विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चतुरसिंग – हा सातारच्या धाकंट्या शाहूमहाराजांचा भाऊ. इ. स. १७९८ साली शाहूपासून सातारचा किल्ला घेण्याकरितां रावबाजीनें पाठविलेलें परशुरामभाऊचें सैन्य अचानक आलें व त्यानें सातारचा किल्ला ताब्यांत घेतला. या सुमारास चतुरसिंगानें आपले थोडेसे लोक कसे तरी जमवून पाठलाग होत असतांहि तो कोल्हापूरच्या राजाकडे निसटून गेला.
त्या वेळी चतुरसिंगाच्या मागें रास्त्यांची व प्रतिनिधीची फौज पाठलाग करण्याकरितां कोल्हापुरच्या राज्यांत आली होती. तिनें वारणा नदीच्या तीरावर आपला तळ दिला असतां चतुरसिगांच्या लोकांपैकी ५०० स्वारांनी ही बातमी त्यांस दिली. तेव्हां त्यानें ह्या लोकांच्या व कोल्हापुरकरांकडून मिळविलेल्या फौजेच्या मदतीनें रास्त्यांच्या लोकांवर हल्ला करून जवळजवळ त्यांचा पराभव केला. पुढें लवकरच चतुरसिंगानें परशुरामभाऊच्या फौजेवरहि अचानक छापा घालून तिची दाणादाण केली. भाऊ साता-याहून गेल्यावर त्यांच्या मागें रास्त्यांची दोन तीन हजार फौज साता-याजवळ तळ देऊन राहिली आहे असें चतुरसिंगास समजलें. तेव्हां त्यानें रानावनांतून आडवाटेनें ६०० प्यादे साता-यानजीक आणले व तेथें तो अंधार पडेपर्यंत लपून राहिला. रात्र होतांच त्याचें प्यादे हातपाय, तोंड व कपडे हळदीनें पिवळे करून जिवावर उदार होऊन बाहेर पडले. रास्त्यांचे. लोकहि बेसावध नव्हते; त्यांनी एकदम तोफांचा मारा सुरू केला. परंतु चतुरसिंगाच्या लोकांनी शत्रूवर त्वेषानें हल्ला चढविला, तोफा हस्तगत केल्या व रास्त्यांची फौज उधळून लावली. या त्याच्या धाडशी कृत्यांमुळे मराठे शिपायांत त्याचा चांगला नांवलौकिक होऊन थोडक्याच महिन्यांत त्याला बरेच अनुयायी मिळाले. पुढें त्यानें पैशावांचून व स्वत:जवळ कमी सैन्य असतांहि रास्त्यांच्या ७००० फौजेस नीरेपासून वारणेपावेतों इकडून तिकडे नाचविलें. या कामांत चतुरसिंगाचा अनेकदां पराभव झाला व एके प्रंसगी तर त्याच्या पांचशे लोकांस रास्त्याच्या ५००० स्वारांनी वेढा दिला असतां तो मोठ्या मुष्किलीनें शत्रूची फळी फोडून बाहेर पडला. ह्या प्रयत्नांत त्याचे अर्धे अधिक लोक गारद झाले. तथापि त्यानें कित्येक गांवापासून अनेकवार कर वसूल केले व सर्वत्र धुमाकूळ व वंडाळी माजविली. त्याचें तें धाडस व संकटांतून स्वत:चा बचाव करण्याची त्याची शिताफी वाखाणण्यासारखी होती.
यशवंतराव होळकर दक्षिणेंत आला तेव्हां चतुरसिंग हा कांही काळापर्यंत त्यास सामील झाला होता. त्यावेळी तो फत्तेसिंग माने याच्या तुकडीबरोबर पेशव्यांच्या मुलखास उपद्रव देत फिरत होता. पुढें यशवंतरावानें अमृतरावाच्या पुत्रास पेशवा करण्याचा घाट घातला, तेव्हां चतुरसिगानें खटपट करून सातारच्या महाराजांकडून त्यास वस्त्रें देवविली (१८०२). यानंतर चतुरसिंगाने हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांत नोकरी केली. असई येथें जी लढाई झाली तीत तो इंग्रजांविरूध्द मोठ्या शौर्यानें लढला (१८०३). पुढें त्यानें कांही दिवस होळकरांच्या सैन्यांत, कांही दिवस अमीरखानच्या सैन्यांत व कांही दिवस रजपुतांच्या सैन्यांत नोकरी केली. १८१२ साली तो खानदेशांतून स्वदेशी परत येत असतां, त्रिबकजी डेंगळ्यानें त्यास आपल्या भेटीस बोलवूद कैद केलें. व त्याच्या पायांत बेड्या घालून त्याला कोंकणांत कांगोरीच्या किल्ल्यांत ठेविलें. चतुरसिंगाच्या लोकांनी त्याला सोडविण्याकरितां अनेक प्रयत्न केले पण ते सर्व निष्फळ झाले. व सरतेशेवटी चतुरसिंग हा १८१८ च्या एप्रिल महिन्यांत कांगोरीच्या किल्ल्यांतच मरण पावला. [ खरे- ऐ. ले. सं. पु. १०,११: डफ. पु. ३.].