विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गुरू- सूर्यमंडळातील सर्वांत मोठा ग्रह. गुरू हा शुक्राच्या खालोखाल तेजस्वी आहे. जेव्हां त्याच्या अस्तोदयाची संधि असते तेव्हा मात्र तो बारीक दिसतो. इतर वेळी तो सहज ओळखिता येतो. याच्या अस्ताचा काल मंगल कार्यांत वर्ज्य केला जातो.
गुरूची आणि सूर्याची युति झाल्यापासून पुनःतशीच युति होण्यास सुमारे ३९९ दिवस लागतात. गुरू आपणांस डोळ्यांनी लहानसा बिंदु दिसतो परंतु तो एवढा मोठा आहे की, आपल्या पृथ्वीएवढाले १३९० गोल एकत्र करावे तेव्हा गुरूएवढा एक गोल होईल. गुरुंतील द्रव्य पृथ्वीच्या सुमारें ३०० पट आहे; अर्थात् पृथ्वीच्या ३०० पट त्याचें वजन असलें पाहिजे. त्याची घनता सरासरीनें पृथ्वीच्या चतुर्थांश आहे. पृथ्वीच्या दोन अक्षप्रदक्षिणा जेवढ्या कालांत होतात तेवढ्या कालांत गुरूच्या पांच अक्षप्रदक्षिणा होतात. यामुळें गुरूवरील दिवस आपल्या ९ तास ५५॥ मिनिटा एवढा आहे. परंतु त्याचें वर्ष फार मोठे आहे. आपली बारा वर्षे होतात तेव्हा गरूचें एक वर्ष होतें. सूर्यापासून पृथ्वीच्या पाचपट अंतरावर गरू आहे. त्याचा दक्षिणोत्तर व्यास पूर्वपश्चिम व्यासापेक्षा सुमारें ५००० मैल कमी आहे. त्यामुळे ह्माचा आकार ध्रुवाकडे किंचित चापट आहे.
गुरूच्या पृष्ठावर स्थाईक खुणा नाहीत असे म्हटलें तरी चालेल. इसवी सन १८७९ मध्यें त्याच्या दक्षिणगोलार्धात एक तांबडा ठिपका दिसूं लागला. तो तसाच इसवी सन १८८३ पर्यंत दिसत होता व तो दीर्घवृत्ताकार होता. त्याचा बृहदक्ष, विषुववृत्ताशी समांतर व लघ्वक्षाच्या चौपट होता. त्यांचे क्षेत्रफळ सुमारें आपल्या पृथ्वीएवढे होतें. त्यावरून गुरूचा अक्षप्रदक्षिणाकाल काढिला आहे. त्यांत असें दिसून आलें आहे की, गुरूचा विषुवृत्तावरील भाग जितका जलद फिरतो त्यापेक्षा ध्रुवाकडील भाग कमी वेगानें फिरतो. या गोष्टीत गुरूचे सूर्याशी साम्य आहे. वर उल्लेखिलेला मोठा तांबडा ठिपका यानंतर गुरूवर ब-याच वेळी दिसून आला. गुरूवर विषुववृत्ताशी समातंर असें काही पट्टे आहेत की, ते चकचकीत दिसतात. विषुववृत्तावरच एक चकचकीत पट्टा दिसतो. त्याचा रंग बहुतकरून मोत्यासारखा दिसतो. त्याच्या उत्तर व दक्षिण भागी जे पट्टे दिसतात त्याचा रंग तांबूस दिसतो. कधी कधी त्यांत जांभळ्या रंगाची झाक मारते. हे पट्टे त्याच्या ध्रुवापर्यत गेले आहेत. ध्रुवाजवळचे प्रदेश बहुधा किंचित निळे दिसतात. गुरूचा पृष्ठभाग सतत सारखा असा दोन दिवस देखील नसतो. गुरूवरच्या कांही भागांचा रंग वारंवार बदलतो.
ज्याप्रमाणें पृथ्वीला चंद्र हा एक उपग्रह आहे त्याप्रमाणें गुरूला आठ उपग्रह आहेत. पैकी मोठ्या चारांचा शोध ग्यालिलिओने लावला (१६१०). ह्मा चोहोंच्या आंत एक पांचवा उपग्रह आहे. त्याचा शोध सन १८९२ च्या आगष्ट महिन्यांत लागला. जगांतील अति मोठी दुर्बीण अमेरिकेंत हॅमिल्टन पर्वतावरील लिक नांवाच्या वेधशाळेंत आहे. तीतून हा ५वा उपग्रह प्रथम दिसला. १९०४ साली आणखी दोन लहान उपग्रह संशोधिले गेले. आठवा उपग्रह २८ फेब्रुवारी १९०८ रोजी पी.जे.मेलोटे यानें संशोधिला.
गुरूवरून पहाणारास पहिल्या उपग्रहाची अक्षप्रदक्षिणा होण्यास १ दिवस, १८ तास, २८ मिनिटे व ३६ सेकंड इतका काल लागतो असें दिसतें. दुस-याच्या अक्षप्रदक्षिणेस काल ३ दिवस, १३ तास लागतो. तिस-याच्या अक्षप्रदक्षिणेस काल ७ दिवस, ४ तास लागतो आणि चवथ्याच्या अक्षप्रदक्षिणेस काल १६ दिवस १८ तास लागतो. ह्मा उपग्रहांच्या छायेने गुरूला ग्रहण लागतें व गुरूच्या छायेनें उपग्रहास ग्रहणे लागतात. दुर्बिणीतून ती ग्रहणें वारंवार पाहण्याची मोठी मौज असते. गुरूची कक्षा, त्याच्या उपग्रहांच्या कक्षा आणि पृथ्वीची कक्षा यांमध्ये सुमारें ३ अंशाचे कोन असतात. यामुळें उपग्रहांची ग्रहणे वारंवार होतात. कोणत्याहि पदार्थाचा प्रकाश आपल्या डोळ्यांवर येईपर्यत त्यास मधला मार्ग आक्रमण्यास कांही काल लागतो असा शोध गुरूच्या उपग्रहांच्या ग्रहणावरून लागलेला आहे. गुरूच्या उपग्रहांस सूर्यापासून प्रकाश आणि उष्णता फार थोडी म्हणजे आपल्या पंचविसाव्या हिश्शानें मिळते. गुरू आणि त्याचे उपग्रह ही एक लहानशी सूर्यमालाच म्हणण्यास हरकत नाही. गुरूच्या उपग्रहांची घनता गुरूपेक्षा जास्त आहे. गुरूच्या उपग्रहांवर वस्ती असावी असें अनुमान करतात.