विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घुबड - घू घू असा अवाज करणारा पक्षी. यालाच दिवाभीत असेंहि दुसरें नाव आहे. यालाच दिवाभीत असेंहि दुसरें नांव आहे. दिवाभीत म्हणजे दिवसां भिऊन भिऊन दडून बसणा-या अनेक पक्षिजाती पैकीं एक आहे. दिवाभीत पक्ष्यांच्या एकंदर सुमारे दोनशें जातीं असल्याचा शोध आधुनिक प्राणिशस्त्रज्त्रांनी लावला आहे. घुबडाची लांबी २ ते ५ फूटांपर्यंत असते. त्याचे पंख अत्यंत मऊ असतात; त्यामूळें त्याच्या उडण्याचा आवाज मुळींच होत नाहीं. या पक्ष्याचा सर्वसाधारण रंग पिंगट असून त्यांत कांहींचा तांबूस व कांहींचा करडा असे दोन प्रकार असतात. घुबडांमध्यें एक मोठया आकाराची जात असून ती यूरोपांतील बहुतेक देश, अशियामायनर, पॅलेस्टाईन, उत्तर अमेरिका वगैरे देशांत आढळते. या घुबडाचे कान मोठाले असून चेह-याच्या दोन्ही अंगास समकेंद्रक अशीं अनेक वर्तुलें असल्यामुळें हा पक्षी विलक्षण दिसतो व कुरूप माणसाला घुबडाची उपमा देण्याची चाल यावरू नच पडली असावी. दुस-या एका जातीच्या घुबडांनां डोक्यावर पिसांचे दोन तुरे शिंगाप्रमाणें असतात. घुबड हा पक्षी उंदरांचा संहार करणारा अतएव शेतक-यांचा उपकर्ता आहे. घुबडाची मादी तीन ते पांचपर्यंत अंडीं घालते व ती एकदम न घालतां कालावधीनें घालतें. त्यामुळें घुबडाच्या घरटयांत एकाच वेळीं नुकतीच जन्मलेलीं पिलें व ताजीं अंडीं दोन्हीं आढळतात.
घुबड व त्याचें ओरडणें ही सर्वत्र अशुभ गणलीं जातात. व त्या अर्थांनें मोठमोठया पौरस्त्य व पाश्चात्य कवींनीं भयंकर कृत्यांचें पूर्वचिन्ह म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. वेदांत उलूक या नांवानें घुबडाचें अस्तित्व दिसत असून, त्याचें ओरडणें सर्वांच्या परिचयाचें होतें. दुर्भाग्याचा दूत म्हणून त्याला मानण्यांत येई. (ॠ.१०, १६५, ४ अथ ६. १९, २; तै सं. ५.५.१८ १; वाज.सं. २४.३८.) अश्वमेधांत जंगली झाडांनां घुबडांचे बळी देण्यांत येत (वाज. सं. २४ २३; मैत्रा. सं.३ १४, ४). प्राचीन ग्रीसमध्यें मात्र अगदीं निराळी समजुत होती. घुबड हा पालास अंथेन्सचा पक्षीं, शास्त्र व कला यांच्या वास्तव्याचें दर्शक चिन्ह गणला जात असे. पण या पक्ष्याचे विलक्षण हावभाव व भेसूर स्वर लक्षांत घेतां कदाचित् ग्रीक लोकांनी उपरोधिक अर्थांने या पक्ष्याला विद्यासंपन्नतेचें (म्हणजेच विद्याशून्यत्वाचें) लक्षण मानलें असावें अशी शंका येते.