विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घांट - दक्षिण हिंदुस्थानच्या पूर्व व पश्चिम दोन्हीं बाजूंस विशाल तटासारखे थेट दक्षिणेपर्यंत जाऊन एक मेकांस मिळणारे पूर्वघाट व सह्याद्री नांवाचे दोन पर्वत आहेत. पूर्वघाट हे तुटक तुटक आहेत व ते आणि समुद्र यांच्या दरम्यानची पट्टी बरीच रूंद असल्यानें व देशाच्या इतर भागांतूनहि तिकडे जाण्यायेण्यास सोप्या वाटा असल्यानें इकडील संस्कृतीचा प्रसार तिकडे होण्यास संधि मिळे. बहुतेक सर्व राज्यांच्या राजधान्या पूर्वी याच बाजूला होत्या. सह्याद्रि व समद्र यांच्यामधील पट्टी अरूंद व तिच्या माथ्यावरील देशांशीं दळणवळण कमी असल्यामुळें येथील लोकांची संस्कृती स्वतंत्र असे. पश्चिम घाट (सह्याद्रि) फार उंच व एकसारखा असल्यानें देशबाजूच्या बहुतेक सर्व
नद्या पूर्ववाहिनी झाल्या आहेत. पूर्ववाहिनी नद्यांत गोदावरी, कृष्णा व कावेरी या मुख्य असून त्या थेट पूर्व समुद्राला मिळतात. दक्षिणेला जेथें हे दोन पर्वत भेटतात तेथील पठार २ पासून ३ हजार फुटापर्यंत उंच आहे. त्यांतील प्रसिध्द पर्वत निलगिरी आहेत. उटकमंड साधारण ७००० फूट उंच आहे व या पर्वताची सर्वात जास्त उंची ८८३७ फूट आहे. पूर्व घाटावर झाडी फार कमी असून पाऊस ४० इंच पडतो. तर पश्चिम घाटांत पाऊस १०० ते ३०० इंच पडतो. या पर्व तांवर झाडी फार आहे.