विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंद्रगिरी, ता लु का-हा मद्रास इलाख्याच्या चित्तूर जिल्ह्यांतील एक तालुका आहे. याचें क्षेत्रफळ ५४८ चौ. मै. आहे. याची लोकसंख्या सन १९२१ त १२२२०८ होती. हा अतिशय डोंगराळ मुलूख आहे. याच्या उत्तरेस पूर्वघाट व दक्षिणेस कारवेतनगर नांवाच्या टेंकड्या आहेत. टेंकड्यांमधील जमीनी फार सुपीक आहेत.
श ह र.-मद्रासच्या चित्तूर जिल्ह्यांतील चंद्रगिरी तालुक्याचें मुख्य शहर. हें स्वर्णमुखी नदीच्या तीरावर आहे. येथील लोकसंख्या सन १९०१ त ४९२३ होती. सन १५६५ त तालिकोटच्या लढाईंत पराभव झाल्यानंतर विजयानगरचे राजे या चंद्रगिरी किल्यांत आले. हा किल्ला इम्मदी नरसिंह यादव रायलू राजानें इ. स. १००० मध्यें बांधिला. हा किल्ला सन १६४६ त गोवळकोंडाच्या सुलतानानें व सन १७५८ त कर्नाटकच्या नबाबचा भाऊ अबदुल वहाबखानानें घेतला होता. हैदरअल्लीनें सन १७८२ त जिंकिल्यानंतर हा किल्ला सन १७९२ पर्यंत म्हैसूरच्या ताब्यांत होता. हा किल्ला अशा जागीं बांधिलेली आहे व तटबंदी इतकी मजबूत होती कीं जुन्या काळांत तो हल्ला चढवून सर करणें शक्य नव्हतें. या किल्यावरील इमारती, देवळें वगैरे ढांसळून पडलेलीं आहेत. ईस्ट इंडिया कंपनीला सेंट जॉर्ज किल्ला बांधण्यास येथील राजानें परवाना दिला.