विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंदावरकर, नारायण गणेश (१८५५-१९२३) - गौडसारस्वत ज्त्रातींत यांचा जन्म झाला. लहानपणीं हे मुंबईस शिकण्याकरितां आले ते कायमचेच मुंबईकर बनले. १८७९ साली चंदावरकर एल्एल्, बी पास झाले. त्यानंतर त्यानी वकिली सुरू केली. तेथून पुढें क्रमाक्रमानें मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश, युनिव्हर्सिटीचे चँन्सेलर, राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष, इंदूरचे दिवाण व शेवटी कायदेकौन्सिलचे अध्यक्ष असे मोठ्या सन्मानाचे निरनिराळे हुद्दे त्यांना लाभले. सरकारचा त्यांच्यावर विश्वास असून संरकारांत त्यांचे मोठें वजन असे. व सरकारहि रौलेट कमिटीनंतर बसविलेल्या कमिटीसारख्या कांही कमिट्यांवर त्यांचा उपयोग करून घेत असें. लहानपणापासून त्यांनां वर्तमानपत्रांत लिहिण्याचा सराव असें. बरेच दिवस त्यांनी इंदुप्रकाश चालविला होता. १८९९ पर्यंत ते फेरोजशहा मेथा यांचे सहकारी म्हणून राजकारणांत भाग घेत. पुढे न्यायाधीश झाल्यापासून लोकपक्षाला ते जवळ जवळ मुकल्यासारखेच झाले. सामाजिक सुधारणेंत त्यांची मतें पाश्चात्य नमुन्याची होती, पण तितकी ते आचरणांत आणीत नसत. धर्माच्या बाबतीत ते प्रार्थनासमाजिष्ट म्हणून वावरत. भक्तिसंप्रदायावर त्यांचा मोठा विश्र्वास असें.