विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चक्कियर - मद्रासेंतील अंबलवासीचा एक वर्ग. हा व्यभिचारी नंबुद्रि बायकांपासून झालेल्या लोकांचा बनलेला आहे. नंबुद्रि बायका व्यभिचार करू लागल्यानंतर त्यांच्या दोषा विष्करणापूर्वी व त्यांनां जातींतून काढून देण्यापूर्वीची यांची उत्पति आहे. अशा उत्पन्न झालेल्या मुलांपैकीं ज्यांचें मौजी बंधन दोषाविष्करणापूर्वी झालेलें असतें त्यांस चक्कियर असें म्हणतात; आणि ज्यांचें झालेले नसतें त्यांस चक्कियर नंबियर असें म्हणतात. मुली या दोन जातीपैकीं कोणत्याहि जातींत जाऊं शकतात. यांच्या बायकांना इलोदम्मा असें म्हणतात आंणि चक्कियर नंबियरच्या बायकांना नंगियर असें म्हणतात. यांचा परंपरागत धंदा म्हटला म्हणजे चालू गोष्टींना किंवा श्रोते मंडळींनां उद्देशून केलेल्या उल्लेखासहित पुराणांची टीका व पुराणें तोंडपाठ म्हणणें हा होय. म्हणतांना तें मिझवू म्हणून धातूचे नगारे वाजवितात. नंबियर झांजेची सांथ करितात. कधीं कधीं नंबियर एक प्रकारचा कुतु लोकांचा खेळ (मूक नाटय) करून दाखवितात. चक्कियर हे यज्त्रोपवीत धारण करितात परंतु नंबियर हे करीत नाहींत. चक्कीयर हे नंबियर बायकांशी विवाह करुं शकतात. परंतु नंबियर हे इलोदम्मांशीं लग्न करुं शकत नाहीत. त्यांचा सुतकाचा व वृध्दीचा काल ११ दिवस असतो [से.रि. (कोचीन) १९११].