विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घेवडा - याचें लॅटिन नांव डोलीबोसएबलन. घेवडयाचे वेल असतात. ते कित्येक एक वर्ष व कित्येक अनेक वर्षे टिकणारे असतात. कित्येकांचे वेल ४I५ फूट वाढणारे तर कित्येक जाती एखाद्या झाडावर चढविल्या असतां सर्व झाड व्यापून टाकतात. यांचीं पानें त्रिदळीं असतात. फुलें पांढरीं, निळीं, तांबडीं वगैरे रंगांचीं असतात. या वेलांस शेंगा येतात. त्या २ ते १२ इंच लांब व अर्धा ते ४ इंच रूंद असतात. त्यांत १ ते १२ पर्यंत दाणे असतात. दाणे उग्रट गोडसर असतात. कित्येक जातींच्या शेंगांस कोंवळेंपणापासूनच कीड लागते.
बहुतेक जातींच्या घेवडयांची कोंवळेपणीं शेंगा व दाण्यांची एकत्र शिजवून भाजी करितात. घेवडयांत डफळ म्हणून एक जात आहे. तिच्या सालींची भाजी कधींच करीत नाहींत; कारण त्या शिजून नरम होतच नाहीतं. घेवडे जून झाल्यानंतर त्यांच्या हिरव्या दाण्यांची (सोलाणे) उसळ करितात. घेवडयाचें वाळलेलें बीं २I३ दिवस भिजवून फुगलें म्हणजे त्याचीहि उसळ करितात. घेवडयाच्या मुख्य जाती पुढीलप्रमाणें आहेत. उन्हाळी व पावसाळी :- (१) श्रावणघेवडा, (अ) ठेंगणा, (आ) आणि वेलीवर वाढणारी (२) चवधारी घेवडा. श्रावणघेवडयाची लागण बागाइतांत थंडी संपतांच सुरू करितात. जेथें थंडी फार नाहीं अशा ठिकाणीं थंडींतहि करितात. पुण्यासारख्या समशीतोष्ण हवेंत शिवरात्रीपासून पाटाच्या अगर विहिरीच्या पाण्यावर घेवडा लावितात. कोरडवाहू शेतांत पावसाच्या पाण्यावरहि लावितात. त्यास २I२II महिन्यांनीं श्रावणांत शेंगा यावयास लागतात; म्हणून त्यास श्रावणघेवडा म्हणतात. श्रावण घेवडयाचें बीं सरींत अगर वाफ्यांत बितीच्या अंतरानें लावितात. वेल सुमारें हातभर वाढले म्हणजे त्यांस आधाराकरितां वेलाजवळ काठया पुरतात. ठेंगण्या जातीस ३I४ फूट उंचीच्या व उंच वाढणा-या जातीस ५I६ फूट उंचीच्या काठया लावतात. शेंगाचा तोडा वरचेवर करावा लागतो. कारण त्या लवकर जून होतात. व जून शेंगा वेलावर बियांकरितां वाढूं दिल्या तर शेंगा कमी येतात. परदेशात श्रावणघेवडयाच्या फुलांचा, शेंगांचा व बियांचा रंग व शेंगांची लांबी व उंचनीच वाढ यावरून ५०I६० प्रकार झाले आहेत.
चवधारी घेवडा शिमग्यापासून पुढें मृग अखेरपर्यंत लवतात. त्याचीं आळीं सुमारें ५ फूट अंतरानें करावी व प्रत्येक आळयांत ३I४ वेल राहूं द्यावें. आळयांच्या सासळया करून पाणी देतात. पहिल्यानें आधारास काठया लावतात व नंतर मांडव करून त्यांवर वेल चढवितात. खत व पाणी मुबलक असल्यास थंडी पडपर्यंत पुष्कळ शेंगा लागतात. फुलें निळीं असतात. शेंगास ४ धारा (कोपरे) असतात म्हणून त्यास ‘चौधारी-चवधारी’ घेवडा म्हणतात. शेंगा ६ ते १२ इंच लांब होतात. त्य कोवळेपणींच भाजीच्या उपयोगी पडतात. जून शेंगांच्या वरील हिरवा पालेदार भाग जरी कोंवळा दिसतो तरी आंतील भाग लांकडासारखा कठिण होतो. शेंगा काढतांना हातांत कटकन मोडल्याशिवाय लवल्या म्हणजे त्या कोंवळया शेंगा असें समजावें. शेंगा वाळल्या म्हणजे आंत लहान सागरगोटयाएवढया काळसर उदी रंगाच्या बिया असतात. चौधारी घेवडयाची चिरून, बारीक तुकडे करून, ते शिजवून भाजी करतात. ती रूचकर होते.
पावसाळी व शाळु या जातीचे घेवडे पावसाळयांत लावतात व थंडी पडावयास लागली म्हणजे त्यांस फुलें व शेंगा येतात.हे उंसाच्या बाजूनें कुंपणावर लावतात. अगर वर चौधारीची लावणी सांगितल्याप्रमाणें याची लावणी करतात. घरीं पर सांत मांडव करूनहि लावतात. अगर पाण्याच्या आस-यानें लावून झाडावर अगर वईवर चढवितात. कधीं कधीं शेताच्या बांधावरील झाडावर चढवितात. अशा प्रकारें हे घेवडे वाटेल तेथें होतात. पावसाळयांत लावणीं व पाऊस गेल्यानंतर उन्हाळयापर्यंत पाणी देणें या दोन मुख्य आवश्यक गोष्टी आहेत. या घेवडयाच्या खालीं दिलेल्या जाती आहेत. व प्रत्येकींत पांढरा हिरवा व जांभळा असे तीन रंग असतात.डफळीप्रमाणें हे घेवडे लावतात.
घेवडयाचा जाती. | ||||
जात | लांबी | रूंदी | आकार | रूची |
अरूंद | ३ ते ५ इंच | अर्धा इंच | गोल | चांगली |
रूंद | '' | १ इंच | चपटा | मध्यम |
फताडया | '' | २ इंच | '' | चांगली |
डफळ या नांवाची घेवडयाची एक जात आहे. ही पर देशांतून आलेली आहे. हिची शेंग जाड असल्यामूळें ‘डबल’ बीन असें नांव हिला पडले आहे. पण माळयांनी ‘डफल’ हें सोपें नांव पाडलें असावें. याचें खरें नांव ‘लिमा’ बनि आहे. तें दक्षिण अमेरिकेंतून प्रथम यूरोपांत व नंतर इकडे आलें असावें. हल्लीं परदेशी लिमाबीनचें २I३ जातींचे बीं येतें तें सुमारें २ आणेलीएवढें मोठें दोन्ही बाजूंस फुगलेलें, नीळसर पांढ-या रंगाचें असतें. त्याजपासून डफळी ही एक एतद्देशीय जात निष्पन्न झाली असावी. डहळीचें बीं चपटें, आणेली एवढें, स्वच्छ पांढरें व मोड येण्याच्या ठिकाणीं दोन्ही बाजूस तांबूस जांभळाप्रमाणें डाग असलेंलें असतें. पावटा अगर वालाप्रमाणें डफळीच्या शेंगांचीं टरफलें अगर सालींची घेवडयाप्रमाणें भाजी होत नाहीं. कारण या शेंगा शिजून मऊ होत नाहींत. मात्र दाण्यांचा उसळीकडे उपयोग होतो. हे दाणे दुस-या भाज्यांत मिळवण घालतात; अगर त्यांची स्वतंत्र उसळ करतात. डफळीच्या सोलाण्याची उसळ सर्वांत उत्तम होते. दाणे वाळल्यानंतर भिजाण्यांचीहि उसळ सोलाण्यासारखीच होते.
डफळीची लागण पावसाळयांतच करावयाची. ती मळे जमिनींत चौधारी घेवडयाप्रमाणें करावी. एकर अर्धां एकर अगर जास्त लावणी करणें असल्यास सुमारें ७I८ फुटांवर २ फूट रूंदीच्या स-या काढाव्या व तितक्याच लांबीवर सरीच्या बाजूस चार बिया टोंचाव्या. सरीच्या तळाशीं उंच वाढणा-या एरंडाच्या २I३ बिया लावाव्या. खत चांगलें व पुष्कळ दिलेंलें असावें आणि हिंवाळयांत व उन्हाळयांत पाणी देण्याची सोय असावी. कारण डफळीस वैशाखा पर्यंत शेंगा लागतात. एरंड जोरानें वाढून लहानपणींच वेलांनीं गुरफटून जाऊं न देण्याबद्दल काळजी घेतली म्हणजे एरंडाशिवाय दुस-या आधाराची जरूर पडत नाहीं. सर्व पावसाळाभर वेल वाढतात. हिवाळयाच्या आरंभीं फुलें येऊं लागून हिंवाळयांत व उन्हांळयांत शेंगा येतात. बाजारांत या शेंगा इतर घेवडयाच्या शेंगांपेक्षां २I३ पट भावानें महाग विकतात. वाळलेल्या शेंगांचें दाणेहि महाग विकतात.
परसांत आळीं लावून झाडांवर अगर कुंपणांवर वेल सोडल्यास डफळींपासून बरीच भाजी मिळेल. शेंगांच्या मानानें हिचीं फुलें बारीक असतात. तीं चांगलीं दिसून येत नाहींत. शेंगांचा रंग पानांप्रमाणेंच असल्यामुळें त्या चांगल्या शोधून काढाव्या लागतात.