विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

घोडें - मुंबई.पुणें जिल्हा. खेड तालुका. खेडच्या उत्तरेस २५ मैलांवर वसलेंले एक खेडें. खेड तालुक्यांतील आंबेगांव पेटयाचें हें मुख्य ठिकाण आहे. येथें आठवडयाचा बाजार भरतो. गांवात एक मशीद आहे. तीतील खांबावर फारशी भाषेंत कोणी पीर महम्मदानें ही मशीद १५८० सालीं बांधली अशा अर्थाचे दोन लेख आहेत. १८३९ सालीं कांहीं कोळी लोकांनी येथील खजिन्यावर छापा घातला होता. पण असिस्टंट कलेक्टर मि.रोज ह्यांनीं गावक-यांच्या मदतीनें हल्ला परतविला.