विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चक्रवर्ती - हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ जगाचा राज्यकर्ता सम्राट असा आहे. या शब्दाला प्राचीन संस्कृत वाङ्मयांत महत्व असून बौध्द व जैन वाङ्मयांतहि हा शब्द बराच आढळतो. “चक्र” म्हणजे चाक किंवा वर्तुल आणि “वर्तिन” म्हणजे राहणारा असा याचा व्युत्पत्यर्थ आहे. सार्वभौम म्हणजे सर्व पृथ्वीचा राजा असणें ही कल्पना फार प्राचीन काळापासून हिंदुस्थानांतील राज्यकर्त्यांत प्रबल असलेली आढळते. राज्याभिषेक होतांच आठहि दिशांतील राजे पराभूत करून नंतर अश्वमेध यज्त्र करण्याची महत्वांकाक्षा व परिपाठ सर्व पराक्रमी राजांनीं पाळलेला आढळतो. ही सार्वदिग्विजयाची परंपरा चालू ठेवण्याची कल्पना मुसुलमानी अमदानींतहि इ.स.१४ व्या शतकांपर्यंत कित्येक रजपूत राजांमध्यें द्दष्टीस पडते. अशा राजांस सम्राट हा शब्द योजिलेला आहे.
चक्रवर्ती हा शब्द मैत्रायणी उपनिषदांत (१.४) महाधनुर्धरांची यादी देऊन “त्यांतील कांहीं चक्रवर्ती होते” असें म्हटलें आहे व तेथे हरिश्चंद्र, अंबरीष, ययाति, भरत वगैरेंचा उल्लेख आहे; महाकाव्यांपैकीं रामायणांत हा शब्द योजिलेला नाहीं; आणि महाभारतांतहि मुख्य कथेंतील कोणाहि राजास हें पद लाविलेलें नाहीं. मात्र महाभारातांतील उपकथांत भरत, मांघातृ, मरूत वगेरे राजांना उद्देशून हा शब्द योजलेला आढळतो. पौराणिक वाङ्मयांपैकीं विष्णुपुराण (१.१३,४६), भागवतपुराण (४.१५, १६) वगैरेंमध्यें चक्रवर्ती राजांबद्दल उल्लेख असून मार्कंडेय पुराणांत अशा राजांचीं चिन्हें जीं चौदा महारत्नें त्यांची यादी पुढीलप्रमाणें दिली आहे :- हत्ती, अश्व, रथ, पत्ती, बाण, कोष, माला वस्त्र, वृक्ष, रत्न, छत्र, विमान इत्यादि.
बौध्द व जैन धर्मांत बुध्द व जिन हे जसे अध्यात्मिक सामर्थ्याचे तसा चक्रवर्ती हा भौतिक सामर्थ्याचा प्रतिनिधि मानला जातो. गौतम हा बुध्द बनला नसता तर चक्रवर्ती झाला असता असें मानितात; कारण बुध्दाच्या ठायीं चक्रवर्तीप्रमाणें महापुरूषांची बत्तीस लक्षणें होतीं. जैन लोक भरत, सगर, मधवन्, सनत्ककुमार, शांति, कुथु, अर, सुभूम, पदम, हरिसेन जय व ब्रम्हदत्त असे बारा चक्रवर्ती मानतात.