विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गिरिधर रामदासी- यांचे मूळचें नाव गिरमाजी. हे समर्थ रामदास यांची शिष्यीण जी वेणाबाई, तिच्या बायजाबाई नांवाच्या शिष्यीणीचे शिष्य होत. त्यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहिलें होतें व त्यांचा समागम यांना कांही काल घडला होता. त्यांचा मठ मोंगलाईंत बीड येथें आहे. यांचा मुख्य ग्रंथ समर्थप्रताप नांवाचा असून त्यांत समर्थांचे बरेचसें चरित्र (जें गिरधरानी स्वतः पाहिले तें) आलेलें आहे. समकालीनत्वामुळें या ग्रंथास समर्थचरित्रांच्या इतर ग्रंथात बरेंच वरचे स्थान आहे. या शिवाय यांचे चाळीस ग्रंथ व हजार पंधराशें इतर कविता उपलब्ध आहे. रामायणावर यांचे पांच सहा ग्रंथ आहेत. यांनी रामाशिवाय इतर दैवतांवरहि काव्य केलें आहे. यांचा निवृत्तीराम हा ग्रंथ फार सुंदर आहे. यांनी आपल्या आयुष्यांतील आठवणी एका छोट्या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत. यांनी काशीयात्रा केली होती व तिचे वर्णनपर एक प्रकरणहि त्यांनी लिहिलें आहे. हे शके १६५१ त समाधिस्त झाले. हे मिरजेकडील रहाणारे होतें. [समर्थ प्रताप संतकविसूचि].