विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चडार – मध्यप्रांतांतील विणक-यांची एक लहान जात. सागर, दमोह. जबलपूर व नरसिंगपूर जिल्ह्यांत हे राहतात. यांची संख्या २८००० आहे. यांचें नांव ‘ चीरकार ’ या संकृत शब्दापासून निघालें असावें. यांच्या दोन जाती आहेत. एक परमेसुरिया व दुसरी अथिया. पहिले विष्णूची पूजा करतात व दुसरे देवीची पूजा करतात.
यांचे असगोत्रविवाही वर्ग उर्फ बैंक आहेत. जसे धाना, कासिया, गोइया, वद्दालिया, गुजारिया, मोरिया, लहारिया, खटकीरा, वरैया, नेओरा, भर्तुचरैया, इत्यादि; एकंदर ३९ आहेत व आपल्या वंशाच्या नांवाचा प्राणी किंवा झाड यास ते लग्नादिप्रंसगी पूजितात व त्याची हत्या करीत नाहीत. मुलीची लग्नें ५ व्या, ७ व्या, ९ व्या व ११ व्या वर्षी करतात व मुलांची लग्नें ८ व्या व १६ व्या वर्षी करतात. जर अविवाहित मुलीला जातीच्याच माणसानें भ्रष्टविली तर तिचें लग्न विधवेप्रमाणें करतात; परंतु दुसया नीच जातीच्या माणसाबरोबर तिनें व्यभिचार केला तर तिला जातीतून बाहेर घालवितात. जर कोणाची बायको दुसयाबरोबर पळाली तर त्यानें नव-याचा लग्नखर्च भरून दिला पाहिजे. यांचा दर्जा फार नीच आहे. अंत्यजापेक्षा हे थोडेसे उच्च समजले जातत [ रसेल व हिरालाल].