विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चँथेम- हें इंग्लंडातील केंटचें बंदर असून म्युनि. व पार्लमेंटरी बरोचा भाग आहे. भेडवे नदीच्या उजव्या तीरावर हें असून लंडनच्या आग्नेयीस साऊथईस्टर्न अँड चँथँम रेल्वेनें ३४ मैल आहे. १९२१ साली येथील लोकसंख्या ४२६६५ होती. येथें सेंटमेरी नांवाचें प्रार्थनामंदिर आहे. अर्चेगलच्या उत्तरमार्गाचा शोधक स्टिफेनबरो याचा पुतळा येथें आहे. सेंट बार्थरलोमा मुख्य प्रार्थनामंदिर गंडूल्फ नांवाच्या राचेस्टरच्या बिशपनें १०७० साली स्थापिलें. सर जॉन हॉकिन्सनें १५९२ साली वृध्द खलाशी व समुद्रावरील अनाथ लोकांकरितां सदावर्त (आल्म हाऊस) काढलें. जनरल गॉर्डन व हिंदुस्थानच्या खुष्कीमार्गाचा उत्तेजक थॉमस बार्घान यांचे पुतळे येथें आहेत. पिट्ट किल्यांत लष्करी रूग्णालय आहे. खलाशी लोकांकरितां येथें निराळें रूग्णालय आहे.
येथें लष्करी शाळा आहेत. येथील गोदीचें क्षेत्रफळ ५१६ एकर आहे. पार्लमेंटरी विभागांतून १ सभासद पार्लमेंटांत जातो. राज्यकारभार १ मेयर, ६ शहरचे सनदी अधिकारी व १८ सभासद यांच्या हातांत असतो. शहराचें क्षेत्रफळ ४३५५ एकर आहे. शहराजवळच ल्युटन नांवाचें एक खेडें आहे.
डूम्सडे मोजणीच्या वेळी चँथँम हें ओडो ह्याच्या ताब्यांत होते. मध्ययुगांत परगणा म्हणून एलिझाबेथनें येथें शस्त्रागार व गोदी बांधली. हें इंग्लडचे मुख्य लष्करी ठाणें होतें. १७५८ साली चँथँम टेंकडी खोदून काढल्यामुळें मानवअवशेष, मडकी, व नाणी वगैरे जिनसा सांपडल्या. १८३२ सालच्या रिफॉर्म (सुधारणा) बिलान्वयें हें पार्लमेंटरी विभाग झालें.