विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चंदरभान - प्रतियाला संस्थानामधील एक ब्राह्मण रहिवाशी. याला फारशी भाषा चांगली अवगत असून शहाजहानाचा वडील मुलगा जो दारा शुकोह, त्याच्या पदरी हा मुन्शी म्हणून नोकर होता. त्यानें फारशी भाषेंत बरीच ग्रंथरचना केली आहे. ‘ गुलदस्त’, तुहफत-उल-अनवार,तुहफत्-उल्-फस्- हा, जम्मा-उल्-फका ’ हे त्याचें प्रमुख ग्रंथ होत. ‘ चार चमन ’ आणि ‘मन्शात ब्राह्मण’ या दोन पुस्तकांत त्यानें निरनिराळ्या व्यक्तीनां लिहिलेल्या पत्रांचा संग्रह केला आहे. कित्येक प्रंसगी चंदरभानानें ‘ ब्राह्मण ’ या टोपण नांवाखाली काव्यरचना केली आहे. दारा शुकोहच्या दु:खजनक निधनानंतर तो काशीस परत जाऊन राहिला. १६६२ साली चंदरभान काशी येथें मृत्यु पावला. त्यानें आग्रा शहरी एक मोठा वाडा बांधला होता. परंतु त्याचे कांही एक अवशेष आज सांपडत नाहींत. [ बील-ओरि.बॉया. डिक्श.]