विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गोडबोले, कृष्णशास्त्री (१८३१-१८८६)- एक महाराष्ट्रीय ग्रंथकार व ज्योतिषी. यांचा जन्म वाई येथें झाला. विद्याभ्यास पुणें येथें मराठी शाळेंत नंतर संस्कृत पाठशाळेंत व पूना कॉलेजांत झाला. लहानपणापासून त्यांनां गणिताचा नाद असे. पाठशाळेंत त्यांनीं ज्योतिषाचें अध्ययन केलें. पुढें १८८५ सालीं नार्मल शाळेंत ते शिक्षक झाले. १८६४-६५ सालीं मुंबईच्या कुलाब वेधशाळेंत त्यांची नेमणूक झाली. सन १८८६ सालीं ते मरण पावले. सिंधप्रांतांत असतांना सिंधी भाषेचें चांगलें ज्ञान त्यांनीं संपादन केलें होतें. फारसी भाषाहि त्यांनां अवगत होती. ते सिंधी भाषेचे परीक्षक १८७१ ते ७९ पावेतों होते. सन १८७८ मध्यें त्यांनीं व वामन कृष्ण जोशी गद्रे यांनीं मिळून ग्रहलाघवाचें मराठी भाषांतर करून छापलें. हडनच्या बीजगणिताचें मराठी भाषांतर सन १८५४ त छापलें. सन १८७४ त त्यांनीं व गोविंद विठ्ठल करकरे यांनीं मिळून युक्लिडच्याभूमितीच्या पहिल्या ४ पुस्तकांचें भाषांतर केलें. सन १८८२ त 'वेदाचें प्राचीनत्व' या विषयावर कृष्णशास्त्री यांनीं इंग्रजी निबंध लिहून तो छापून काढला. १८६९ त त्यांनीं सिंधी भाषेंत अंकगणिताचें पुस्तक केलें; व १८६७ त मराठी भाषेचें एक चांगलें व्याकरण केलें. लघुचिंतामणीचें त्यांचे मराठी भाषांतर सोदाहरण आहे. [दिक्षितकृत भारतीय ज्योतिःशास्त्र].