विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चतुर्थ – हे लोक मुख्यत्वें महाराष्ट्राच्या दक्षिण भागांत आढळतात. लोकसंख्या (१९११) ८९२०८. हे दिगंबर पंथाचे जैन असून यांच्या चालीरीती जैनांप्रमाणेंच आहेत. यांचा परंपरागत धंदा शेतीचा आहे. मिरजनजीक नंदीमठाचा “ जैन श्रीस्वामी ” हा सर्व चतुर्थ लोकांचा गुरू असून व्यावहारिक व धार्मिक बाबीत याचा अधिकार श्रेष्ठ मानतात. धारवाड जिल्ह्यांतील खेड्यांचें ४ वर्ग केले असून त्या प्रत्येकांवर “ सरसंगमी ” हा स्वामीचा प्रतिनिधी नेमलेला असतो. सामाजिक पश्नांचे निकाल जातीच्या सभेंत सरसंगमी देतो. दारू पिणें व जोडे विकणें इत्यादि जातिनियमभंगाबद्दल दंड होतो व दंडाचा पैसा सरसंगम्याकडे जाऊन तो देवळें, मठ, व शिक्षण यांकडे खर्चिला जातो. बेळगांव जिल्ह्यांतील चतुर्थांमध्यें दंड न दिल्यास वस्तीत व जैन देवळांत जाण्याची बंदी होते व जातीबाहेरहि टाकण्यांत येंतें. [मुं. से. रि. १९११].