विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घोती घराणें - गजनी घराण्यांतील बहराम (१११८ ११५२) याच्या कारकीर्दीत जिकडे तिकडे तंटे चालू होते. गजनी व हिरात यांमधील प्रदेशांत घोर प्रांत आहें. हेंच अफगाण लोकांचें मूळ ठिकाण. आरबांनीं हा प्रांत जिंकून तेथील लोकांस मुसुलमान बनविलें. बहरामच्या वेळीं घोरचे अफगाण बलाढय होऊन स्वतंत्र झालेले होते. यांची राजधानी फिरोझ नांवाची होती. फिरोझकोहचा हल्ली
नक्की तपास लागत नाहीं. त्यावेळीं कुत्-बुद्दीन सूर नामक घोरचा अंमलदार होता. हा कुत्-बुद्दीन व बहराम यांमध्यें वैमनस्य उत्पन्न होऊन बहरामनें कुत्-बुद्दीन घोर याला ठार मारिलें. खुत बुद्यीन हा बहरामचा जांवई होता.
कुत्-बुद्दीनच्या सैफ-उद्दीन व अल्ला-उद्दीन नामक भावांनीं बहरामचा सूड घेण्याचा निश्चय केला. सैन्याच्या विश्वासघातानें सैफ उद्दीन हा बहरामच्या हातीं सांपडल्या मुळें बहरामनें त्याचे हाल हाल करून त्यास ठार मारिलें. या कृत्यानें अला-उद्दीन चिडून गेला व लवकरच लढाई जुंपूनतींत अला उद्दिनास विजय प्राप्त झाला. त्यानें गजनी शहरांत शिरून तें शहर जाळून पोळून उध्वस्त केलें. त्यामुळें त्याला जहानसोझ् (जग जाळणारा) म्हणूं लागले. बहराम पराभव पावून पळत असतां वाटेतच मरण पावला (११५२).
बहरामच्या पश्चात त्याचा पुत्र खुश्रू यानें गजनी शहर परत मिळविण्याची बरीच खटपट केली. परंतु तींत त्याला यश न आल्यामुळें त्यानें लाहोरास आपली राजधानी नेली. परंतु त्याच्या राज्यास उतरती कळा लागली; कारण सर्व लोक घोरच्या सुलतानास (अला-उद्दिनास) मिळाले. खुश्रू इ.स.११६० त मरण पावला. त्याचा मुलगा मालिक खुश्रू हा गजनी वंशाचा शेवटचा सुलतान होय. पुढें त्याच्या मरणानंतर राज्य घोरच्या अफगाणांनीं बळकाविलें.
गजनी शहर हस्तगत केल्यावर अलाउद्दीन आपल्या घोर प्रांतांत जाऊन फिरोजकोह येथें स्वस्थ बसला. तो ११५६ त मरण पावला. त्याला सैफ-उद्दीन नांवाचा एक पुत्र होता त्यास राज्य मिळालें. परंतु त्याचा लवकरच खुन झाल्यामुळें ग्यास्-उद्दीन व शहाबुद्दीन नांवाचे त्याचे चुलत भाऊ म्हणजे अला-उद्दीनाचे पुतणे राज्यकारभार पाहूं लागले. दोघा राजांनी एकमतानें राज्यकारभार चालविल्याचे मुसलमानीं इतिहासात हें एकच उदाहरण आहे. शहाबुद्दीनची द्दष्टि हिंदुस्थानाकडे होती. त्यानें स्वत:स महंमद असें नांव घेतलें. त्याचा भाऊ ग्यास्-उद्दीन १२०२ त मरण पावल्यावर सर्व राज्य शहाबुद्दीन उर्फ महंमद घोरी याजकडे आलें. ग्यास्उद्दीन यानें हिरात येथें एक उत्तम मशीद बांधिली होती. ग्यास्उद्दीन यानें हिरात येथें एक उत्तम मशीद बांधिली होती. ज्याप्रमाणें गजनीच्या महंमूदानें हिंदूस्थान उध्वस्त केलें त्याप्रमाणेंच महंमद घोरीनें ११७६ पासून १२०६ पर्यंतच्या तीस वर्षात हिंदुस्थान देशात धुमाकूळ घातला.
हिंदुस्थानातील मुसुलमानी प्रांत आपल्या ताब्यांत घेणें हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्यानें ११७५-७६ त मुलतान काबीज केलें व सिंधु नदीवरील ऊच्च येथील राजाच्या मुलीशी लग्न लाविलें. पुढें ११७८ त त्यानें हिंदुस्थानावर दुसरी स्वारी करून गजनीच्या खुश्रू मलिकचा पाडाव केला; व ११८२ पर्यंतच्या काळांत सिंध प्रांत काबीज केला. नंतर ११८४ त त्यानें लाहोर प्रांत उध्वस्त करून टाकिला व खुश्रूमलिकला फसवून कैद करून (सन ११८५-८६) त्याला फिरोजकोह येथें पाठवून दिलें. कांहीं दिवसांनीं गजनीच्या या सुलतानाचा तेथें शिरच्छेद करण्यांत आला.
महंमद घोरीनें आपल्या सर्व मुसुलमान प्रतिस्पर्ध्यांचा बंदोबस्त केल्यावर हिंदू लोकांकडे त्यानें आपली द्दष्टि वळविली. त्यानें हिंदू लोकांस आपल्या फौजेंतून काढून टाकन मुख्यत: अफगाण व तुर्क यांचा भरणा केला. यावेळीं पृथ्वीराज चव्हाण हा बलाढय राज हिंदुस्थानांत राज्य करीत होता. अजमीर व दिल्ली हीं दोन्हीं राज्यें पृथ्वीराजाकडे होतीं. परंतु कनोजचा राज जयचंद राठोड व पृथ्वीराज यांमध्यें वैमनस्य असल्यामुळें जयचंदानें पृथ्वीराजाचा नाश करण्याकरितां महंमद घोरीला हिंदुस्थानांत बोलाविलें. महंमद घोरी हिंदुस्थानांत येण्याच्या तयारींतच होता; जयचंदाचें हें निमंत्रण त्याच्या पथ्यावरच पडले. इ.स.११९१ त महंमद घोरी व पृथ्वीराज यांची गाठ पडून पानपत जवळ नारायणगांव येथें लढाई झाली. तींत महंमद घोरीचा पूर्ण पराभव होऊन तो कैद झाला. परंतु आठ हजार घोडयांची खंडणी दिल्यावरद त्यास पृथ्वीराजाचें उदारपणें सोडून दिलें. या पराभवामुळें महंमद घोरीला तळमळ लागून राहिली. पृथ्वीराजाचा सूड उगविण्याचे विचार त्याच्या मनांत सतत घोळूं लागले. दुस-या वर्षी त्यानें १२०००० सैन्य जमविलें. या सैन्यात अफगाण, तुर्क व इराणी लोक होते. जयचंद राठोड वगैरे लोकांशीं त्यानें फितूर करून ठेविला होताच. इकडे पृथ्वीराजाच्या मदतीसहि बरेच रजपूत जमा झाले होते. दोन्ही सैन्यांची गांठ स्थानेश्वर येथें पडून प्रथमत रजपूतांची सरशी झाली. परंतु ते बेसावध राहिल्यामुळें महंमदानें त्यांच्यावरद एकदम हल्ला करून रजपूत सैन्याची दाणादाण केली. पृथ्वीराज हा घोरीच्या हातांत सांपडल्यावर त्यानें त्याला ठार मारिलें. मुसुलमानांस मागें हटविण्याची यावेळीं रजपुतांनीं शिकस्त केली; परंतु कांहीं उपयोग झाला नाही.
त्यानंतर महंमदानें अजमीर, हंसी वगैरे शहरें घेऊन तेथील लोकांची कत्तल केली. हिंदूचीं देवळें फोडून त्या जागीं मशीदि बांधिल्या आणि राजवंशापैकीं एक मुलास आपला मांडलिक म्हणून अजमीरच्या गादीवर बसविले व ऐबक नांवाच्या आपल्या एका गुलामास सुभेदार नेमून महंमद गझनीस परत गेला. याच कुतबुद्दीन ऐबकनें आपल्या धन्याच्या मृत्यूनंतर दिल्ली येथें आपलें राज्य स्थापलें (गुलाम घराणें पहा).
कांहीं दिवसांनीं महंमदा घोरीनें कनोजच्या जयचंद राठोडाचा पाडाव करून तें शहर लुटलें. याप्रमाणें जयचंदास त्याच्या देशद्रोहाचें फळहि मिळालें. ऐबकनें ग्वाल्हेर, काल्पी, कलिंजर वगैरे शहरें घेतलीं. महंमदानें काशी लुटून बहार प्रांतावरहि स्वारी केली व अनेक देवळें फोडलीं. बखत्यार खिलजी नामक एका सरदारानें बंगाल, बहार व अयोध्या हे प्रांत जिंकून बंगालची राजधानी गौड (लखनौती) हें शहर हस्तगत केलें. तिकडे खिवाच्या शहाशीं महंमदाचा तंटा होऊन त्या दोघांमध्यें लढाई जुंपून त्यांत महंमदाचा पराभव झाला; व मोठी खंडणी देऊन त्यानें आपली सुटका करून घेतली. पंजाबच्या आसमंतांतींल गक्कर लोकांनीं पुंडाई सुरू केल्यामुळें महंमदानें त्यांचा बंदोबस्त केला. परंतु कांहीं दिवसांनीं सिंधूकांठच्या रोहटक गांवीं याच गक्कर लोकांनीं महंमद बेसावध पणें राहिला असतां त्याचा खुन केला (१२०६). महंमदाच्या कारकीर्दीत पंजाबपासून बाबिलोनपर्यंत व आक्सस नदीपासून आर्मझ सामुद्रधुनीपर्यंत त्याचें राज्य पसरलें होतें असे म्हणतात.
महंमद हा शूर होता, परंतु त्याच्या अंगीं विशेष चातुर्य असल्याचें दिसून आलें नाहीं. तो स्वत: विद्वान नसल्यामुळें विद्वान लोकांस त्यानें आश्रयहि दिला नाहीं. त्याचा बहुतेक काळ लढायांस गेला. त्यानें मूलबाळ नसल्यामुळें त्याचे हिंदुस्थानांतील राज्य त्याचा हुशार गुलाम ऐबक याजकडे आलें त्याचा पुतण्या महंमद यास गझनीचें राज्य मिळालें, परंतु त्याच्या मरणानंतर तें राज्य खारिजमच्या खिवाच्या शहांनीं घेतलें. अशा रीतीनें घोरी घराण्याचा शेवट हिंदूस्थानांत १२०६त व गझनीस १२१५ त झाला. (लेनपूल; सरदेसाई मुसुल. मानी रियासत. एन्सायक्ले. ब्रिटा. पु.११; इंपे.गॅझे.पु. १२).