायक आधार सांपडत नाहीं. चंद्रगुप्ताच्या राज्यकारभारासंबंधीं जी माहिती मिळते तीवरून चंद्रगुप्त हा अतिशय कडक शिस्तीचा व व्यवस्थित होता असें दिसतें. त्याचा राज्यकारभार एकतंत्री होता. त्याचें मंत्रिमंडळ असे; परंतु चाणक्यानेंच शेवटपर्यंत याच्या राज्याचा कारभार फार उत्कृष्ट रीतीनें चालविला असें दिसतें. चाणक्याच्या शेवटाबद्दल कांहीं समजत नाहीं. अग्निपुराण व दंतकथा यांवरून एक मत तो बिंदुसारच्या वेळीं जिवंत होता व एक मत भडोचजवळील शुक्लतीर्थीं तो चंद्रगुप्तानंतर जाऊन राहिला असें आहे.
चंद्रगुप्ताची कारकीर्द शेवटाला कशी गेली याचा उलगडा होत नाहीं. जैनग्रंथांतून मात्र एक गोष्ट दिलेली आढळते. जैन लोक चंद्रगुप्ताला जैनधर्मी मानतात. व त्याच्या काळीं मगध देशामध्यें जैनधर्माचा प्रसार फार झाला होता असें म्हणतात. याच्याबद्दलची जैन आख्यायिका अशी आहे कीं “जैनमुनि भद्रबाहूनें उत्तर हिंदुस्थानामध्यें बारा वर्षें दुष्काळ पडेल असें भविष्य वर्तविलें होतें; व तें थोडें फार प्रत्ययाला येतांच त्या मुनीनें बारा हजार शिष्यांसमवेत सुपीक अशा प्रदेशावर जाण्याचा निश्चय केला. चंद्रगुप्तहि राज्यत्याग करून त्याच्या बरोबरच गेला. भद्रबाहू व त्याचे शिष्य श्रवण बेलगोल येथें ( म्हैसूरप्रांत ) आलें. येथें भद्रबाहू वारला व त्यानंतर बारा वर्षांनीं चंद्रगुप्त हा प्रायोपवेशन करून वारला ( ख्रि. पू. २९८ ). चाणक्याच्या अर्थशास्त्रावरून ( शेवटचा भाग ) चंद्रगुप्तानें ज्या नंदाला ठार मारिलें तो नंदराज नास्तिक ( जैन किंवा बोद्धधर्मीय ) होता असें दिसतें. चंद्रगुप्त नेहमीं शिकार करीत असे यावरून तो जैन नसून शैव ( ब्राह्मणधर्मी ) असावा असें वाटतें; व त्याचा शिक्षक आणि अमात्य ( चाणक्य ) तर साक्षात् ब्राह्मणच होता. याचें सैन्य चतुरंग ( दळ ) असून त्यांत सहा लक्ष पायदळ, नऊ हजार गजदळ व तीस हजार घोडदळ होतें; रथदळाची संख्या आढळत नाहीं; सारांश एकंदर चतुरंगदळ नऊ लक्षांचें होतें. चंद्रगुप्ताच्या राज्यांतील व देशांतील एकंदर परिस्थितीचें वर्णन ज्त्रा. को. चा प्र. खं. विभाग चौथा यांत आलेलें आहे तेथें पहावें. [ संदर्भग्रंथ मुद्रा राक्षस; अग्निपुराण; एशिआटिक रिसर्चेस. पु. १. रासमाला. पु. १. चाणक्य-अर्थशास्त्र स्मिथ-ऑक्सफर्ड ऑफ इंडिया ].