विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
    
गुजराथ प्रांत- हा प्रांत मुंबई इलाख्याच्या ईशान्येस असून, त्याच्या पश्चिमेस आरबी समुद्र, वायव्येस कच्छचें आखात, उत्तरेस छोटेंरण व मेवाड, ईशान्येंस अबू व अरबलीचे डोंगर व पूर्वेस विन्ध्य व सातपुडा आणि दक्षिणेस तापी नदी आहे. गुजराथचे क्षेत्रफळ ७२ चौ. मै. व लो.सं.९२ लाखापर्यंत आहे; पैकी १/४ प्रांत अहमदाबाद, खेडा पंचमहाल व भडोच या जिल्ह्यांत असून सुमारे ५ हजार चौ.मै. बडोदें संस्थानांत व बाकीचा मुंबईसरकारच्या देखरेखीखाली असणा-या इतर लहानमोठ्या संस्थानांत विभागला आहे. पालतपूर, रेवाकांठा, महिकांठा व खंबायत अशा चार एजन्सीतं ही संस्थाने सामावतात. गुजराथचे गुर्जरराष्ट्र (खास गुजराथ) व सौराष्ट्र (काठेवाड) असे दोन मुख्य भेद आहेत. साबरमती, मही, बनास सरस्वती, नर्मदा व तापी या नद्यांच्यामुळे गुजराथ देश फार सुपीक बनला आहे; त्यांतल्या त्यांत मध्यभागाची जमीन फारच सुपीक आहे. उत्तर, पश्चिम व पूर्व या बाजूस असलेल्या डोंगरांच्या काठची जमीन रेताड आहे. डोंगराच्या आसपास जंगलेहि बरीच आहेत. जंगलांतून वाघ, वनगायी, काळवीट, चित्ते वगैरे जनावरे आढळतात. हा प्रांत अत्यंत सुपीक असल्यानें याच्यावर परकीयांच्या व स्वकीयांच्या अनेक वार स्वा-या झाल्या आहेत. त्याचें ठोकळ कालमान पुढीलप्रमाणें होय; पौराणिक यादव, यवन (ग्रीक, शक वगैरे) ख्रि.पू.३०० ते इ.स.१००; आश्रयार्थ आलेले पारशी व त्यांचे पाठलागी आरब (स. ६००-८००); संगनियनचांचे (९००-१२००); नवायत मुसुलमान (१२५०-१३००); पोर्तुगीज व तुर्क (१५००-१६००); अरब व मुसुलमान चांचे (१५००-१८००); डच, फ्रेंच, आर्मेनियन व्यापारी (१६००-१७५०) व इंग्रज (१७५०-१८१८). हे बहुतेक सारे समुद्राच्या मार्गानें आले. उत्तरेकडून खुष्कीनें हून शक (ख्रि.पू.२००-इ.स.५००); गुर्जर (४००-६००); जडेजा व काठी (७५०-९००); अफगणादि मोंगल व तुर्क (१०००-१५००) हे आले. ब्राह्मणांच्या वसाहती उत्तरेकडून होत होत्या (११००- १२००). तसेच पूर्वेकडून मौर्य (ख्रि.पू.३००) शकक्षत्रप (ख्रि.पू.१००-स.३००); मोंगल (१५३०) व मराठे (१७५०) आले तर दक्षिणेकडून शालिवाहन (१००); चालुक्य; राष्ट्रकूट (६५०-९५०); मुसुलमान; पोर्तुगीज; मराठे व इंग्रज हे आले.

इतिहास- गुजरात नांव संस्कृत गर्जरराष्ट्र या नांवापासून बनलेलें आहे. नवव्या शतकांतील लेखांत गुर्जरराष्ट्र असें नाव येतें. येथील प्राचीन राजांनां गुर्जरराजे असें म्हणत. हे मूळचे मथुरेकडील असून पुढें गुप्तराजांबरोबर ते राजपुताना-माळवामार्गे गुजराथेत उतरले. गुप्त घराणें नष्ट झाल्यानंतर हे राज्य करूं लागले. हल्लीच्या गुजराथेंत प्राचीन आनर्त, सुराष्ट्र व लाट या देशांचा समावेश होतो. आनर्त (हल्लीचा उत्तर गुजराथ) ची राजधानी आनंदपूर (वडनगर) होती. गिरनारच्या रूद्रदामनच्या लेखांत आनर्त व सुराष्ट्र हे जुनागडच्या पल्हव सुभेदाराच्या ताब्यांत असल्याचा उल्लेख आहे. सुराष्ट्राला हल्ली सोरट म्हणतात. लाट म्हणजे मही-तापीकडील दक्षिण गुजराथ होय. हे नांव संस्कृत दिसत नाही. महाभारतादि जुन्या ग्रंथांत तें आढळत नाही. कदाचित (राष्ट्रकूट) रट्टराजांवरून व जमपदावरून लाट नांव पडले असावे.

गुजराथेंतील कांही स्थलांचा निर्देश पुराणांत आढळतो. बलरामांची बायको रेवती ही आनर्त राजाची कन्या होती. श्रीकृष्णानें मथुरा सोडून द्वारका राजधाली केली, प्रभास व गिरनार येथें यादव यात्रेंस जात असत, गिरनारच्याच यात्रेंत सुभद्राहरण झालें, प्रभास येथेंच यादवी झाली व पुढें ओसाड द्वारका समुद्रांत बुडाली, वगैरे कथा पुराणांत येतात. या यादवनाशानंतर मौर्यांच्या राजवटीपर्यंत गुजराथची माहिती आढळत नाही. मौर्य घराणें (ख्रि.पू.३१९) राज्य करावयास लागल्यापासून गुजराथच्या इतिहासास प्रारंभ झाला असें म्हणतात. गिरनारच्या लेखावरून चंद्रगुप्त व अशोक यांची सत्ता गुजराथवर होती व गिरिनगर (जुनागड) ही त्यावेळची राजधानी होती असे ठरते. अशोकानंतर दशरथ व नातू संप्रति हे गुजराथचे सम्राट होते. संप्रतीच्या पश्चात मौर्य सत्ता नष्ट होऊन बॅक्ट्रियन ग्रीकांची सत्ता स्थापन झाली. त्यावेळची युक्रेटिडिस (ख्रि.पू.१८०-१५५) मिन्यांडर व अपोलोडोटस यांची नाणी गुजराथेंत सांपडतात. अपोलोडोटसनंतर क्षत्रपांची सत्ता स्थापन होईपर्यत (स.१००) च्या एक शतकाची माहिती आढळत नाही.

क्षत्रपः- हे परकीय होते. पुढें त्यांनी हिंदुधर्म स्वीकारला. गुजराथेंतील क्षत्रपांस पश्चिमक्षत्रप घराणें म्हणत. त्यांचा पहिला राजा नहपान हा होता. त्यानें काठेवाड-बलसाड-डांग नाशीक हा मुलुख पादाक्रांत केला. याची कारवाई स.१००-१२० पर्यंत होती. कदाचित् आंध्र हेहि त्याचे मांडलिक असावेत. उत्तरगुजराथ मात्र त्यांचे ताब्यांत नव्हता. याच्या नाण्यावर ग्रीक अक्षरे व त्यांचे नागरीरूपांतर असतें. यांने आपल्यास क्षत्रप उपपद लाविले नाही. त्याच्या नंतर (पुत्र नसल्यानें) त्याचा जावई उपवदात ॠषभदत्त गादीवर आला. त्यानें धर्मशाळा, अन्नछत्रें, घाट, लेणी वगैरे अनेक लोकोपयोगी कामें केली. हा आपल्याला स्पष्टपणें शक म्हणवी. शालिवाहनशक म्हणजे वस्तुतः नहपानाने गुजराथ ज्या साली जिंकला त्या सालापासून सुरू झालेला शक होय. त्यांस प्रथम वर्ष, शकवर्ष, शकसंवत्सर म्हणत. त्यालाच हजारअकराशें वर्षांनी शालिवहानशक असें नाव पडलें. याचा प्रारंभ इ.स. ७८ या वर्षी होतो. उषवदातापासून (शातकर्णी) आंध्रभृत्यांनी राज्य घेतलें. चष्टन महाक्षत्रपानें उलट त्यांच्यापासून पुन्हां राज्य परत मिळविले. यांच्या नंतर गुजराथच्या क्षत्रप राजांच्या नाण्यांवर राजाचें, त्याच्या बापाचें नांव व वर्ष ही दिलेली असतात. या सर्वांत रूद्रदामन हा पराक्रमी होऊन गेला. याची माहिती गिरनारच्या शिलालेखावरून बरीच मिळते. सुदर्शन तलावाला त्यानें एक बांध घातला होता; आनर्त व सौराष्ट्र या देशांवर त्याचे सुभेदार होते. याची राजधानी बहुधा गुजराथेच्या बाहेर असावी. भिलसा ते सिंध व अबू ते उत्तरकोकण इतका प्रांत (काठेवाड सुद्धा) त्याच्या ताब्यांत असे. हा फार विद्वान होता. याचा राजकाल स१४३-१५८ असावा. याच्या नंतर याचे वंशातील सोळा जणांनी राज्य केले. या वंशातील शेवटचा राजा विश्वसेन होय (स.३००). यापुढें (२५०-४५०) गुजराथेवर त्रैकूटक राजघराण्यांचा अंमल होता. त्यांची राजधाली जुन्नर (पुणें जिल्हा) होतें. हे मूळचे आभीर असून पुढे स्वतःस हैहय म्हणवीत. विश्वसेन क्षत्रपाच्या नंतर यांनी त्याच्या राज्याचे निरनिराळे भाग वाटून घेतले. दक्षिणगुजराथ यांच्या राज्यात होतें. पुढे (४९५) यांना गुप्त किंवा मौर्य यांनी नामशेष केले.

गुप्त व वल्लभी- गुप्तांचे मूळ राज्य गंगायमुनाअंतरवेंदीत होतें. या वंशतील दुसरा चंद्रगुप्त यानें प्रथम गुजराथ जिंकला (४१०). त्याचा मुलगा कुमारगुप्त हा गुजराथचा पहिला गुप्तराज होय. काठेवाडांत यांची नाणी फार आढळतात. याचा मुलगा स्कंदगुप्त यानें श्रवेतहुणांचा पराभव करून सुराष्ट्रावर पर्णदत्त नांवाचा सुभेदार नेमला. स्कंदानंतर गुप्तघराणें दुर्बळ होत चालले; ते कसेबसे हर्षवर्धनापर्यंत जीव धरून होते. गुप्तानंतर वल्लभी राजे गुजराथेवर राज्य करू लागले. सेनापति भट्टार्क यानें या घराण्याची स्थापना केली (५०९). याच्या पूर्वी गुजराथेत कोठे कोठे श्वेतहूण सत्ताधारी होते असें म्हणतात. वल्लभी हे गुर्जर क्षत्रिय असून त्यांच्यावरून गुजराथेस गुर्जरराष्ट्र नांव मिळालें असावे. ह्मुएंनत्संग गुजराथेंत आला होता त्यावेळी (६४०) या वंशातील दुसरा ध्रुवसेन राजा (बालादित्य) राज्यावर होता. गुप्त व वल्लभी यांच्या राजवटींत गुप्तशक चालू असे. यांची राजधानी वल्लभीपूर (वाले) होती. त्यांनी २५० वर्षेपर्यंत (७६६) राज्य केलें. हे शैव होते. वरील बालादित्य हाच या घराण्यांतील प्रख्यात पुरुष होता.

चालुक्य- नंतर हे गुजराथचे राजे झाले. ऐहोळ शिलालेखावरून दुसरा पुलकेशी चालुक्य यानें गुजराथ घेतला. या वंशातील प्रख्यात पुरुष जयसिंहवर्मा (६६६-६९३) होता. यांची राजधानी नवसरी येथें होती. या वंशात आठ पुरुष होऊन, पुढें राष्ट्रकूटांनी यांचे राज्य काबीज केले. (७५७).

गुर्जरवंश- हे मूळचे उत्तरहिंदुस्थानांतील असून गुजराथेंत सहाव्या शतकांत आले. वल्लभी व चालुक्य यांचा अंमल चालुं असतां यांचें लहानसें राज्य मही व नर्मदा यांच्या दरम्यान असून त्याची राजधानी नांदिपुरी (नांदेड) होती. यांच्यातील तिसरा जयभट हा पराक्रमी होता. हे वल्लभी किंवा चालुक्याचें मांडलिक असत. ह्मुएत्संगाच्या वेळी यांच्यातील दद्द हा राजा होता. स.७३५ नंतर यांचा फारसा उल्लेख आढळत नाही. ताजीक किंवा अरब यांनी अगर गुजराथेंतील राष्ट्रकूटांनी यांचा नाश केला असावा. हे आपल्याला पुढे पुढे (७००) भारतीय कर्णाचे वंशज म्हणवीत. चालुक्य पुलकेशीच्या एका ताम्रपटांत (७३८) त्यानें गुजराथ घेतल्याचा उल्लेख आहे.

राष्ट्रकूट- राष्ट्रकूटांचा गुजराथशी संबंध (इ.स.७४३ ते ९७४ पर्यंत होता. राष्ट्रकूट-ध्रुव यानें गुजराथेत राज्य स्थापिले. त्याच्या नंतर त्याचा पुत्र गोंविद व नातु कक्क हे राजे झाले. पुढे दक्षिणराष्ट्रकूटांनी या गुजराथी घराण्याचा अंतर्भाव आपल्यांत करून घेतला. या घराण्यांत ध्रुव  हा पराक्रमी होऊन गेला (७९५). यानें आपल्या मुला(तिस-या गोंविद)स गुजराथ स्वतंत्र तोडून दिला. त्याच्या मागें त्याचा भाऊ इंद्र हा राजा झाला(८०८). हा गुजराथी राष्ट्रकूट दुस-या शाखेचा मूळपुरुष होय; याला लाटेश्वर म्हणत. या घराण्यांतील ककीने उत्तर कोंकणातील कांही प्रांत काबीज केले. याचा मुलगा ध्रुव (८६७) याचें व दक्षिणेंतील मुख्य राष्ट्रकूट घराण्याचे वांकडे येऊन त्या दोघांमध्ये झालेल्या लढाईत ध्रुव मरण पावला. याचा नातु, दुसरा ध्रुव हा पराक्रमी होता. त्यानें आपला गेलेला मुलुख सर्व परत मिळविला व दक्षिणेतील राष्ट्रकूटाचा पराभव केला. काठेवाडच्या मिहिर राजाचाहि त्याने पराभव केला होता. पुढें या वंशातील अकालवर्ष कृष्ण (८८८) यानें खानदेशांतील बराच भाग जिंकला. याचे नंतरची या घराण्याची माहिती आढळत नाही. पुढें (९१४) मान्यखेटच्या इन्द्र राष्ट्रकूटानें गुजराथ काबीज केले. यांची सत्ता गुजराथेवर किती दिवस होती हे नक्की समजत नाही. परंतु पश्चिमचालुक्य तैलप्प यानें त्यांचा मोड करीपर्यंत (९७२) ते तेथे अंमल करीत होते हें निर्विवाद आहे. तैलप्पानें गुजराथ घेऊन तेथे आपला द्वारप्प (वारप्प) नांवाचा सुभेदार नेमला.

मेर- मिहिर अथवा मेर यांचा काल स.४७०-९०० चा आहे. गुप्त घराण्यांतील बुध्दगुत्पांच्या सुभेदाराचा मैत्रक नांवाच्या जातीने मोड करून गुजराथचा काही भाग काबीज केला. हेच मिहिर अथवा मेर होत. अद्यापिहि काठेवाडांत हे आढळतात. यांच्या निशाणावर माशांचे चिन्ह असे व गुप्तांच्या निशाणावर मोराचें असे. मेर हे आपल्याला मारूतीचा पुत्र मकरध्वज याचे वंशज म्हणवितात. यांच्या एकंदर ठेवणी व पोषखावरून हे उत्तर हिंदुस्थानातून काठेवाडांत आले असावेत. गुप्तांचा विध्वंसक तोरमाण (४७०-५१२) याच्याबरोबर हे खाली आले असावेत. यांची सत्ता ५०९-५२० च्या सुमारास चांगलीच स्थिर झाली होती. भट्टारकानें ५२०त त्यांना हुसकावल्यामुळें ते मोरवी येथें जाऊन राहिले. ते वल्लभीचें मांडलिक असत. वल्लभीच्या नाशानंतर यानी सर्व काठेवाडांत आपली सत्ता वाढविली. व गुजराथेवर स्वार्‍यांस प्रारंभ केला (८६०). गुजराथेंत ९०० च्या सुमारास त्याचा बराच अधिकार चालत होता. पुढें जाडेजा व चूडारूमा या रजपुतांनी त्यांच्यावर हल्ले केल्यानें त्यांनी भुमली ही आपली राजधानी सोडून पोरबंदराजवळ श्रीनगर येथे वास्तव्य केले. यांच्यातील प्रसिध्द राजा महिपाल हा १० व्या शतकाच्या प्रारंभी झाला. मेर हे मूळचे श्वेतहूण होत असे कांहींजण म्हणतात.

चूडासमा यानी काठेवाडात आपली सत्ता स.९०० च्या सुमारास स्थापिली. यांची राजधानी बनधाली (वनस्थली) असून तेथील या वंशाचा पहिला राजा चुडाचंद्र नावांचा होता. त्याच्यावरूनच या वंशास चूडासना म्हणतात. यांच्या मांडलिकांत जेथव व झाला हे लहानसे जहागीरदार येत असत. हेहि काठेवाडात रहात होतें.

अनहिलवाडचें चावडा घराणें (७२०-९५६)- अनहिलवाड येथें राज्य स्थापण्यापूर्वी हें चावडा घराणें पंचासरप्रांती (गुजराथ व कच्छ यांच्या दरम्यान) एक लहानसें जहागीरदार म्हणून होतें. या घराण्यांतील जयशेखर राजाचा वध कल्याण कटकच्या भुवड राजानें केला (६९६). या जयशेखराचा पुत्र वनराज हाच अनहिलवाड्याचासंस्थापक होय. पंचासरवर अरब किंवा भुवड चालुक्यानें स्वारी करून चावडांचा विध्वंस केला (७२०). वनराजाला पुष्कळ दिवस वनवासामध्ये काढावे लागले. पुढे त्याचा मामा सूरपाल याच्या मदतीनें त्यानें अनहिलवाड्यास गादी स्थापिली (७६५). त्यानें ७८० पर्यंत राज्य केल्यानंतर त्याचा मुलगा योगराज नातू क्षेमराज व पणतू चामुंड हे राजे झाले. चामुंडाचा मुलगा धागड हा ९०८ मध्यें त मेल्यावर त्याचा पुत्र (याचें नांव आढळत नाही) गादीवर आला. हाच या वंशातील शेवटचा राजा होय. हा ९६१ त मरण पावल्यानंतर त्याचा भाचा मूळराज हा राजा झाला.

सोळंखी अथवा चालुक्य राजे (९६१-१२४२)- मूळराज हा या वंशातील मूळपुरुष होय. यानें आपल्या मामाच्या राज्याचा बराच विस्तार केला. याच्यावर तेलंगणाच्या राजानें स्वारी केली होती. मूळराजानें सोरटच्या आभीर राजावर स्वारी केली. हा मोठा दानशूर असून यानें बरीचशी देवळें बांधिली. यानें शेवटी अग्निकाष्ठें भक्षण केली (९६१ ते ९९६) याचा मुलगा चामुंड यास तीन मुलें होती. याना मुंज राजाने पदच्युत केलें. त्याचा सूड म्हणून याचा मुलगा वल्लभ याने मुंज राजावर स्वारी केली पण तो वाटेंतच मरण पावला. तेव्हा त्याचा भाऊ दुर्लभ हा गादीवर बसला (१०१०). दुर्लभानें मारवाडांतील कांही राजांवर स्वारी केली आणि शेवटी आपला पुतण्या भीम यास राज्य देऊन आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारला (१०२२). भीम हा फार पराक्रमी होता. त्यानें चेदि आणि सिंध येथील राजांचा पराभव करून त्याना मांडलिक बनविले. पण तो तिकडे गुंतला असता माळव्याच्या राजानें अनहिलवाड लुटलें. याच्याच कारकिर्दीत गझनीच्या महंमुदाने सोमनाथावर स्वारी केली. नंतर यानें अबूच्या राजाचा पराभव केला. याच्यानंतर याचा मुलगा कर्ण हा गादीवर बसला (१०६४). याची कारकिर्द शांततेची झाली. यानें लोकोपयोगी बरीच कामें केली. हा १०९४ त वारल्यानंतर याचा मुलगा प्रसिध्द सिध्दराज जयसिंग हा गादीवर बसला. तो अज्ञान असतांना त्याची आई मैनलदेवी ही कारभार करीत असे. गुजराथमधील सर्व राजांत हा फार प्रख्यात असून शूर, धार्मिक व दानशूर होता. व्द्याश्रय काव्यामध्यें बर्बक म्लेंच्छांचा यानें पराभव केल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे सौराष्ट्रातील अहीर राजा व गिरनागरचा खिगार राजा आणि माळव्याचा यशोवर्मा या सर्वांचा पराजय करून त्यानें त्यांचे प्रांत आपल्या राज्यास जोडले आणि त्यांच्या स्मरणार्थ सिंहसंवत्सर या नांवाचा एक शक सुरू केला. हा शैव असून यानें सिध्दपूर येथे रूद्रमाळ नांवाची इमारत व पाटण येथे सहस्त्रलिंग या नांवाचे सरोवर बांधिले. हा विद्वानांचा पोशिंदा असून प्रख्यात जैनाचार्य हेमचंद्र हा याच्या पदरी होतो. यास मूल न झाल्यामुळें गादीचा वारसा याच्या मांडलिक त्रिभुवनपाल याच्याकडे गेला. त्यास तीन मुले होती. त्यांतील कुमारपाल नांवाचा मुलगा हा गादीवर बसला. (११४३) यानें आपले जुने अधिकारी काढून नवे नेमल्यामुळे याचा प्राण घेण्यासाठी एक गुप्त कट करण्यांत आला व माजी मंत्र्याचा मुलगा अरभट्ट यानें सांबरच्या राजाच्या मदतीनें कुमारपालावर स्वारी केली असता कुमाराने त्याचा व माळव्याच्या राजाचा पराभव करून माळव्याचें राज्य खालसा केलें.

यानंतर कुमारपालानें कोकणावर स्वारी केली व सौराष्ट्रावरहि स्वारी करून तो प्रांत खालसा केला. तसेच चंद्रावती संस्थानहि त्यानें खालसा केलें. यावेळी याचें राज्य उत्तरेस तुर्की मुलूख, पूर्वेस गंगा, दक्षिणेस विंध्य व पश्चिमेस सिंधु या चतुःसीमेत पसरलेलें होतें. यानें सोमनाथाचें देऊळ पुन्हां बांधिले आणि ब-याचशा देवळांचा जीर्णोद्धार केला. यांच्या पदरी बरेच जैन पंडित असत. त्यांत रामचंद्र व उदयचंद्र हे दोन प्रख्यात होते. वर आलेला हेमचंद्र हा याचा गुरू असून यानें अगदी शेवटी शेवटी जैनधर्म स्वीकारला होता. हा स.११७४ त वारल्यानंतर याचा पुतण्या अजयपाल गादीवर आला. तो जैनधर्माचा द्वेष्टा असल्यानें त्याच्या काराकीदीत जैनांचा फारच छळ झाला. ११७७ त त्याचा खून झाल्यानंतर दुसरा मूळराज हा राजा झाला. त्यांच्यानंतर ११७९ मध्यें दुसरा भीम गादीवर आला. हा दुर्बळ असल्यानें सर्वत्र अंदाधुंदी माजून वाघेल लोकानी याचें राज्य बळकाविलें (१२००)

वाघेल राजे (इ.स.१२१९ ते १३०४)- कुमारपालाचा भाचा अर्णवराजा हा या घराण्याचा संस्थापक होय. याच्या जहागिरीचें गांव व्याघ्रपल्ली असें होते आणि त्यावरून त्यांच्या वंशास वाघेल हे नांव मिळालें. त्याचा मुलगा लवप्रसाद हा दुस-या भीमाचा प्रधान होता. हा शूर असून यानें माळव्याच्या व मारवाडच्या राजांचा पराभव केला यानें १२३३त राज्यत्याग केल्यानंतर याचा मुलगा वीरधवल गादीवर आला. वनस्थळी व भद्रेसर येथील राज्ये खालसा केली. व पूर्वगुजराथ खालसा करून महाराष्ट्रापर्यंत आपले राज्य वाढविलें. महमुद घोरीचाहि यानें पराभव केला होता. १२३८ त हा वारल्यावर याचा मुलगा विसलदेव हा राजा झाला. यानें अनहिलवाड येथे दुस-या भीमाचा पराभव करून आपली राजधानी स्थापन केली. हा फार शूर असून यानें माळवा, देवगिरी व मेवाड येथील राजांचा पराभव केला होता. याच्या कारकीर्दीत गुजराथेंत तीन वर्षे दुष्काळ पडला असतां लोकांच्या दुःख निवारण्याची यानें बरीच खटपट केली. याच्या नंतर याचा पुतण्या अर्जुनदेव हा गादीवर बसला. नंतर सारंगदेव (१२७४-१२९६) व त्यानंतर कर्णदेव (१२९६-१३०४) यांनी राज्य केले. यांच्यातील कर्णदेव हा अतिशय दुर्बळ होता. याच्या कारकीर्दीत १२९७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा भाऊ अलफखान याने अनहिलवाड काबीज केले. व कर्णदेव देवगिरीकडे पळून गेला.

मुसुलमानी अंमल (१२९७-१७६०)- अल्लाउद्दीन खिलजीनें गुजराथ जिंकल्यापासून १२९७ मध्यें मराठ्यांनी तो काबीज करीपर्यंत साडेचार शतकें गुजराथ मुसुलमानी अमलाखाली होता. त्यांत (१) दिल्लीच्या सुलतानाचा अंमल (१२९७-१४०३); (२) अहमदाबाद येथील शहांचा अंमल (१४०३-१५७३); आणि (३) मोंगल बादशहांचा अंमल (१५७३-१७६०); अशा तीन कारकीर्दी झाल्या. या अंमलात गुजराथचे राजकीय दृष्टया दोन भाग असत; एक खालसा (यावर खास मध्यवर्ती सरकारचा अंमल असे) व दुसरा संस्थानी (यांत मांडलीक राजे असत). खालसाचे सरकार (जिल्हा) निहाय भाग पाडले होते; आणि सरकारचे परगणे (तालुका) असत. प्रत्येक परगण्यावर अमीन किंवा तहसीलदार असे व त्याच्या हाताखाली पाटील असत. सरकांरापैकी कांही सरकारे खास मध्यवर्तीसरकारांच्या ताब्यांत असत व कांही सरंजामदार यांस फौजीतैनातीसाठी दिलेले असत.

अकबरानें या व्यवस्थेंत थोडा फरक केला. जकात व जमीनमहसूल ही खाती वेगळी करून त्यांवर निरनिराळे (अमीन, अमील, फैल, मुशरीफ वगैरे) अधिकरी नेमिले. मांडलीक, जहागीरदार, वगैरे लोकांपासून खंडणी वसूल करणारा अधिकारी निराळा असे. त्याला सरकारी वसुलापैकी शेकडा २१/२ टक्के मनोती मिळे. न्यायाच्या कामी काझी (मुसुलमानासाठी) व सदर जमीन (मुसुलमानेतरासाठी) यांची कोर्टें असत; त्यावरचें अपील अहमदाबाद येथील न्यायाधीशाकडे चाले आणि त्याच्याहि वर काझी-उल्-कुझ्झत आणि सदर-उल्-सुदुर यांच्याकडे अपील चाले.

इनामदारांचे दोन वर्ग असत. मुसुलमानी अंमलापूर्वीचे (हे सारे हिंदूच होते) व नंतरचे. पहिल्यांना जमीनदार व दुसर्‍यांना जहागीरदार म्हणत. जहागीरदारांना खंडणी द्यावी लागे. कांहीजणांना सरंजामी फौज ठेवावी लागे. कांही इनामदारांची इनामें सरकार हळू हळू संपुष्टांत आणीत असे. त्यामुळे हे इनामदार (बहुतेक हिंदु) मुसुलमानाविरुध्द मराठ्यांना मिळत असत.

जमीनमहसुलाच्या बाबतींतहि अकबरानें पुढील सुधारणा केल्या. (१) नवीन मोजणी व घारेबंदी (२) पाटील कुळकर्ण्योना सरकारी पगार (३) गांवच्या हक्कदारांना पूर्वी मिळत असलेले व मुसुलमानी अंमलांत बंद केलेले हक्क पुन्हां सुरू करणें वगैरे.

वर सांगितल्याप्रमाणें अल्लाउद्दिनानें गुजराथ जिंकल्यावर तेथें उलुघखानची सुभेदारीवर नेमणूक केली. यानें २२ वर्षे कारभार केला. परंतु शेवटी अल्लाउद्दिनानें त्याला मलीक काफरच्या चिथावणीवरून सुळावर चढविलें व ऐनउल्मुलक यास सुभेदार केलें. यानें तिकडील बंडे मोडली. त्याच्या नंतर दोन चार सुभे झाले; पण ते महत्वाचे नाहीत. महंमद तुघलुकाच्या वेळी (१३४६) गुजराथेंत बंडे झाली. ती त्यांने स्वतः गुजराथेंत येऊन मोडली. व बंडाचा पुढारी मलीकतुघन याचा मोड करून निजाम-उल्-मुलक यास सुभेदार नेमिले. पुढें रास्तीनखान नावांचा एक सुभेदार आला. तो फार दुष्ट व जुलमी होता. त्याच्या मागून (१३९१) झाफरखान हा सुभा झाला. यानें ईदराच्या राजापासून (१३९३) व जुनागडच्या राजापासून (१३९४) थकलेल्या खंडण्या वसून करून सोमनाथाच्या देवळाचा पुन्हां विध्वंस करून मांडूचा किल्लाहि काबीज केला.

अहमदाबादचे शहा. (१४०३-१५७३)- यांची सत्ता गुजराथेवर १७५ वर्षेपर्यंत होती. वरील झाफरखानानें दिल्लीच्या बादशहाची सत्ता झुगारून आपल्या तार्तारखान नांवाच्या मुलास नासीरुद्दीन महंमदाशहा ही पदवी देऊन स्वतंत्र राज्य स्थापन केलें (१४०३). हा नासीर दिल्लीवर स्वारी करण्यास गेला असतां वाटेंतच मेला. यानें आपल्या बापास कैदेंत टाकल्यामुळें त्याच्या मित्रांनी नाझीरचा खून केला असे म्हणतात. पुढे झाफरखानच मुझफरशहा नांव घेऊन गादीवर आला (१४०७). यानें माळव्यावर स्वारी करून तेथील हुशंगशहास कैद केलें व मांडु किल्ला मुसाखानापासून काबीज केला. पुढें मुझफरचा नातू अहमद यानें याला विषप्रयोग करून आपण गादीवर आला (१४११). हा फार शूर होता. यानें याच्या चुलत भावानें केलेली बंडे मोडून आशावल येथील भिल्ल राजाचा पराभव करून तेथे अहमदाबाद गांव बसविलें (१४१३). पुन्हां एकदा (१४१५) चुलतभावानें ईदरच्या राजाच्या मदतीनें बंड उभारलें; परंतु तेंहि यानें मोडलें. याच वेळी त्यानें गुजराथेंतील बारीक सारीक संस्थानिकांना आपलें मांडलिक बनविले व माळव्यावर स्वारी करून तेथील शहाचा पराभव केला (१४१७). आपल्या जहागीरदारांची कोट किल्ल्यांची ठाणी त्यानें पाडून टाकिली आणि मा-याच्या जागी स्वतः किल्ले बांधले. पुढें ईदरच्या राजाचा पराभव करून त्यानें राज्यांत अन्तर्गत सुधारणा फार केल्या. सैन्यास पगार अर्धा रोख पैशाच्या रूपानें व अर्धा जमीनीच्या रूपानें देण्याची त्यांने नवीन पध्दत पाडली. पुढे माहीमबेट (१४२९), बागलाणचे किल्ले (१४३१) व नागारेचा किल्ला ही ठाणी यांने काबीज केली आणि शेवटी हा १४४१ त मरण पावला; हा न्यायी व दयाळु असे. याच्यानंतर त्याचा मुलगा दुसरा महंमद हा गादीवर आला. हा फार चैनी व भित्रा असे. याच्यावर माळव्याच्या सुलतानानें स्वारी करून याचा पराभव केला. शेवटी याच्या सरदारांनी याला ठार मारून, याच्या कुतुबद्दीन नांवाच्या मुलास गादीवर बसविले (१४५२). यानें माळव्यावर व चितोडवर स्वा-या केल्यानंतर हा मरण पावला (१४५९). नंतर त्याचा चुलता दाऊद गादीवर आला, पण प्रजेंनें त्याला त्याच्या मूर्खपणाच्या कृत्यामुळें पदच्युत करून, दुस-या महमदाचा मुलगा फत्तेखान यास महमूदशहा (बेगडा) नांव देऊन गादीवर बसविलें (१४५९ याचें चरित्र महमूर बेगडा या शब्दाखाली पहावें) त्याच्या मागून दुसरा मुझफर तख्तारूढ झाला. त्यानें ईदरवर (१५१४) व माळव्यावर (१५१७) स्वारी करून मांडूच्या मेदिनीरायाचा पराभव केला. मुझफर हा विद्वान, संगीतप्रिय, धार्मिक व शूर होता. हा १५२६ त मेल्यानंतर त्याचा मुलगा शिकंदर गादीवर आला (स.१५२६). शिकंदराचा थोड्याच महिन्यांत खून होऊन त्याचा भाऊ दुसरा महमूद गादीवर बसला पण त्याचाहि वध करून बहादूरखान हा गादीवर आला (१५२७ या बहादूरशहाचें चारित्र बहादूरशहा या नावांखाली पहावें) त्याच्या पश्चात त्याचा भाचा गादीवर बसला, पण तो लगेच मेल्यामुळे बहादूरचा भाऊ महमूदशहा राजा झाला (१५३६). हा अज्ञान असल्यानें दर्याखान व इमादुल्मुल्क या सरदारांनी सत्ता बळकाविली. शेवटी महमूदनें त्याचा पराभव करून अहमदाबाद घेतले. पुनःइमादुल्मुल्कानें बंडाळी माजविली, पण ती शहानें मोडली. यानें रजपूत सरदारांची वतनें जप्त केल्यामुळे त्यांनी बंडे उभारली, त्याचा फायदा घेऊन बुर्‍हाण नांवाच्या नौकराने शहाचा खून केला (१५५४). पुढें अहमदशहा हा गादीवर आला. हा लहान असल्यानें सर्व कारभार इतिमादखान हा पाही. त्याने गुजराथचें तुकडे करून ते निरनिराळ्या सरदारांना वांटून दिले. याचें व इतर सरदाराचें जमेना आणि यांच्यात भांडणें झाली, तेव्हां हा खानदेशाच्या राजाकडे पळाला व त्याच्याकडून यानें गुजराथेंतील नंदुरबार वगैरे प्रांत काबीज करविले. तेव्हा अहमदानें याला पुन्हां बोलविले, परंतु पुन्हा अहमरनें त्याच्या जाचांतून मुक्त होण्याची खटपट चालविली असतां त्यानें शहाचा खून करून तिस-या मुझफरास गादीवर बसविले (१५६१). इतक्यात चेंगीजखानानें इतिमाद याचा पराभव करून ह्माला हाकलून, सर्व सत्ता आपल्या ताब्यांत घेतली. परंतु बिजलीखान नांवाच्या एका हबशानें याचा खून करून सत्ता बळकाविली. यानंतर हवशाची सत्ता सुरू झाली. इतक्यात अहमदावादेवर शेरखान नांवाचा अहमदशहाचा एका सरदार चालून आला असता हवशांनी इतिमाद यास मदतीला बोलविलें व इतिमादनें अकबराची मदत मागितली त्याप्रमाणें मोंगल सैन्यानें येऊन अहमदाबाद काबीज केले व गुजराथच्या राजघराण्याचा शेवट होऊन तेथे मोंगली सत्ता प्रस्थापित केली (१५७२).

मोंगलाचा अंमल (१५७३-१७५८)- वरीलप्रमाणें गुजराथी सरदारांतील दुहीच्या फायद्यामुळे अकबरास गुजराथ मिळालें. त्याचा पहिला सुभेदार मिर्झा अझीझ कोकलताश नांवाचा होता. यानें खोरासानच्या मिर्झा या राजपुत्राची बंडे मोडलीं. नंतर राजा तोडरमल्लानें गुजराथची जमाबंदी केली. इतक्यांत गुजराथचा पूर्वीचा शहा मुझफर हा कैदेंतून पळून जाऊन त्यानें बंड उभारलें व अहमदाबाद, भडोच वगैरे प्रांत हस्तगत केला (इ.स.१५८३). परंतु अकबरानें मिर्झा अबदुल यास त्याच्यावर पाठविलें व त्यानें मुझफरला पिटाळून लावून सर्व प्रांत परत मिळविला, त्याबद्दल त्याला खानखानान ही पदवी मिळाली (१५८७). परंतु पुन्हा मुझफरनें सोरठांत बंड केलें (१५९१). तेव्हा फिरून खानखानानें त्याचा पराभव केला असता, तो कच्छचे रावाकडे पळून गेला. रावानें खानखानाच्या हवाली त्याला केलें; त्यानें त्याला दिल्लीस पाठविले असतां, मुझफरनें वाटेंतच आत्महत्या केली. पुढें मुझफरचा मुलगा बहाद्दुर यानें बंड केले (१५९४). पण त्यावेळी गुजराथचा सुभेदार शहजादा मुरादबक्ष होता त्यानें तें तात्काळ मोडलें. मुराद (१६००) मेल्यामुळे पुन्हा कोकलताश यास सुभेदार नेमले. जहागीर गादीवर आल्यानंतर त्यानें गुजराथेंतील कांही जुलुमी कर रद्द करून सर्वत्र दवाखानें उघडलें. या वेळी बहादूरनें पुन्हा बंड केलें परंतु तेंहि लवकरच मोडलें. पुढें मांडव्याच्या संस्थानिकानें मुसुलमानी सत्ता झुगारण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. यावेळी गुजराथचा सुभेदार मुर्तुझा बुखारी होता. याच्याच वेळी इंग्रजाला गुजराथेत शिरण्याची संधि मिळाली. त्यानें कॅ.हॉकिन्स याला सुरतेंत माल विकण्यास परवानगी दिली (१६०८). मलिक अंबरने सुरत लुटल्यामुळें (१६०९) शहाजादा शहाजहान यानें अहमदनगरवर स्वारी केली (१६१६). यावेळी गुजराथचा सुभा मुकरबखान होता. पुढील वर्षी जहांगीर हा गुजराथेंत शिकारीस आला असतां ईदर, नवानगर, कच्छ येथीज राजांनी त्याचा फार सन्मान केला (१६१७). त्यानंतर शहाजादा शहजहान हा गुजराथचा सुभा झाला (१६१८). पण त्यानें बापाविरूध्द बंड केल्यानें त्याला काढून खुश्रूचा पुत्र सुलतान दावरवक्ष यास सुभेदार निराळा नेमला गेला. पुढें (१६३१-३२) गुजराथेंत भयंकर दुष्काळ पडल्यानें शहाजहाननें सुरत व अहमदाबादेस अन्नछत्रें उघडली. या दुष्काळास तिकडे (संवत्) ‘सत्याशीनो काळ’ म्हणतात. शहाजहाननें या वेळी कोळ्याचें व काठी लोकाचें बंड मोडून नवानगरच्या जामाकडून थकलेली खंडणी वसूल केली. पुढें (१६४२) सुभेदार मिर्झा तर्खान यानें गुजराथच्या जमाबंदींत पुष्कळ सुधारणा केल्या. यानंतर (१६४४) अवंरगझेब हा सुभेदार बनला. त्यानें हिंदूवर अत्यंत जुलूम केला. देवळे भ्रष्ट केली, गाई मारल्या (मुं.गॅ.भा.२ पु.१) त्यामुळें त्याला परत बोलावून शास्ताखानास सुभेदार नेमिले (१६४६). परंतु त्याच्यानें कोळ्याची बंडे मोडवेनात म्हणून दाराशुकोह यास सुभेदारीवर पाठविलें. तों कंदाहारच्या सुभेदारीवर गेल्यानें (१६५२) पुन्हां शास्ताखान आला. नंतर (१६५४) शहाजादा मुराद हा सुभेदार झाला. त्यानें कोळ्याच्या नायकाचा पराभव केला. इतक्यांत शहाजहान बादशहा आजारी पडल्यामुळे मुरादनें आपणास बादशहा म्हणून जाहीर केले. शहाजहाननें जसवंतसिंगास त्याच्यावर पाठविलें परंतु त्याचा पराभव होऊन मुराद व अवरंगझेब आग्र्यास गेले. अवरंगझेब गादीवर आल्यानंतर दारानें गुजराथवर स्वारी केली, तेव्हा तेथील सुभेदार शहानवाझ हा त्याला मिळाला. परंतु अखेरीस दाराचा पराभव झाला व शहानवाझच्या जागी जसवंतसिंग हा सुभा आला. तो दक्षिणेंत शिवाजीमहाराजांवर गेल्यामुळे मोहतब सुभा झाला (इ.स.१६६२). यानें नवानगर खालसा केले व दाराच्या तोतयाचा पराभव केला. यावेळी औरंगझेबानें गुजराथेंत अनेक जुलमी कर लादले व सुरत अहमदाबादच्या इंग्रज आणि डच लोकांवर जकात बसविली. इतक्यांत शिवाजीमहाराजांनी सुरत लुटली. तेव्हा गांवास तट घातला. पण पुन्हा (इ.स.१६६६) महाराजांनी सुरतेवर हल्ला केला. याच साली शेतकर्‍यांना तकावी (तगाई) देण्याची पध्दत सुरू झाली. पुन्हा मराठ्यांनी (१६७०) सुरतेवर स्वारी केली, तेव्हा जसवंतसिंगास सुभेदार नेमलें (१६७१). तो काबूलच्या सुभेदारीवर (१६७४) गेल्यावर अहमद अमीन हा सुभा झाला, यानें कांकरेजच्या कोळ्यांचे बंड मोडलें. पुढे उदेपुरकर युवराज भीमसिंह यानें औरंगजेब मारवाडकडे गुंतलेला पाहून गुजराथेवर स्वारी केली, इतक्यांत इदरच्या राण्यानेंही बंड उभारलें. परंतु अमीननें ते मोडलें. तेव्हा औरंगझेबानें गुजराथेंत (व सर्वत्र त्याच्या साम्राज्यांत) जिजियापट्टी बसविली. इतक्यांत गुजराथेंत भयंकर दुष्काळ पडला; (इ.स.१६८१) अहमदाबादेस बंडाळी झाली. त्यावेळी बंडाचा पुढारी अबूबकर यास सुभेदारानें विषप्रयोग केल्याने बंड मोडलें. पुन्हा (१६८४) गुजराथेंत दुष्काळ पडला. पुढें (१६९१) दुर्गादास राठोडच्या युद्धाचा फायदा घेऊन गुजराथेंत मातिया व मोमना या बाट्या मुसुलमानांनीहि बंड उभारलें व भडोचचा किल्ला घेऊन तेथील सुभेदारास ठार केलें. परंतु गुजराथचा सुभेदार करतलब यानें त्यांचा मोड करून (१६९२) काठी लोकांचीहि बंडाळी मोडली. यानें अहमदाबादेस उत्तम इमारती बांधल्या. सन १६९८त गुजरातथेंत पुन्हा दुष्काळ पडला. पुढें सुलतान महंमद अज्जम हा गुजराथचा सुभेदार झाला (१७०३). त्यानें दुर्गादास राठोडाला पाटणची सुभेदारी दिली. परंतु बंडाची तयारी चालविल्यामुळें त्याला पकडण्याची तजबीज झाली. पण तो पळून गेला. याचवेळी अवंरगझेबानें हिंदूनां मुसुलमान नौकर ठेवण्याची मनाई केली. पुढे सुलतान अज्जम परत गेला व धनाजी जाधवानें गुजराथेवर स्वारी केली (१७०५-६). हीच मराठ्यांची गुजराथेवरील पहिली स्वारी होय. रतनपूर येथे धनाजीनें मोंगलांचा फडशा पाडला. बाबापीरच्या लढाईत पुन्हा मराठ्यांनी मुसुलमानांचा पुरा धुव्वा उडविला. सर्व गुजराथेंतून चौथ वसूल करून व गुजराथचा सुभा हमीद याला कैदेंतून सोडण्याबद्दल खूप मोठा दंड करून मराठे परतले. त्यांच्यावर शहाजादा बेदरबख्त चालून आला पण त्याचा मोड झाला; तोच पुढें गुजराथचा सुभेदार बनला. मराठ्यांच्या गडबडीचा फायदा घेऊन दुर्गादासानेंहि बंडाळी माजविली होती. यापुढे (१७०७-१७५७) मात्र मुसुलमानी सत्ता कुमकुवत होऊन मराठ्यांच्या स्वा-या गुजराथेंत जास्त होत चालल्या.

मराठ्यांच्या स्वा-या- प्रथम बाळाजी विश्वनाथ यांनी अवरंगझेब मेल्याबरोबर लागलीच गुजराथवर स्वारी करून सुभेदार इब्राहीम याच्यापासून दोन लाखांची खंडणी घेतली (१७०७); पुन्हां मराठ्यांनी गुजराथेवर स्वारी केली (१७११) व चौथ वसूल केली. पुढें अमदाबाद येथें काही धार्मिक स्वरूपाची बंडाळी माजली होती (१७१४). यावेळी दाऊदखान पन्नी हा सुभा होता. त्याची शिस्त कडक असे. दिवाणी कारभार त्यानें दक्षिणीब्राह्मणांच्या सल्ल्यानें चालविला होता. पुढे (१७१६) महाराज अजितसिंह हा सुभा झाला; त्यानंतर गुजराथेंत दुष्काळ पडला (१७१९). अजितसिंहास आपल्या बाजूचा करण्यासाठी सय्यदबंधूनी त्याचा फार मानमरातच ठेवला होता. याच वेळी पिलाजी गायकवाडानें गुजराथवर स्वारी करून सोनगड काबीज केलें; येथपासून गुजराथेंतील मोंगली सत्ता नष्ट झाली व मराठ्यांची विशेषतः गायकवाडांची सत्ता तेथें प्रस्थापित झाली. अजितसिंहानेंहि त्यांना मदत केली आणि मारवाडच्या लगतच गुजराथीप्रांत आपल्या हाताखाली घालण्यास प्रारंभ केला. यावेळी हैदरकुली हा गुजराथचा सुभा झाला; तो दिल्लीची सत्ता जुमानीनासा झाला. त्यानें बादशाही घोडे पकडलें. रयतेच्या मिळकती तो जप्त करून स्वतःच्या आवडत्या लोकांना वांटून देऊ लागला; तेव्हा बादशहानें त्याला काढून निझाम उल्मुल्क याला सुभेदारी दिली (१८२२). पण तो तेथें न रहाता हैद्राबादेस गेला व गुजराथेंत सर्वत्र अंदाधुंदी माजली. तिचा फायदा घेऊन पिलाजींने स्वारी केली (१७२३) व चौथ वसूल केली; आणि या वर्षापासून मराठ्यांनी गुजराथची चौथ नियमितपणे वसूल करण्यास प्रारंभ केला. यापुढील मराठ्यांची हकीकत 'गायकवाड (घराणे) या नावाखाली पहावी.

[संदर्भग्रंथ.-बॉम्बे ग्याझे. पु.१. भा..१; राजतरंगिणी; बील-बुध्दिष्ट रेकार्डस्ः आर्कीऑलॉजिकल सर्व्हे रिपोर्ट्स २,४; रासमाला; इलियट; हरिवंश; महावंशी; पेरिप्लस; टॉलेमी; वायुपुराण; विष्णुपुराण वगैरे.]