विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

घाटगे - मराठे सरदारांमध्यें घाटग्यांचें कुटुंब प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे देशमुख. ब्राम्हणी राज्यांत त्यांस माण प्रांताची देशमुखी व सरदेशमुखी मिळाली. कामराजे घाटगे हा त्यांचा मूळ पुरूष. इब्राहिम आदिलशहानें स.१६२६ त नागोजी घाटगे यास सरदेशमुख व झुंजारराव हे किताब दिले. विजापूरच्या राज्यांतून त्यास जहागिरीहि पुष्कळ होत्या. “सर्जेराव”, “प्रतापराव” इत्यादि अनेक किताब या कुटुंबास मिळाले आहेत.

इ.स.१६३३ त दौलताबाद मोंगलांच्या हातीं लागल्या वर विजापुरचें सैन्य स्वदेशीं परत येत असतां त्याच्या मोहो बतखान नामक मोंगल सरदाराशीं ज्या चकमकी झाल्या त्यांपैकीं एकींत नागोजी घाटगे मारला गेला.

अवरंगजेब व मीरजुमला हे आदिलशहाच्या मुलखांत चालून आले तेव्हां सर्जेराव नांवाचा एक घाटगे विजापूरकरांकडून लढत होता (१६५७).

इ.स.१६५९ त विजापूर दरबाराकडून शिवाजीच्या पारिपत्याकरितां पाठविण्यांत आलेल्या अफजुलखानाबरोबर झुंजारराव म्हणून एक घाटगे असून तो शिवाजीच्या हातीं सापडला होता. त्यास शिवाजीनें मोठया सन्मानपूर्वक विजापुरला रवाना केलें. या झुंजाररावाचा बाप शहाजीचा मोठा मित्र होता. स. १६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हां हा झुंजारराव त्याच्या बरोबर होता.

पुढें (१६७५) हा व निंबाळकर यांनीं शिवाजीनें नुकतींच घेतलेलीं पन्हाळा वगैरे ठाणीं विजापूरकरांस परत घेऊन दिली पण शिवाजीनें झुंजाररावाचा पराभव करून तीं ठाणीं पुन्हां काबीज केलीं  (१६७८).

शाहूच्या कारकीर्दीत घाटगे हे कोल्हापूरकर संभाजीकडे गेले. परंतु कोल्हापूरकराशीं त्यांचें नेहमीं भांडण चाले म्हणून ते पेशव्याशीं मिळून मिसळून असत. खडर्याच्या लढाईंत घाटगे हे आपले पथक घेऊन पेशव्यांकडे हजर होते.

सखाराम  (सर्जेराव)  घाटगे :- १७९६ सालच्या सुमारास या घराण्यांतील ज्या दोघां पुरूषांचीं नांवें इतिहासांत विशेष प्रसिध्दीस आलीं, त्यांतील एक यशवंतराव व दुसरा सखाराम होय. यशवंतरावाची बहीण कोल्हापूरकरास दिली होती.यशवंतराव व सखाराम या दोघांत वतनासंबंधीं कांहीं भांडण होऊन त्यांच्यामध्यें एक चकमक झाली. तींत सखारामाचा पराजय होऊन तो पळून येऊन परशुराम भाऊच्या चाकरीस राहिला. कांहीं दिवसांनीं त्यानें भाऊचीं नौकरी सोडून नाना फडनविसाची धरली. नानानें त्याजकडे १०० स्वारांचें आधिपत्य दिलें होतें. सन १७९६ त नाना पुणें सोडून गेले तेव्हां सखाराम हा शिंद्यांच्या चाकरींत शिरला;  येथेंहि त्यांस १०० स्वारांचेंच आधिपत्य देण्यांत आलें. त्यानें आपल्या चातुर्यानें शिद्यांचा कारभारी रायाजी पाटलाची मर्जी संपादिली. सखारामाची मुलगी सुस्वरूप म्हणून प्रसिध्द असल्यामुळें तिच्याशीं विवाह करण्याच्या उद्देशानें स्वत दौलतराव शिंदेहि त्याची खुशामत करी. शिंद्याशीं संबंध जोडण्यास सखारामहि उत्सुक होताच,  परंतु जितकें आपण ओढून धरूं तितका आपला फायदा जास्त असें समजूंन आपण ओढून धरूं तितका आपला फायदा जास्त असें समजून तो शिंद्यास मुलगी देण्यास वर कांकू करी. रावबाजी याला उत्तरहिंदुस्थानांत नेण्याकरितां बाळोबा तात्यानें सखारामाचीच योजना केली. तेव्हां ह्यानें बाजीरावास सांगितलें कीं तुम्हाला पेशवाई मिळवून देण्यासाठीं मी शिंद्याचें मन वळवितों आणि शिवाय शिंद्यास आपली मुलगी देतों. मात्र आपण पेशवे झाल्यावर शिंद्यास दोन कोट रूपये द्यावें व मला शिंद्याची दिवाणगिरी व कागलची जहागिरी मिळवून द्यावी. तें रावबाजीनें कबूल केलें.

पुढें सखारामानें मायकेल फिलोज याच्याकडून विश्वासघात करवून नानांस शिंद्याच्या गोटांत आणवून नंतर फिलोज कडून त्यांनां व बरोबर आलेल्या सर्व बडया बडया मंडळींसह कैद केलें. त्यांच्या बरोबरचे स्वार व शिपाई यांना लुटून लंगडे, लुळे केले, व कांहींनां तर ठार मारलें. नंतर घाटग्यानें केवळ नानांच्याच नव्हे तर त्यांच्या अनुयायांच्याहि घराची मनस्वी लुटालूट केली. तेव्हां यांपैकीं कांहीं मंडळींनीं त्याच्या लूट मिळुविण्याकरितां आलेल्या शिपायांशी तोंडहि दिलें. एखाद्या शत्रूनें अकस्मात् हल्ला चढवावा अशी त्यावेळीं पुणें शहराची स्थिती झाली होती. सर्व रात्रभर व दिवसादेखील शहरांत गोळीबार चालत असे. सर्व बाजूंनीं रस्ते अडवून ठेविले जात व शहरांत हलकल्लोळ, लुटालूट व रक्तपात याशिवाय दुसरें कांहीं दिसत नसे. सर्व लोक घाबरून गेले होते. व रस्त्यांतून जाणारी मंडळी जमावानें व सशस्त्र जात (पुण्यांतील सर्जेरावी-नवयुग, १९२२).

पुढें  (१७९८) मार्च  सखारामाच्या मुलीचा दौलतराव शिंद्याशीं विवाह झाला.  हीच प्रसिध्द बायजाबाई शिंदे होय. दौलतरावानें मागितलेले दोन कोट रूपये देण्यासाठीं पेशव्यांनी घाटग्यास शिंद्याची दिवाणगिरी देऊन बाळोजी कुंजराच्या मदतीनें पुण्यांतील लोकांपासून पैसे गोळा करण्याच्या कामावर त्याला नेमिले. यावेळीं पैसे गोळा करण्याकरितां घाटग्यानें जे उपाय योजले ते अत्यंत अमानुष होते  (डफ) शनिवार वाडयांत जुनी कारभारी मंडळी कैदेंत होती, त्यांनां त्यानें बाहेर काढून ते आपला पैसा कोठें आहे तें सांगेपर्यंत त्यांच्या अंगावर कोरडे ओढून, त्यांच्या जवळून बलात्कारानें सर्व पैसा काढून घेतला. शहरांतील व्यापारी, सराफ वगैरे ज्या ज्या लोकांजवळ पैसा आहे असें वाटत होतें त्यासर्वांनां पकडून त्यांचा इतका छळ करण्यांत आला कीं, त्यांतील कांहीं मंडळीं त्यायोगें मरणहि पावली. गंगाधरपंत भानू यांस पैंशासाठीं तापलेल्या तोफेवर बांधलें असतां तो तेथल्या तेथेंच मरण पावला. महादजीच्या दोघा वडील बायकांनीं दौलतरावावर आपल्या धाकटया सवतींशी व्यभिचार केल्याचा आरोप केला, तेव्हां घाटग्यानें बळजबरीनें त्यांनां पकडून खूप मार दिला व त्यांची अतिशय विटंबना केली (१७९८). (डफ. पु.३.पृ.१६२). त्यामुळें बायकांच्या बाजूस असलेल्या मुजप्फरखानाची व सखारामाची दोनदां चकमक उडाली.

सखारामाच्या वर्तनास कोणाकडूनहि प्रतिरोध न झाल्यामुळें शेवटीं तो इतका बेताल झाला कीं, तो शिंद्यासहि जुमानीना. फकीरजी गाढवे याच्या साहाय्यानें लोकांपासून बळजबरीनें पैसे उकळण्याचें काम त्यानें चालविलेंच होतें. शिंद्यांच्या सैन्यांतील चार अधिका-यांस तर बायांच्या बंडांत सामील असल्याच्या केवळ संशयावरून त्यानें तोफेच्या तोंडीं दिले.शेवटीं आपला स्वत:चाच उपमर्द होऊं लागल्यानें चीड येऊन व पेशव्यांच्या आज्त्रेवरून आणि लोकांच्या शिव्यापाशास कंटाळून शिंद्यानें सखारामास पकडून कैदेंत टाकलें  (१७९८). परंतु बाळोबातात्यानें रदबदली करून त्याला कैदेंतून सोडविलें (१८००).  कैदेतूल सुटतांच त्यानें पुन्हां शिंद्यावर पगडा बसविला व बाळोबातात्याच्या विरूध्द एक पक्ष उपस्थित केला आणि शिंद्याचें मन वळवून बाळोबास व त्याच्या अनुयायांस कैद करवून नगरच्या तुरूंगात त्यांची रवानगी केली. बाळोबा कैदेंत लवकरच मरण पावला. त्याचा भाऊ धोंडीबा यास सखारामानें तोफेच्या तोंडीं दिलें. नारायणराव बक्षी (शिंद्याचा सेनापति) याच्या अंगास दारूचे बाण बांधून ते पेटविण्यांत आले; त्याबरोबर त्या दुर्दैवी माणसाचें शरीर आकाशांत उडून त्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या. हेंहि कृत्य सखारामानें केले.

पुढें दौलतरावानें पटवर्धनावर स्वारी केली त्यावेळीं सखारामानें कोल्हापुरकरांची मदत शिंद्यास मिळवून दिली होती (१८००). यानंतर तो उत्तर हिंदुस्थानांत जाण्यासाठीं निघाला तेव्हां त्यानें सखारामाच्या हाताखालीं पांच पलटणी व दहा हजार स्वार देऊन त्यास पुण्यास ठेवलें. परंतु सखारामानें पुण्याच्या दक्षिणेकडील मुलुखांत लुटालुटीची मोहीम सुरू केली (१८०१).

पुढें तो पुण्यास आला व पैशाकरितां बाळोजी कुंजराच्या घरांत धरणें देऊन बसला. त्यानें पेशव्यांच्या दरबारांतील एकाहि माणसाचा अपमान करण्याचें बाकी ठेविलें नव्हतें. शेवटीं बाळोजी कुंजरानें सावकारांवर वराता देण्याकरितां ह्मणून त्याला आपल्या घरीं बोलावून व त्याचा मोठा आदर सत्कार करून थोडया वेळानें कागद आणण्याचें मिष करून तो तेथून जाऊं लागला. बाळोजी तेथून उठला कीं घाट ग्यास कैद किंवा ठार करण्यांत यावें असा पूर्वी संकेत झाला होता. परंतु बाळोजीचा हेतु ओळखून सखारामानें स्वत उठून व बाळोजीचा हात धरून त्याला आपल्या बरोबर आणलें व आपण घोडयावर बसून तेथून निघून गेला. नंतर त्यानें आपल्या सर्व सैन्यासह पुणें शहर लुटून जाळून फस्त करण्याची बाजीरावास धमकी दिली. परंतु बाजीरावानें इंग्रज वकिलाच्या मध्यस्तींने तो प्रसंग टाळला.

याच सुमारास सखारामास शिंद्याचें माळव्यांत निघून येण्याविषयीं निकडीचें बोलावणें आल्यावरून तो पुण्याहून निघून दौलतरावास नर्मदापार जाऊन मिळाला. शिंद्यानें त्यांस १०,००० घोडदळ व कवाइती पायदळांच्या चौदा पलटणी देऊन इंदूर लुटण्याकरितां पाठविलें. तेव्हां यशवंतराव होळकरहि कांहीं कवायत शिकविलेल्या पलटणी, ५००० बिनकवायती पलटणी व २५००० स्वार घेऊन चालून आला. दोन्ही पक्षांत कांहीं दिवस किरकोळ चकमकी झाल्यावर शेवटीं होळकरानें शिंद्याच्या लष्करावर जोराचा हल्ला केला; तथापि त्यांत त्याचा पराजय होऊन इंदूर लुटलें गेलें. इंदूर हातीं आल्यावर सखारामानें तेथें इच्छेस येईल त्याप्रमाणें पशुतुल्य क्रुरपणाचीं व अंगावर शहारे आणण्यासारखीं कृत्यें केलीं (डफ पुस्तक ३, पृ.२०१). पुढें इंग्रजांचें यशवंतराव होळकराशी युध्द चाललें असतां शिंद्यानें होळकरास मिळावें अशी सखारामाची आरांभापासून इच्छा होती व त्याप्रमाणें (१८०४ आक्टोबर)  दोलतराव हा ब-हाणपुराहून उज्जनीकडे जावयास निघाला होता. भरतपूरच्या जाटानें इंग्रजांशीं तह केल्यावर, होळकर व शिंदे एक होऊन अजमेरला आले तेव्हां सर्जेराव हाच शिंद्याचा दिवाण होता. व त्याचें मत वरीलप्रमाणें होळकराप्रमाणेंच शिंद्यानेंहि इंग्रजांशीं युध्द चालू ठेवावें असें होतें. तथापि पुढें सर्जेरावच्या जुलमी वर्तनामुळें स्वत च शिंद्यानें त्याला कामावरून दूर केलें. यानंतर शिंदे व होळकर यांनीं इंग्रजांशीं तह केला. त्यांत दोघांनींहि अत:पर सर्जेरावच्या सल्ल्यानें न चालण्याचा व त्याला आपल्या पदरीं चाकरीस न ठेवण्याचा करार केला (१८०५) परंतु पुढें लवकरच हा करार रद्द करण्यांत आला. व घाटग्यानें शिंद्याच्या कारभारांत पुन्हां वर्चस्व संपादन केलें. पुढें एकदां वाठारच्या निंबाळकर नांवाच्या एका शिलेदारास शिंद्यांच्या इच्छेविरूध्द जहागीर देण्याचें घाटग्याच्या मनांत येऊन त्या गडबडींत मानाजी फांकडयाचा मुलगा आनंदराव शिंदे यानें सखारामास जागच्याजागीं भाल्यानें भोसकून ठार केलें (१८०९-१०). डफनें याला राक्षस म्हटले आहे (पु.३.पृ.३२४). याला सर्जेराव असा किताब होता. याच्याच वंशांत कोल्हापूरचे माजी राजे शाहूछत्रपती यांचा जन्म झाला होता. याशिवाय घाटगे घराण्याची माहिती ज्त्रानकोशच्या १० व्या विभागांत कागल या शब्दाखालीं पहावी (डफ.पु.३; खरे-ऐ.ले. संग्रह पु.१० ११ १२).