विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चतुरमहाल - ही अयोध्येच्या शेवटच्या नबाबाच्या बेगमांपैकी एक बेगम होती. अयोध्येचें राज्य खालसा झाल्यानंतर कुरबान अली नांवाच्या ई. इं. कंपनीतील एका शिरस्तेदारानें हिच्याशी लग्न लावलें. त्यामुळें तो श्रीमंत झाला, प्रथम कुरबान अलीनें हिचा परिचय करून घेऊन नंतर लग्नाच्या कामी तिची संमति मिळविली. तथापि कुरबान सारख्या अगदी हलक्या दर्जाच्या इसमाशी खुद्द अयोध्दा येथें उघडपणें लग्न लावण्याची तिला लाज वाटून तिनें मक्केच्या यात्रेस जाण्याच्या निमित्तानें अयोध्या सोडण्याची चीफ कमिशनरकडून परवानगी मिळविली. नंतर ती लखनौपार झाल्यावर कुरबान अली तिला जाऊन मिळाला व बुंदेलखंडांतील बिजनौर शहरी उभयतांनी लग्न लाविलें. [बील.]