विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घासी - यांची मुख्य वस्ती बिहार-ओरिसा व मध्यप्रांत यांतून आहे. एकंदर लोकसंख्या (१९११) १३४०७६. द्रविड वर्गांतील ही जात दिसते. मध्यप्रांतांत यांची संख्या ४३०० आहे. हे अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत. हे मध्यप्रांतांत बुदेलखंड व ओरिसा प्रांतांतून रहाण्यास आले. यांच्या धंद्यावरून कांहीं वर्ग पडले आहेत. उदा. उडिया हे कातडी स्वच्छ करतात. डिगकुचिया हे गुरांस खच्ची करतात. डोलवोहा हे डोली वाहतात नगारची हे नगारा वाजवितात. यांच्यापैकी जे घोडयाचें काम करतात त्यांस सैस म्हणतात व ते आपणांस उच्च समजून इतरांस मुली देत नाहींत व इतरांच्या मुली करीत नाहींत. छोटा नागपूरांत हे शिप्यांचा धंदा करून एक निराळीच जाती बनवीत आहेत. यांच्या कुलांचीं नांवें पशुपक्षी, झाडें व निर्जीव पदार्थाचींच आहेत. स्वकुलांत विवाह निषिध्द आहे. पण बहीणभावांच्या संततींत लग्नें होतात. यांपैकीं कबीरपंथी लोक इतरांबरोबर लग्नें करतात. स्वजातीयाच्या कुमारीबरोबर व्यभिचार केला तर उंबराच्या फांदीसमोर उभें करून कांहीं बायका त्यांच्यावर हळदीचें पाणी शिंपून लग्न लावितात. जर बाहेरच्या माणसाबरोबर मुलीनें संबंध केला तिला जातींतून कढतात व तिच्या आईबापांपासून जातीभोजन घेतात.
कांहींचा धंदा गवर कापण्याचा, मोतद्दारीचा, कोष्टयांचा व कुंचले व फण्या करण्याचा आहे. जातींत घेण्याचा यांचा फारच घाणेरडा विधि आहे. उमेदवाराच्या डोक्यास मूत्र लावून क्षौर करावयाचें व पाण्यांत चांदी किंवा सोनें बुडवून ते पाणी व गोमय तुळस आणि दूर्वा त्याला खाऊं घालायच्या. यांच्या बायका चोळी घालीत नाहींत. कोठें कोठें कुंकूहि लावीत नाही. सौंदर्य वाढविण्याकरितां निरनिराळया भागावर बायका गोंदवितात. प्रायश्चित्त देऊन जातींत घेण्याकरितां पुरूषांचा क्षौर व बायकांची बट कापतात. हे कायस्थांची चाकरी करीत नाहींत व त्यांच्या स्पर्शाचें अन्न देखील खात नाहींत.
आसामांतहि यांची संख्या १५११४ आहे. हे डोम व मुसहार लोकांबरोबरीचे असून ते डुकरांचे मांस व गोमांस भक्षक आहेत. हे लोक अट्टल दारूबाज असून मोलमजुरी करितात. (रसेल व हिरालाल; से.रि.१९११).