विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घटोत्कच लेणीं -पूर्वखानदेशच्या दक्षिण सरहद्दीपासून ३ मैलांवर अजंटयाच्या पश्चिमेस ११ मैलांवर व पाचोयाच्या नैर्ॠत्येस १६ मैलांवर जिंजाळ खेडयाजवळील डोंगरांत हीं लेणीं आहेत. यांत एक मोठा विहार असून तो अजिंठा येथील सहाव्या व सोळाव्या लेण्याप्रमाणें आहे. या विहारास २० खांब आहेत. त्यांपैकी कांहीं सोळा कोनी आहेत. व त्यांवर उत्तम नकशी आहे. पाठीमागच्या बाजूस गाभा-यांत शाक्यमुनीची मूर्ति आहे व तिच्याजवळ विद्याधर धर्मचक्र, हरिण बगैरे नेहमींप्रमाणें आहेंत. विहारांत एकंदर १० खोल्या आहेत. पुढील भिंतीस ३ दरवाजे व दोन खिडक्या आहेत. यांच्यावरहि बुध्द व किन्नरी वगैरे मूर्ती कोरलेल्या आहेत. पडवीच्या मागील भिंतीवर उत्तरेस अश्मक राजांच्या वेळचा एक शिलालेख आहे. विहारांतील एका खांबावर बुध्दाची मूर्ति कोरलेली असून त्याच्यावर बौध्द धर्मतत्वें खोदलेला एक शिलालेख आहे. विहाराच्या पुढील भागांतहि भिंतीवर पुष्कळ बुध्दाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अश्मक शिलालेख हल्लीं धुपून गेला आहे. पुढील पडवीचे खांब वगैरे सर्व पडून गेले आहेत. जवळच दुसरें एक लहानसें लेणें आहें. हेंहि बहुतेक सर्व पडून गेलें आहे. (खानदेश ग्याझे; जर्नल. बॉम्बे. ब्रीच. रा.ए.सो. अंक ११७.)