विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
ग्लॅडस्टन जॉन हॉल (१८२७-१९०२)- हा इंग्रज रसायनशास्त्रज्ञ लंडनमधील हॅक्नी येथें जन्मला. लहानपणापासून त्याला शास्त्रीय विषयांची आवड होती. त्याला भूस्तरशास्त्र फार आवडत असे. परंतु त्याच्या बापाच्या मतानें त्यांत विशेष उत्कर्ष होण्यास वाव नसल्यामूळें त्यानें लंडन येथें थॉमस ग्राहाम याच्याजवळ रसायनशास्त्र शिकण्यास सुरुवात केली. नंतर हा गसिन येथें लीबिगजवळहि शिकत होता. तेथें त्याला १८४७ त पी. एच्. डी. ची पदवी मिळाली. १८५० त तो सेंट थॉमसच्या दवाखान्यांत रसायनशास्त्राचा अध्यापक झाला व वयाच्या २६ व्या वर्षींच राजसंस्थेचा सभासद (फेलो) झाला. १८५८ ते १८६१ पर्यंत दीपगृहावरील कमिशनमध्यें राजमंडळांत त्यानें नोकरी केली व १८६४ ते १८६८ पर्यंत युद्धमंडळांत स्फोटक कापसा (गनकॉटन) संबंधीं काम केलें. १८७४ ते १८७७ पर्यंत तो अध्यापक होता. १८७४ त त्याला पदार्थविज्ञान शास्त्रमंडळाचा अध्यक्ष निवडलें व १८७७-१८७९ पर्यंत तो रसायनशास्त्रमंडळाचा अध्यक्ष होता. १८९७ त राजसंस्थेनें त्याला डेव्हीपदक देऊन त्याचा बहुमान केला. पदार्थविज्ञानशास्त्र व रसायनशास्त्र यांच्या दरम्यान असलेल्या भानगडीच्या प्रश्रनांसंबंधीं त्यानें शोध लाविले. त्यानें कित्येक पदार्थांचे प्रकाशगुणक ठरविले व एकाच पदार्थाला निरनिराळें अणुवक्रीभवन असतें कीं नाहीं हें त्यानें पाहिलें. ईथर, तेलांचे वि. गुरुत्व, रसायनिक घटना व प्रकाशासंबंधीं वर्तणूक यांचा संबंध त्यानें जोडला. १८५६ तच त्यानें रसायनशास्त्रांत विछिन्नकिरणदर्शकाचें (स्पेट्रोस्कोप) महत्व किती आहे हें दाखविलें. सूर्योदय, सूर्यास्त व मध्यान्ह या वेळीं फ्रान्होफरच्या रेषांत फरक असतो व यावरुन वातावरणांची घटना त्या त्या वेळीं वेगळी असावी असें त्यानें ठरविलें. पुढें प्राणवायु व पाण्याची वाफ यांच्या हवेंतील अस्तित्वावर त्या रेषा अवलंबून असतात असें ठरलें. यानें संग्राहक घटाचा (स्टोअरेजसेल) शोध लावला व शिवाय ताम्रजस्त या जोडीचाहि शोध लावला. त्या जोडींच्या योगानें सेंद्रिय रसायनशास्त्रांतील कित्येक द्रव्यें विद्युत्साहाय्यानें तयार करतां येऊं लागलीं.
याशिवाय स्फुरासंबंधीं शोध, नत्रअदिद, स्फोटक कापूस व फल्मिनेट चुर्णें इत्यादि स्फोटकारक द्रव्यांचा शोध, रासायनिक प्रतिक्रियेंत पदार्थाच्या वजनाचें महत्व व कर्बाम्लाचें वनस्पतीसंवर्धनांत महत्व इत्यादी अनेक शोधांचा उल्लेख येथें केलाच पाहिजे. डॉ. ग्लॉडस्टन हा शिक्षणविषयक बाबतींत फार लक्ष घालीत असे. तो लंडन येथें ता. ६ ऑक्टोबर १९०२ रोजीं एकाएकीं मरण पावला.